कृषी अर्थव्यवस्था सध्या सर्वांचे लक्ष असलेला प्रांत ग्रामीण भागाला उभारी देण्यासाठी कृषी व्यवसायाशिवाय पर्याय नाही, हे करोना आणि लॉकडाऊनने स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनचा परिणाम इतका विस्तृत प्रमाणात झाला की त्यामुळे शेती, उद्योग आणि व्यवसायासमोर ‘न भूतो न भविष्यती’अशा प्रकारच्या अडचणी उभ्या राहिल्या. यामध्ये सर्वच क्षेत्रांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.मोठ्या व्यावसायिकांनी आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अनेकविध मार्गांचा अवलंब केला.यामध्ये मुख्यतः कामगारांची कपात करणे, उत्पादन प्रक्रिया थांबविणे, कच्च्या मालाची खरेदी थांबविणे, पक्क्या मालाची साठवणूक करणे, कामगारांच्या पगारात कपात करणे, बँकांचे कर्जाचे हप्ते स्थगित करणे इत्यादींचा समावेश होतो.
सद्यस्थितीत नकारात्मक विचार केला तर सगळीकडे नैराश्य, हतबलता दिसेल.परंतू सकारात्मक आणि काहीसा धाडसी विचार केला तर ‘करोना’ने आपल्याला शेती व्यवसायाची पुनर्रचना करण्याची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. फक्त त्याकडे आपल्याला डोळसपणे पाहावे लागेल.कृषीक्षेत्राचा विचार केला तर ‘कोरोना’च्या आधी जसे होते तसेच आपल्याला हवे आहे की या क्षेत्राच्या कार्यपद्धतीची पुनर्रचना करायची आहे ? हे प्रथम आपल्याला ठरवावे लागेल.‘करोना’नंतरचा लढा म्हणजे निव्वळ विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणणे एवढाच नाहीये. कारण ‘कोरोना’ने जगातील सारे संदर्भ आणि गणिते बदलून टाकली आहेत.
अशा या करोनारूपी महामारी संकटामध्ये खरीप हंगामामध्ये शेतकर्यांच्या शेतामधील निघणारे उत्पदान निघाल्या नंतर ते कुथे विकावे हे मोठे संकट शेतकरी वर्गा समोर उभे राहणार आहे मोठ्या.आपण या उत्पादनाचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायला हवी या साठी शेतकरी बांधवाना ग्रामीण स्तरावर सामुहिक कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करावा लागणार आहे हि पार्श्वभूमी समोर ठेऊन खरीप हंगामातील कांदा प्रकिया उद्योग बदल माहिती घेऊ.
शेतमाल प्रक्रियेमुळे होणारे फायदे :
- शेतमालावर प्रक्रिया केल्यास त्याचे आयुष्य वाढून ती वर्षभर वापरात येतात. त्यामुळे पाहिजे त्या शेतमालाचा पुरवठा होतो व उपभोग घेता येतो.
- बाजारपेठेत आवश्यकतेपेक्षा शेतमालाची आवक झाल्यास होणारे नुकसान टाळता येते.
- शेतमालामध्ये मूल्यवृध्दी होते.
- वाहतुकीवरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
- रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
- प्रक्रिया केलेल्या शेतमालाची निर्यात केल्यास देशाला परकीय चलनाचा पुरवठा होतो.
कांदा प्रक्रिया उद्योग:-
करोनाने व्यापलेल्या या संकटाच्या काळातील समस्येचे समाधान शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा आधारित प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीचा निर्णय घ्यावा. कांदा प्रक्रिया करून विविध उत्पादनांची निर्मिती केल्यास त्यापासून शेतकर्यांचा निश्चितच फायदा होईल. कांदा व इतर भाज्यांचे दर वाढतात तेव्हा अन्न प्रक्रिया उद्योगांनी असे टिकाऊ पदार्थ विकले तर त्याचा फायदाच होतो. सध्या आपण खराब होणाऱ्या कृषीमालापैकी केवळ २ टक्के मालावर प्रक्रिया करतो, यावरून असे लक्षात येईल कि शेतीमालाच्या प्रक्रियेसाठी आपल्या देशात अजूनही किती वाव आहे.
कांदा हे व्यापारिदृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन हे महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कांदा उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होतेनाशिक पाठोपाठ पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात विविध हगंमातील कांदा वर्षभर बाजारपेठेत येत असतो. कांदा सुद्धा नाशवंत पदार्थ आहे, पण भारतीय कांद्याचे काही वैशिष्ट्य आहेत. अधिक तिखटपणा, अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट यामुळे भारतीय कांद्याचे पोषणमूल्ये अधिक आहेत. कांद्याचे विविध प्रकारे मूल्यवर्धन करून नेहमी पेक्षा अधिक नफा शेतकरी मिळवू शकतील.
