राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसताना दिसत आहे, शेतकरी राजा निसर्गाच्या अवकृपेचा तसेच सुलतानी संकटाचा मोठ्या हिमतीने सामना करत, शेती करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कधी अवकाळी पावसामुळे कधी अतिवृष्टीमुळे कधी गारपिटीमुळे तर कधी बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, मात्र या सर्व संकटांना न जुमानता शेतकरी राजा मोठ्या हिमतीने लढत आहे आणि आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसाबसा भागवत आहे. मात्र नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक नवीन पायंडा घालून दिला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोड्या क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न अर्जित केले आहे. टोमॅटोला गतवर्षी चांगला बाजारभाव मिळत नव्हता तरी देखील शेतकऱ्यांनी हार न मानता परत एकदा टोमॅटो लागवड केली आणि टोमॅटो पिकातून लाखोंचे उत्पन्न मिळविले. आज आपण कर्जत तालुक्यातील थेरगावच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत.
अहमदनगर जिल्ह्यातील थेरगाव येथील रहिवाशी पुंडलिक रायकर यांनी अवघ्या 40 गुंठ्यात टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी नवीन दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. रायकर यांना टोमॅटोचे पीक जोपासण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला, यात टोमॅटोच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आलेल्या मजुरीचा देखील सामावेश आहे. अवघ्या 40 गुंठ्यात रायकर यांना तब्बल 42 टन टोमॅटो उत्पादन प्राप्त झाले, आणि त्यांना यातून जवळपास 13 लाख रुपयांची कमाई झाली. रायकर यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून ते टोमॅटोचे पीक आपल्या शेतात लागवड करीत आले आहेत, मात्र दोन-तीन वर्षांपूर्वी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने, त्यांनी गत दोन वर्षे टोमॅटो लागवड करण्याची टाळाटाळ केली. मात्र यंदा त्यांनी परत टोमॅटो लागवड करण्याचा निर्णय घेतला.
यंदा टोमॅटोचे क्षेत्र कमालीचे घटले त्यामुळे याचा उत्पादनावर परिणाम झाला, कमी उत्पादन झाले असल्याकारणाने टोमॅटो पिकाला चांगला बाजार भाव प्राप्त झाला. आणि त्यामुळे रायकर यांना टोमॅटोच्या पिकातून चांगले बंपर कमाई झाली. रायकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेतीत देखील बदल करणे गरजेचे आहे.
कायमस्वरूपी एकच पीक न घेता पीक हे फेरबदल पद्धतीने घ्यावे, तसेच आपल्या संपूर्ण क्षेत्रात एकाच पिकाची लागवड न करता वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी जेणेकरून एका पिकाला कमी बाजार भाव प्राप्त झाला किंवा उत्पादन कमी झाले तरी त्याची भरपाई दुसऱ्या पिकातून काढता येऊ शकते. शेतकऱ्यांनी रायकर यांनी सांगितलेल्या गुरुमंत्राचे जर अनुकरण केले तर शेतकरी बांधवांना यातून चांगली मोठी कमाई प्राप्त होऊ शकते.
Share your comments