Monsoon Update: राज्यात जूनच्या दुसऱ्या हफ्त्यात मान्सूनचे आगमन झाले. 10 जूनला मान्सून राज्यातील तळकोकणात दाखल झाला, तदनंतर अवघ्या चोवीस तासात मान्सून मुंबई दरबारी पोहोचला. मात्र त्यानंतर मान्सून हा जणू काही गायब झाला होता. मग मान्सून जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला. जुनच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात मोसमी पावसाची दमदार हजेरी बघायला मिळाली. यामुळे शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला.
सध्या राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पेरणी पूर्ण केली आहे. काही शेतकरी बांधवांच्या अजूनही खरिपातील पेरण्या बाकी आहेत. दरम्यान, गुरुवारी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत शहर आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या मोसमी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबई वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी पावसामुळे मुंबईकरांना काही अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबई वासियांना याचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवामान खात्याने 1 आणि 2 जुलै रोजी मुंबई शहरातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत मुंबई शहराला येलो अलर्ट जारी केला आहे. IMD मुंबईने शुक्रवारी सकाळपासून 24 तास शहरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या शक्यतेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दोन इमारती कोसळल्या
दरम्यान मुंबई शहरात संततधार पावसात काळबादेवी आणि सायन भागात इमारती कोसळण्याच्या दोन घटना घडल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि लोकांना बाधित इमारतींमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, शहरामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 या १२ तासांच्या कालावधीत 119.09 मिमी, त्यानंतर पश्चिम उपनगरात 78.69 मिमी आणि पूर्व उपनगरात 58.40 मिमी पाऊस झाला आहे.
पुढील दोन दिवस मुंबई आणि मुंबई उपनगरात भारतीय हवामान विभागाने जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे हवामान विभागाने यावेळी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा देखील दिला आहे. निश्चितच मोसमी पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून आराम मिळाला आहे.
Share your comments