विपरीत परिस्थितीतही शेती फुलविता येते, त्यासाठी आजच्या तरुण पिढीने शेतीत वेळ द्यायला हवा. कामाचे व्यवस्थापन करून तरुणांनी मेहनत घेतली तर बदल नक्कीच होतो, असे बुलढाणा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी पंढरी गुंजकर म्हणतात. श्री पंढरीनाथ यशवंत गुंजकर रा. टाकरखेड हेलगा ता. चिखली जि. बुलढाणा हे प्रगतशील व अत्यंत अभ्यासू शेतकरी आहेत. ते आपल्याकडील शेतीमध्ये नवीन सुधारित जातीचे बियाणे घेऊन बीजोत्पादन कार्यक्रम घेतात. त्या बियाण्याची प्रक्रिया करून शेतकऱ्यांना विकतात. त्यांनी स्वता:चा यशवंत सिड्स असा ब्रँड बनवला आहे.
त्यासोबतच ते शेतीपयोगी अवजारांची निर्मिती करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वाजवी दरात व नवनवीन अवजारे बनवतात. पंढरी गुंजकर यांनी आपल्या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, जेव्हा त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळी काही लोक त्यांची टिंगल करायचे हा व्यवसाय चालणार नाही अस म्हणायचे. पण आपण प्रयत्न सोडले नाही व शेतीतील प्रयोग चालूच ठेवले’’.
शेतीसोबतच पंढरी गुंजकर यांनी जलयुक्त शिवार अभियानामध्ये स्व:खर्चातून नाला खोलीकरण करून पाणीसाठा निर्माण केला. त्यामुळे ८ ते १० एकर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. त्यासोबत १०० गायींचा सांभाळ करून त्या मधून निघालेल्या खताचा वापर ते शेतात करतात, त्यामुळे त्यांची जमीन भरभरून उत्पन्न देते.
गुंजकर हे अत्यंत प्रगतशील, शिस्तप्रिय व मनमिळवू शेतकरी आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणि नव युवकांना त्यांच्यापासून नेहमीच प्रेरणा मिळते. गुंजकरांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रगतशील शेतकरी म्हणून गौरवण्यात आले आहे. यासाठी त्यांना दूरदर्शनकडून दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान २०१६ पुरस्कार मिळाला आहे. यासह २०१९ मध्ये ICAR नेही त्यांचा सन्मान केला आहे आणि २०१७-१८ मध्ये जिल्हा परिषद बुलढाणा व कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ सन्मान पत्र मिळाले आहे. यासह अशा अनेक पुरस्कारांनी गुंजकरांना गौरविण्यात आले आहे. ''शेती विविध कारणांनी तोट्यात असली तरी शेतकऱ्यांनी हार न मानता लढले पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्महत्याचा विचार मनात आणू नये व लढायला शिकले पाहिजेत'', असे मत पंढरीनाथ गुंजकर यांनी व्यक्त केले .
वरील माहितीचे संकलन
विठ्ठल गडाख [कृषी महाविद्यालय, नागपूर]
भागवत देवकर, आकाश शेळके, व सुशांत देशमुख (कृषी महाविद्यालय, पुणे).
Share your comments