- कमीत कमी प्रक्रिया केलेले कांदे : कांदे सोलून किंवा कापून त्यांच्यात प्रिझर्वेटिव्हस (परिरक्षके) वापरली जातात. असे सोललेले किंवा कापलेले कांदे उत्तम पॅकेजिंगद्वारे अधिक काळ ताज्या स्वरूपामध्ये राहू शकतात.सोललेले कांदे ५ टक्के उर्ध्वपातित व्हिनेगारच्या द्रावणाचा वापर करून संरक्षित केले जातात. कापलेल्या कांद्यांसाठी पोटॅशियम सल्फेटचा (०.२५ टक्के) प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापर केला जातो.
- कांदा पेस्ट :- बदलत्या जीवनशैलीमुळे कांदा पेस्टला मागणी वाढत आहे. पेस्ट तयार करण्यासाठी कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात. नंतर मिक्सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते. कांदा पेस्ट केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. स्वयंपाकातही वापरण्यास कांदा पेस्ट सुलभ जाते…
- निर्जलित (डिहायड्रेटेड) कांद्यापासून पावडर व फ्लेक्स (काप):- कांद्याचे निर्जलीकरण केल्याने सूक्ष्मजीववाढीस प्रतिबंध होऊन कांद्याची साठवणक्षमता वाढते; तसेच त्याचे आकारमान कमी होत असल्याने वाहतुकीसाठी सोपे जाते. निर्जलीकरणामुळे कांद्याची आर्द्रता कमी होते. अशा कांद्यांना योग्य प्रकारे काप देऊन, फ्लेक्स किंवा भुकटी तयार करता येते. डिहायड्रेटेड कांद्याचे फ्लेक्स आणि पावडर हे वातावरणातील आर्द्रता शोषून घेणारे आहेत, त्यामुळे त्यासाठी योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञान वापरणे अत्यावश्यक आहे. अशा कांदा भुकटी किंवा कापांच्या निर्यातीला मोठा वाव आहे.
- कांदाग्रेव्ही: साहित्य: कांदा: 1 किलो, काळीमिरी: 5 ग्रॅम, लवंग: 5 ग्रॅम, दालचिनी: 5 ग्रॅम, तेजपत्ता: 10 ग्रॅम, तेल: 50 ग्रॅम, पाणी: 750 ग्रॅम.
प्रक्रिया:
- सपाट तवा किंवा किंवा काढईत कांद्याचे काप करून भाजून घ्यावे.
- भाजलेल्या कांद्याची ग्राइंडर मध्ये पेस्ट बनवावी.
- कढईत तेल तापवून त्यात काळीमिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता टाकावा आणि त्यात कांद्याची पेस्ट परतवून घ्यावी.
- या तयार ग्रेव्ही मध्ये 750 मिली मिक्स करून 10-15 मिनिटे साठी संथ अग्नीवर उकळू द्यावे.
- गरम ग्रेव्ही 1 किलो किंवा 5 किलोच्या प्याक साईझ मध्ये पॅक करावे.
- ग्रेव्हीला हॉटेल्स, रेस्टॉरंटस, ढाबे अशा ठिकाणी प्रचंड मागणी आहे.
लोणचे : व्हिनेगर किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून, तर आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे
- तेल: कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये प्रिझर्वेटिव्ह (संरक्षक) म्हणूनही त्याचा वापर केला जातो…
सिरका / वाइन / सॉस : कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर (सिरका), सॉस आणि वाइन आदींची निर्मिती करता येते.
कांद्याच्या टाकाऊ भागावरील प्रक्रिया :
- कांद्याच्या घरगुती आणि औद्योगिक वापरातून उरलेला कचरा देखील प्रक्रिया करून वापरता येऊ शकतो.
- कांदा सालीतून रंग मिळवता येतात.ते नैसर्गिक रंग म्हणून वापरले जातात.
- रंग काढून उरलेला भाग फायबरचा चांगला स्रोत आहे.
- कांद्याच्या कोरड्या सालीमध्ये फ्लेवोनॉइड घटक असतात. त्यापासून स्वाद आणणारे घटक तयार करता येतात.
- कांद्याचा बाहेरील थर, मुळे आणि पात यांचा बायो-गॅसमध्ये पर्यायी ऊर्जा स्रोत निर्माण करण्यासाठी उपयोग करता येतो.
