या खरीप हंगामात कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी तर कधी ढगाळ वातावरण यामुळे खरिपातील मुख्य पिकांचे मोठे वाटोळे झाले. खरीप हंगामात निसर्गाचा लहरीपणा जणूकाही शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ सिद्ध झाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला, राज्यात सर्वत्र सोयाबीनचे पीक जलमय झाले होते, यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली. परंतु "जो अनहोनी को होनी करदे उसका नाम शेतकरी है" याचेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते नांदेड जिल्ह्यातून. कंधार तालुक्याच्या पद्मिनी बाई निवृत्ती वाघमारे या महिला शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील निसर्गाच्या लहरीपणावर मात करून अपार कष्टांच्या जोरावर, आणि कष्टाला नियोजनाची सांगड घालून आपल्या सोयाबीन पिकाची चांगली जोपासना केली आणि त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले.
पद्मिनी बाई यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा केला होता, मात्र खरिपात निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या या पिकाला मोठा फटका बसला परंतु आपल्या योग्य नियोजनाने त्यांनी होऊ घातलेले नुकसान कमी केले आणि तीन एकर क्षेत्रातुन तब्बल 24 क्विंटल सोयाबीन बियाण्याची निर्मिती केली. विशेष म्हणजे पावसामुळे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दर्जा खालावला होता मात्र या महिला शेतकऱ्याने या विपरीत परिस्थितीवर मात करून ऊन्हाळी हंगामासाठी दर्जेदार 24 क्विंटल सोयाबीन बियाणे तयार केले आणि याच्या विक्रीतून तब्बल दीड लाखांची कमाई आपल्या नावावर केली. कंधार तालुक्यात या खरीप हंगामात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे उत्पादन पाण्यात वाया गेले. अनेकांना पिकाच्या लागवडीसाठी आलेला उत्पादन खर्च देखील मिळाला नाही, मात्र तालुक्यातील मौजे कळका येथील पद्मिनी बाई यांनी या भयान संकटातून बाहेर पडत लाखोंची कमाई करून इतर शेतकऱ्यांना शेती मधील धडे गिरविले आहेत. पद्मिनी बाई यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करीत खरिपातील सोयाबीनची पेरणी केली. त्यांनी फुले संगम या वाणाची खरीप हंगामात पेरणी केली.
पेरणी केल्यानंतर तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता, मात्र या काळात पद्मिनी बाई यांनी तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेत जमिनीत पाण्याचा निचरा कसा करायचा तसेच ओला दुष्काळ सदृश्य परिस्थितीत सोयाबीन पिकाची कशी जोपासना करायची या विषयी महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेतल्या. तालुक्याच्या कृषी विभागाकडून मोलाचे सहकार्य लाभल्याने पद्मीनबाई यांनी आपल्या तीन एकर सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले, उत्पादन त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी होते परंतु कमी उत्पादनातून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी पद्मिनी बाई यांनी एक नामी शक्कल लढवली आपले सोयाबीन बियाणे म्हणूनच विक्री करायचे असा निर्धार केला. त्या अनुषंगाने पद्मिनी बाई यांनी सोयाबीनची मळणी करताना विशेष दक्षता घेतली, या जिगरबाज महिला शेतकऱ्याने 350-450 आरपीएमवर सोयाबीनची मळणी केली. सोयाबीनची मळणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पद्मिनी बाई यांनी सोयाबीन सावलीत वाळवला. त्यानंतर हा सोयाबीन स्वच्छ केला, सोयाबीन मध्ये काडीकचरा खडे राहणार नाहीत याची विशेष दक्षता घेतली.
स्वच्छ केलेले सोयाबीन 60 किलो च्या पोत्यात भरले, यासाठी त्यांनी ज्यूट पोत्याचा वापर केला. पद्मिनी बाई यांनी सोयाबीनची साठवणूक कोरड्या ठिकाणी केली, त्यामुळे सोयाबीनला आदर्तेचा फटका बसला नाही. पद्मिनी बाई यांना उत्पादित केलेला सोयाबीन बियाणे म्हणून विक्री करायचा होता त्यामुळे त्यांनी याची उगवणक्षमता तपासून बघितली, त्या अनुषंगाने त्यांनी गोणपाटावर सोयाबीनची उगवण क्षमता तपासली यामध्ये त्यांना 93 टक्के सोयाबीन उगवण करण्यास सक्षम असल्याचे आढळले. पद्मिनी बाई यांनी उत्पादित केलेला सोयाबीन उत्तम दर्जाचा असल्याने आणि बियाण्यासाठी उपयुक्त असल्याने दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा पद्मिनी बाईंनी दर ठरवून दिला. या दराप्रमाणे तालुक्यात तसेच लोहा आणि मुखेड तालुक्यात सोयाबीन बियाण्याची विक्री केली. यातून त्यांना दोन लाख 40 हजार रुपये उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता एक लाख 60 हजार रुपये निव्वळ नफा पद्मिनी बाई यांना राहिला. पद्मिनी बाई यांनी विपरीत परिस्थितीवर मात करीत कसे घवघवीत यश संपादन करायचे याचे एक उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.
Share your comments