नवयुवक शेतकरी अनेक कारणे पुढे करीत शेती क्षेत्राकडून दुरावत चालले आहेत. सुशिक्षित तरुण शेतीऐवजी नोकरीस प्राधान्य देतात मात्र एका अवलिया सुशिक्षित तरुणाने शेतीमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे. योग्य नियोजन करून व नियोजनाच्या जोडीला भरघोस मेहनत करून दर्जेदार उत्पादन मिळवता येणे शक्य असते आणि शेती क्षेत्रातून लाखो रुपये कमवले जाऊ शकतात हे या तरुणाने दाखवून दिले आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या मौजे मांडवगण येथील नवयुवक शेतकरी अजय गवांदे यांनी पाणीटंचाईवर मात करत माळरानावर सेंद्रिय शेती फुलवली आहे. शेती फक्त फुलवलीच नसून त्याने उत्पादित केलेले सेंद्रिय कलिंगड आता दुबई रवाना झाले असून दुबई वासियांना वेड लावू इच्छित आहेत.
अजय हे बीएससी ऍग्रीचे पदवीधारक आहेत, त्यांनी नेवासा तालुक्याच्या सोनई येथील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथून बीएससी ऍग्री चे शिक्षण पूर्ण केले आहे. अजय यांनी शिक्षणानंतर एका खाजगी कंपनीत काम करीत पाणीटंचाई असलेल्या माळरानावर एक आशेचे किरण निर्माण केले आहे. अजय यांनी नोकरी सोबतच शेती देखील केली, शेतीमध्ये त्यांनी केवळ शेतमाल उत्पादित केला नसून शेतमालाला नगरमध्ये हमीचे ग्राहक देखील शोधून ठेवले आहेत. हक्काचे ग्राहक असल्याने अजय चार एकर शेतीतून चार लाखापर्यंत उत्पन्न कमवीत आहेत.
अजय सध्या सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे अधिक भर देत आहे. तो आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने वांगी, कांदा, दोडका, भोपळा, कारले, गवार, भेंडी इत्यादी भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करीत आहे. यासाठी त्याने नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा वापर केला आहे. केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून न राहता अजय यांनी शेतीपूरक व्यवसायाची देखील सांगड घातली आहे सध्या अजय चारशे गावरान कोंबड्यांचे संगोपन करीत आहेत यामुळे अजय यांच्या उत्पन्नात वाढ होत असून हात खर्चाला सहजच पैसे शिल्लक राहतात.
अजय यांनी यंदा आपल्या शेतात कलिंगड पिकाची लागवड केली होती. या कामी त्यांना कृषी तज्ञ शैलेश ढवळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. कलिंगड पिकात त्यांनी मिरचीचे यशस्वी आंतरपीक देखील घेतले. केवळ दोन एकर क्षेत्रातून त्यांनी 60 टन एवढे विक्रमी कलिंगड उत्पादित केले. त्यांनी उत्पादित केलेल्या एकूण कलिंगडपैकी जवळपास 50 टन कलिंगड दुबई निर्यात करण्यात आले. अजय यांचे कलिंगड आठ रुपये प्रति किलो या दराने विक्री झालेत.
त्यामुळे अजय यांनी समाधान व्यक्त केले. सध्या अजय यांनी आंतरपीक म्हणून लावलेली मिरची देखील बहरात असून मिरची पिकातुनही त्याला चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. एकंदरीत अजय यांचे यश इतर नवयुवक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून शेती पासून दुरावत चालणारे नवयुवक अजय यांचा आदर्श ठेवत पुन्हा एकदा जोमाने शेती करतील अशी आशा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
संबंधित बातम्या:-
मोठी बातमी! राजू शेट्टी यांच्याकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकमेव आमदाराची हकालपट्टी
Breaking News: कृषी विभागात घोटाळा! काँग्रेस नेत्यांनी केली 'इडी'कडे तक्रार
वावर है तो पॉवर है! विदेशातली नौकरी सोडून करतोय शेती, आज लाखोंची उलाढाल
Share your comments