राज्यात रब्बी हंगामात हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मौजे माळसापुर येथील एका जिगरबाज शेतकऱ्यांने देखील रब्बी हंगामात हरभरा पिकाची लागवड केली होती. श्रीमान दत्तराव रावसाहेब आवटे या मौजे माळसापुर येथील रहिवाशी शेतकऱ्यांने रब्बी हंगामातील हरभरा पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करून चांगला नफा अर्जित केला आहे.
त्यांनी घेतलेल्या या विक्रमी उत्पादनाचे पंचक्रोशीत मोठे कौतुक केले जात आहे. दत्तराव यांनी रब्बी हंगामात लावलेल्या हरभरा पिकातून सुमारे 40 क्विंटल हेक्टरी उत्पादन प्राप्त केले त्यामुळे त्यांनी पंचक्रोशीतील इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श घालून दिल्याचे सांगितले जात आहे. दत्तराव यांच्याकडे पंधरा एकर बागायती शेती आहे, खरीप हंगामात एवढ्या मोठ्या क्षेत्रावर त्यांनी कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन घेतले. मात्र, खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे व वातावरणात झालेल्या बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली. खरिपात नुकसान झाले असल्यावरही दत्तराव यांनी जोमाने रब्बी हंगामाकडे आपला मोर्चा वळवला.
खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी आपल्या पंधरा एकर जमिनीपैकी सुमारे पाच एकर क्षेत्रावर हरभरा लागवडीचे नियोजन आखले. रब्बी हंगामात त्यांनी जाकी 9218 या जातीच्या हरभऱ्याची लागवड करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जमिनीची योग्य पद्धतीने पूर्वमशागत करून घेतली, पूर्व मशागत केल्यानंतर रोगराईचे सावट येऊ नये या अनुषंगाने तसेच उत्पादन वाढीच्या अनुषंगाने हरभऱ्याच्या बियाण्यावर बीजप्रक्रिया देखील केली.
बीज प्रक्रिया केल्यानंतर त्यांनी हरभऱ्याची पेरणी केली, पेरणी करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर चा उपयोग केला आणि म्हणून त्यांना एकरी 32 किलो हरभऱ्याचे बियाणे लागले. पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी पेरणी करताना एकरी एक बॅग डीएपी खत वापरले. अशा रीतीने दत्तराव यांनी हरभरा पिकाचे योग्य व्यवस्थापन करून चांगले विक्रमी उत्पादन प्राप्त केले. दत्तराव यांना पाच एकर क्षेत्रातून 80 क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाले. एवढे दर्जेदार उत्पादन प्राप्त केल्या मुळे पंचक्रोशीतील इतर शेतकरी दत्तराव यांची भेट घेऊन त्यांच्याकडून हरभरा लागवडीच्या महत्त्वाच्या बाबी समजून घेत आहेत.
Share your comments