मागच्या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते, किंबहुना यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे देखील नुकसान बघायला मिळत आहे. या नैसर्गिक संकटांमुळे यावर्षी देखील जगाचा पालन पोषण करणारा शेतकरी राजा पूर्णतः मेटाकुटीला आला आहे. मात्र या सर्व विपरीत परिस्थितीचा सामना करत वाडा तालुक्यातील एका शेतकऱ्याने कलिंगड लागवड करून विक्रमी उत्पादन प्राप्त केले आहे. कलिंगड हे एक अल्प कालावधीत तयार होणारे पीक आहे. कलिंगड 80 दिवसातच उत्पादन देण्यासाठी तयार होते. वाड्यामध्ये जवळपास 50 शेतकऱ्यांनी अल्प कालावधीत तयार होणाऱ्या कलिंगड पिकाची लागवड केली, यापैकी अनेक शेतकऱ्यांनी या पासुन विक्रमी उत्पादन प्राप्त केल्याचे येथील स्थानिक शेतकऱ्यांनी नमूद केले.
पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेती क्षेत्रात नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात, विशेषता वाडा तालुक्यातील शेतकरी यासाठी संपूर्ण राज्यात ख्याती प्राप्त असल्याचे सांगितले जाते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नवनवीन पिकाची लागवड करून शेती क्षेत्रात एक नवीन पायंडा रुजवण्याचे कार्य केले आहे. वाडा तालुक्यात अलीकडे अनेक शेतकरी बांधव वेगवेगळ्या कलरची कलिंगडे लागवड करण्यात येत आहेत, विशेष म्हणजे याचे दर्जेदार उत्पादन घेण्यात देखील शेतकरी राजा यशस्वी झाला आहे. यंदा वाडा तालुक्यातील जवळपास 25 शेतकऱ्यांनी जैविक शेतीची कास धरून कलिंगड लागवड यशस्वी करून दाखवली आहे, या सर्व शेतकऱ्यांनी शुगर किंग जातीच्या कलिंगडाची लागवड करून चांगली बक्कळ कमाई केली आहे, शेतकऱ्यांनी कलिंगडच्या पिकाला विशेष म्हणजे फक्त सेंद्रिय खतांचाच वापर केला आहे, असे असले तरी या शेतकऱ्यांना कलिंगड पिकाचे चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त झाले आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील मौजे निचोळे, कोनसई, सांगे येथील रहिवासी शेतकरी तसेच तालुक्यातील अन्य प्रगत शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केली होती, कलिंगड लागवडीसाठी शेतकरी राजांनी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर करून यशस्वी उत्पादन प्राप्त केले आहे. कलिंगड लागवड केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांपुढे अवकाळी नामक संकट उभे राहिले. यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागला. कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी अवेळी आलेल्या पावसामुळे जमिनीत साचलेले पाणी निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले, व कलिंगड पिकाचे मोठे नुकसान होण्यापासून वाचवले.
कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी कसेबसे अवकाळी पासून कलिंगडाचे पीक वाचवले मात्र अवकाळी पावसाचे वातावरण निवळताच तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे कलिंगड पिकावर विपरीत परिणाम जाणवायला लागला होता. मात्र तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी कलिंगड पिकासाठी योग्य त्या टॉनिक ची व औषधांची फवारणी करून जानेवारी महिन्यात या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले. कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, विपरीत परिस्थिती असताना देखील कलिंगडला दोन किलो पासून ते पाच किलोपर्यंत वजन प्राप्त झाले. कलिंगडला 18 रुपये प्रति किलो दर प्राप्त झाला आणि महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील व्यापारी थेट कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांच्या वावरातून कलिंगडची काढणी करून घेऊन गेले. तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकर्यांना साधारण प्रति एकरी 3 लाख 50 हजार रुपयांचे उत्पादन प्राप्त झाले. त्यामुळे तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे.
Share your comments