देशातील अनेक शेतकरी पुत्रांना शेती तोट्याचा सौदा वाटत असतो. शेतीमध्ये अहोरात्र काबाडकष्ट करून देखील पदरी तुटपुंजे उत्पन्न प्राप्त होते असा शेतकरी पुत्रांचा समज आहे. यामुळेच की काय, शेतकरी पुत्र आता शेतीकडे न वळता नोकरी मागे तसेच उद्योग धंद्यामागे पळत आहेत. मात्र, शेतीमध्ये काळाच्या ओघात परिवर्तन घडवून आणल्यास शेती फायदेशीर ठरू शकते आणि लवकरच यातून लखपती बनले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे अक्कलकोट तालुक्यातील एका अवलिया शेतकऱ्याने.
या अवलिया शेतकऱ्याने बाजारातील मागणी लक्षात घेता आणि पारंपरिक पिकाला फाटा देत कलिंगड लागवड करून केवळ दोन महिन्यात एक लाख रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. तालुक्यातील हंजगी येथील एका तरुण शेतकरी पुत्राने आपल्या दोन एकर बागायती क्षेत्रात कलिंगड पिकाची लागवड केली. लागवडीनंतर पिकाचे योग्य व्यवस्थापन करून अवघ्या दोन महिन्यात कलिंगड पीक काढणीसाठी तयार केले. अल्प कालावधीत या नवयुवक शेतकऱ्याने त्यातून चांगला नफा कमविला.
हेही वाचा:- नौकरीने मारलं पण काळ्या आईने तारलं! बेरोजगार झालेला युवक आता शेतीतून प्राप्त करतोय लाखोंची कमाई
कलिंगड अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होते, हे पीक केवळ 60 दिवसात उत्पादन देण्यास सज्ज होत असते. हीच बाब लक्षात घेऊन अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील संजय काळे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर बागायती क्षेत्रात कलिंगडची लागवड केली. लागवड केल्यानंतर योग्य पाण्याचे व्यवस्थापन योग्य खताचे व्यवस्थापन करीत या अवलियाने कलिंगडच्या पिकातून तब्बल 25 टन दर्जेदार उत्पादन प्राप्त केले. या दोन एकर कलिंगडच्या बागेतून खर्च वजा जाता या अवलिया शेतकऱ्याला एक लाख रुपये निव्वळ नफा राहिला असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा:- गजब! फक्त वीस गुंठ्यात 'या' शेतकऱ्याने मिरची लागवड करून कमविले सात लाख रुपये
संजय काळे या शेतकऱ्याला कलिंगड साठी साडेनऊ रुपये प्रति किलो असा दर मिळाला, विशेष म्हणजे या दरात त्यांच्या बांधावरच कलिंगडची खरेदी केली गेली. संजय काळे यांना तब्बल दोन एकर क्षेत्रातून 25 टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले. म्हणजेच संजय काळे यांना 2 लाख 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे सांगितले गेले. दोन एकर कलिंगड पिकासाठी संजय यांना जवळपास 90 हजार रुपये उत्पादन खर्च आला, या उत्पादन खर्चामध्ये मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन प्रणाली, बियाणे, कलिंगड पिकासाठी आवश्यक खत इत्यादी खर्चांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत खर्च वजा जाता संजय यांना सव्वा लाखाचा निव्वळ नफा मिळाला. आपल्याच शेती क्षेत्रातील दमदार यशामुळे संजय यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श घालून दिला आहे.
Share your comments