नैऋत्य मान्सूनची वाटचाल संथ गतीने होत असली तरी दोन-तीन दिवसांत तो केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाच्या या काळामध्ये सोमवारपासून राज्याच्या काही भागात गडगडाट आणि हलक्या सरींचीही अपेक्षा आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण अरबी समुद्रात मान्सूनचे वारे वाहत आहेत.
हे वारे दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापून लक्षद्वीपपर्यंत पोहचले आहे. श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारताच्या जवळ आले आहेत. मात्र, शनिवारी (ता. २८) मान्सूनच्या वाऱ्याने काही प्रगती केली नाही. बंगालच्या उपसागरात त्यांची प्रगती दोन दिवसांपासून ठप्प आहे. त्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून येत्या काही तासांत ते पुन्हा प्रगती करतील आणि दोन-तीन दिवसांत केरळमधून भारतात प्रवेश करतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दक्षिण अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्प वाऱ्यांमुळे सध्या केरळसह दक्षिणेच्या काही भागात आणि किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे.पूर्वेकडील राज्यांमध्येही सध्या पावसाळी वातावरण आहे. महाराष्ट्रात सध्या दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण आहे.
कोकण आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. ३० मे पासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात जोरदार वाऱ्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
Health News: तुम्हीही 4-5 तास टीव्ही बघता का? मग; सावधान! या गंभीर आजाराला पडू शकता बळी
किडनी स्टोन म्हणजे नेमके काय? कसा होतो किडनी स्टोन? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Share your comments