आजच्या काळात शेतीमध्ये महिलांचा सुद्धा मोठा हात आहे. जसे की महिला शेतीत मजुरी सुद्धा करत आहेत तर काही महिला स्वतः वैयक्तिक लक्ष घालत आहेत आणि याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे गातेस गावच्या शेतकरी कल्पिता कुमार पष्टे. कल्पिता यांचे पती कुमार हे सुद्धा शेतकरी तसेच त्यांना चार भाऊ. ते चार भाऊ सुद्धा शेतकरी. आपल्या शेतात ते वेगवेगळे प्रयोग करायचे. कुमार यांची तब्बेत नीट नसल्याने आता स्वतः कल्पिता शेतीकडे लक्ष घालत आहेत. रब्बी हंगामात कल्पिता त्यांच्या १२-१५ एकर शेतजमिनीत हरभरा, झेंडू, डांगर, कांदा, धने, मूग, वाल, चवळी, तूर, तीळ असे पीक घेत आहेत तर पावसाळ्याच्या दिवसात त्या भाताची शेती सुद्धा करत आहेत.
सगळी पीके एकाच ठिकाणी :
कल्पिता यांनी आपल्या ५ एकर जागेत ६० हजार झेंडूची झाडे लावली आहे. झेंडूच्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तसेच यासाठी मजुरांची संख्या सुद्धा कमी लागते. यंदा झेंडूच्या फुलाला दर नाही मात्र फुललेले झेंडू बघून सर्वांना समाधान वाटत आहे. कल्पिता यांनी त्यांचे पती कुमार यांचा आधार घेत चार एकर मध्ये रब्बीत हरभरा सुद्धा पेरला आहे. सर्व खर्च तसेच मजुरी जाऊन ५०-६० हजार रुपये शिल्लक राहिले. चार एकर मध्ये कल्पिता यांनी कांदा लागवड सुद्धा केली आहे तसेच वाल, मूग, तीळ, धने या पिकांची सुद्धा त्यांनी आपल्या शेतात लागवड करून उत्पन्न घेतले आहे.
कल्पिता यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग करून उत्पादन तर घेतले आहेच त्याचबरोबर त्यांनी पशुपालन सुद्धा केले आहे ज्यामधून त्या दूध व्यवसाय करत आहेत. आपल्या शेतीमधून वर्षाकाठी कल्पिता ३-४ लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत. आपल्या घरात जे कडधान्य तसेच भाजीपाला असतो त्यावर जो खर्च जातो त्याची बचत सुद्धा त्या करत आहेत. आपल्या शेतामध्ये कल्पिता यांनी ८-१० महिला मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे. एवढेच नाही तर कल्पिता त्यांच्या गावाच्या पोलीस पाटील आहे.
आपल्या गावामध्ये भांडण असो किंवा कोणते वाद असतील तर ते सोडवून शांतता राखण्याचे काम कल्पिता पोलीस पाटील करत आहेत. कल्पिता यांनी त्यांच्या गावाला तंटामुक्त गाव असा पुरस्कार सुद्धा मिळवून दिलेला आहे. गावात एकोपा, भावनिक ऐक्य, तसेच व्यक्तीमधील भाव-जागृती करून देण्याचे काम कल्पिता यांनी केले आहे. गावात हा अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम कल्पिता यांनी केले आहे. तालुक्यात कल्पिता यांनी सन्मान मिळवला आहे तसेच त्यांच्या गावाच्या शेजारील सुद्धा महिला आपल्या शेतात प्रत्यक्ष लक्ष देत आहेत. कल्पिता सुद्धा त्यांच्या गावातील महिलांना शेतीबद्धल मार्गदर्शन करत असतात.
Share your comments