कांदा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे
- पिलिंग मशिन (साल /बाह्य आवरण काढण्याचे यंत्र):- कांद्यावरील बाह्य आवरण म्हणजेच त्यावरील साल काढण्याकरिता या यंत्राचा वापर केला जातो. हे एक स्वयंचलित यंत्र असून, याची क्षमता ५० किलो प्रतितासपासून पुढे आहे. आपल्या भागातील उपलब्ध कांदा आणि त्यावरील प्रक्रिया या अनुषंगाने आवश्यक त्या क्षमतेची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत.या यंत्राची किंमत अंदाजे २० हजारांपासून पुढे क्षमतेनुसार वेगवेगळी असू शकते.
- कांदा रूट आणि हेड कटिंग मशिन (मुळे व शेंडा कापण्याचे यंत्र):- हे स्वयंचलित यंत्र वापरून कांद्याची मुळे व शेंडे कापण्यात येतात. या यंत्राची क्षमता १०० किलो प्रतितासपासून पुढे असून किंमत १५ हजारांपासून सुरू होते.
- कांदा वॉशिंग मशिन (धुण्याचे यंत्र)-बाह्य आवरण आणि मुळे काढलेला कांदा धुण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. यामुळे कांद्यावरील धूळ व अन्य खराब घटक निघून कांदा स्वच्छ होईल. हे यंत्र स्वयंचलित आहे. याच्या किमती १५ हजार रुपयांपासून सुरू होऊन क्षमतेनुसार कमी- अधिक होऊ शकतात.
- कांदा कटर किंवा स्लाइसर यंत्र (कांद्याच्या चकत्या करण्याचे यंत्र):- या यंत्राद्वारे कांद्याच्या लहान चकत्या केल्या जातात.निर्जलीकरणादरम्यान पाण्याचे प्रमाण लवकर कमी होण्यासाठी चकत्यांची जाडी ही ०.३ ते ०.६ सेंमी असावी. हे यंत्र स्वयंचलित असून, या यंत्राची किंमत १० हजारापासून पुढे क्षमतेनुसार कमी- अधिक असू शकते.
- डिहायड्रेटर किंवा ड्रायर (कांदा वाळवण्याचे यंत्र:- डिहायड्रेटर किंवा ड्रायरमध्ये पदार्थातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. कांद्याच्या चकत्या वाळवण्यासाठी ट्रे ड्रायर किंवा सोलर ड्रायर वापरले जातात. कांद्याच्या चकत्या ५५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १२ तासांकरिता ड्रायरमध्ये ठेवल्या जातात. याची क्षमता ही ट्रेच्या संख्येवर अवलंबून असते. जितके जास्त ट्रे तितकी जास्त क्षमता, तितकी किंमत जास्त असते. बाजारात सध्या १२, २४, ४८, ९६, १९२ ट्रे असणारे ड्रायर उपलब्ध आहेत. काही कंपन्यांमार्फत वरील सर्व यंत्रे एकत्रित किंवा वेगवेगळी उपलब्ध होऊ शकतात.
- ग्राइंडर (गिरणी) :- वाळवलेल्या चकत्यांपासून ग्राइंडरद्वारे भुकटी बनवली जाते. ग्राइंडरची क्षमता ही ५० किलो प्रतितासपासून पुढे उपलब्ध आहे. ५० किलो प्रतितास क्षमतेच्या ग्राइंडरची किंमत ही २० हजार रु. आहे. एकूण ५ ते १० लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास शेतकरी किंवा शेतकरी गट कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात. या प्रक्रिया पदार्थांच्या दरामध्ये बऱ्यापैकी स्थिरता असल्याने ताज्या कांद्याच्या तुलनेमध्ये आर्थिक स्थिरता मिळू शकते. या छोट्या उद्योगाच्या साह्याने सामान्य शेतकऱ्यांना कांद्याच्या दरातील चढ-उतारावर काही प्रमाणात तरी मात करणे शक्य होईल, अशी आशा आहे.
लेखक -
श्री. शरद केशवराव आटोळे
साहाय्यक प्राध्यापक
मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग
कृषी महाविद्यालय दोंडाईचा
मो.नंबर-७७४४०८९२५०
सागर छगन पाटील
पीएच. डी. स्कॉलर
कृषिविद्या विभाग, म.फु. कृ. वी., राहुरी
कु. पूजा अनिल मुळे
वरिष्ठ संशोधन सहाय्यक,
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा
Share your comments