परंतु खरोखरच या देशातील शेती प्रगतीच्या वाटेवर चालली आहे का? शेतीकडे व्यवसायाकडुन बघीतल्यास शेती फायदेशीर आहे का? म्हणुनच शेतीला आता एक फायदेशीर, भरवशाचा जोडधंदा असणे गरजेचे आहे यालाच शेतमाल प्रक्रिया उद्योग हा सर्वोत्तम पर्याय असु शकतो.
प्रक्रिया उद्योगासाठी वाव
भारताची आजची स्थिती कृषी आधारित उद्योगांसाठी अनुकूल आहे युरोपीय राष्ट्रांमध्ये एकच पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते भारतामध्ये राज्यनिहाय पीकविविधता असल्याने भारतात प्रक्रिया उद्योगासाठी कच्चा मालाची उपलब्धता सहज होऊ शकते त्यामुळे शेतकरी मोठ्या जिद्द, कष्टांनी अन्नधान्याचे उत्पादन घेतो काढणीपश्चात तंत्रज्ञानाअभावी दर वर्षी २५ टक्के शेतमालाची नासाडी होत असते म्हणुनच त्यास प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्यास ह्या प्रमाणात नक्किच घट होईल तसेच शेतक-यासाठी एक नवी बाजरपेठ उपलब्ध होईल.
आज खेडोपाडी पायाभुत सुविधांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही वीज, पाणी, रस्ते यांपासुन अनेक खेडी अजुन वंचीत आहेत त्यामुळेच तेथे औद्योगिक धंदे अजुन विकसीत झाले नाही. म्हणुनच रोजगाराच्या संधी तेथे उपलब्ध नाहीत शेतमाल हि ग्रामिण भागात सहज उपलब्ध होणारी गोष्ट असुन अल्प सुविधांमध्ये आपण प्रक्रिया उद्योग सुरु करु शकतो. यामार्फत आपण आपल्याबरोबर इतरांना देखिल रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो. सद्यस्थितीत प्रक्रिया उद्योग क्षेत्रात ३० टक्क्यांनी वाढ होत आहे.
सध्या भाजीपाल्याच्या निर्जलीकरणाचे विविध तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे त्याचप्रमाणे फळांपासुन पल्प, रस,जॅम, स्क्वॅश बनविणे इ. तसेच वेफर्स, फरसाण बनविणे त्याचप्रमाणे लोणचे, मुरंबा बनविणे असे अनेक पर्याय शेतमाल प्रक्रियामध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सोयाबीन दुध, पावडर, सोयापनिर, तांदुळापासुन पोहे, पापड, दुधापासुन विवीध प्रक्रिया पदार्थ हि बनवता येऊ शकतात. भारतीय नागरिकांची जीवनशैली बदलत असून 'रेडी टू इट’ 'रेडी टू कुक’ उत्पादनांना ग्राहकांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे.
शेतीमाल प्रक्रिया उद्योगात येणाऱ्या उद्योजकांनी व्हॅक्यूम पॅकिंग, नायट्रोजन पॅकिंग, रिटॉर्चटेबल पाऊच, फ्लेक्झी पॅक, टेट्रापॅक यांसारख्या पॅकिंग तंत्रांचा वापर केल्यास भारतीय उत्पादने जगभरात विकली जाऊ शकतात तसेच, प्रक्रिया उद्योगांनी फूड सेफ्टी स्टॅंडर्स्ट, डब्ल्यूटीओच्या स्टॅंडर्स्टचा काटेकोर वापर करावा. अत्यल्प जमीनधारणेमुळे एकटा शेतकरी उद्योजक होऊ शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे गटाच्या माध्यमातून कंपनी स्थापन करणे आवश्यक आहे अनेकांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग उभारल्यास धोके कमी होतात. शेतकऱ्यांनी गट स्थापन करून प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास सहकारी पद्धतीने तो अधिक फायदेशीर ठरतो.
प्रक्रिया उद्योगासमोरील आव्हाने
प्रक्रिया उद्योगासाठी वित्तपुरवठा मिळवण्यामध्ये अडचणी येतात यासाठी शेतकऱ्यांनी पूर्ण अभ्यास करून अहवाल बॅंकेकडे सादर करावा प्रकल्प अहवाल हा आकडेवारीचा खेळ नसून यशापयश ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे.
कच्च्या मालाची सखोल माहिती, आकडेवारी, पुरवठ्यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे तसेच, उद्योग उभारताना पुढील ७ वर्षांचे उत्पादन, विक्री व्यवस्थापनाचे नियोजन असणे आवश्यक आहे.
प्रक्रिया उद्योगाला कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा व्हावा यासाठी गावाच्या आसपासच्या शेतकऱ्यांशी करार शेती करुन कच्चामाल चांगल्या दर्जाचा रास्त उपलब्ध होऊ शकेल.
अन्नप्रक्रिया उद्योग थेट ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित आहे त्यात यशस्वी होण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा, मानके यांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. उद्योग उभारताना विविध संस्थांकडून सर्टिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे. तसेच, विविध शासकीय पणन संस्थांच्या संपर्कात राहा, तरच उद्योग यशस्वी होईल. पत वाढविण्यासाठी घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड करणे आवश्यक आहे.
भांडवलाची उपलब्धता
प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र, राज्य शासनाच्या भरपूर योजना आहेत तसेच प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी विविध बॅंका, नाबार्डच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य, सवलती उपलब्ध आहेत.
शेतीचा विकास, सक्षमीकरणासाठी शेतावरच प्रक्रिया, प्रतवारी, पॅकिंग, शीतगृहांसाठी नाबार्ड वित्तपुरवठा करत आहे. अभ्यास दौरे, प्रशिक्षण, क्षमतावृद्धीसाठी नाबार्ड शेतकऱ्यांना, गटांना आर्थिक साह्य उपलब्ध करुन देत आहे.
शेतीबरोबरच शेतीव्यतिरिक्त ग्रामीण कारागिरांना त्यांच्या व्यवसाय, उत्पादन विपणनासाठी विविध योजनासरकार राबवत आहे.
गटशेतीसाठीही चांगल्या पतपुरवठ्याच्या योजना नाबार्ड मार्फत उपलब्ध आहेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रकल्प खर्चाच्या ७० ते ८० टक्के कर्ज बॅंकांकडुन नक्कीच मिळते._
यशस्वी उद्योजक होण्यासाठी
प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी भांडवल, कच्चामाल, बाजारपेठ, ग्राहक, विक्री व्यवस्था हे मुख्य घटक आहेत. विक्री व्यवस्थापनाचा परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचे असून, स्पर्धकांचा अभ्यास असला पाहिजे.
प्रक्रिया केलेल्या शेतीमालाचे मार्केटिंग, जाहिरात, ब्रॅंडिंग महत्त्वाचे असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळाची गरज आहे._
व्यवसायातील अनुभवी व्यक्तींकडून जास्तीत जास्त अनुभव ऐकून घ्यावा. उद्योगात जोखीम घेणे आवश्यक असते.
व्यवसायाचे बारकावे, यशापायश या गोष्टींचे सखोल ज्ञान पक्के असले पाहिजे.
सध्याचे युग माहीती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे अशा युगात जर आपल्याला जगाबबरोबर चालायचे असेल तर या माहीती, तंत्रज्ञानाचा उपयोग व्यवहारी जीवनात करावाच लागेल.
लेखक- प्रवीण सरवदे, कराड
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments