खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले होते. असे असले तरी, खरिपात झालेल्या नुकसानीमुळे खचून न जाता नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कलिंगड या हंगामी पिकांची लागवड करून चांगले विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. यामुळे या शेतकऱ्याच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खरीप हंगामात सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता याचा फटका नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्याच्या मौजे कोकलेगाव येथील मारुती पाटील यांना देखील बसला होता. मात्र खरीप हंगामात झालेली नुकसान कसेबसे पचवत या शेतकऱ्याने कलिंगडची लागवड केली आणि आता या शेतकऱ्याचे कलिंगड हैदराबाद रवाना झाले आहेत. मारुती रावांच्या कलिंगड ला हैदराबाद मधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान कलिंगडाचे हंगामी पीक भरून देत असल्याचे सांगितले जात आहे.
कलिंगड पिकाला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. यंदा कलिंगडाचे क्षेत्र घटले असल्याने मागणीत अजूनच वाढ झाली आहे. यामुळे कलिंगडाला अधिकचा दर मिळत आहे. या विक्रमी दराचा फायदा कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. मारुतीराव यांनादेखील कलिंगडच्या वाढत्या दराचा फायदा होत आहे. मारुतीराव यांनी खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपल्या दोन एकर क्षेत्रात कलिंगड पिकाची लागवड केली होती. दोन महिन्यात काढणीसाठी तयार होणारे कलिंगड पिकाने मारुती रावांना साथ दिली आणि दोन महिन्यात या शेतकऱ्याने अवघ्या दोन एकर क्षेत्रातून साठ टन कलिंगड उत्पादित केले. विशेष म्हणजे पाटील यांनी उत्पादित केलेले कलिंगड उत्कृष्ट दर्जाचे असून व्यापारी आता खरेदीसाठी पाटील यांच्या बांधावरच येत आहेत.
यामुळे पाटील यांना वाढलेल्या दराचा फायदा होतोय शिवाय बांधावर खरेदी होत असल्याने वाहतूक खर्च वाचत आहे. यामुळे पाटील यांना दुहेरी फायदा होत आहे. सध्या बाजारात कलिंगड पिकाला बारा ते चौदा रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. हा दर सर्वसाधारण दरापेक्षा अधिक असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मल्चिंग पेपरचा वापर करीत पाटील यांनी पिकवलेले कलिंगड आता हैदराबाद राज्यात दाखल होऊ लागले आहेत. यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.
Share your comments