राज्यात सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रात कांदा उत्पादित केला जातो, महाराष्ट्र राज्य देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यांपैकी एक आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे केवळ कांदा पिकावर अवलंबून असते मात्र असे असले तरी, कांदा हा नेहमीच शेतकरी बांधवांसाठी बेभरवशाचा ठरत असतो, कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पादन प्राप्त होत नाही तर कधी सुलतानी दडपशाहीमुळे अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. यामुळे कांदा शेतकऱ्यांना नेहमीच रडवत असतो, परंतु यावर्षी कांदा पिकाने अनेकांना मालामाल केले आहे. सध्या राज्यात तसेच देशात सर्वत्र कांद्याची मागणी मोठी वाढली असल्याने कांद्याला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे म्हणून कांदा उत्पादक शेतकरी चांगले आनंदी असल्याचे बघायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या मौजे शिंदवणे येथील रहिवाशी शेतकरी सचिन विठ्ठल महाडिक यांच्यासाठी कांदा एक संजीवनी म्हणून कार्य करीत आहे, या शेतकऱ्याला अवघ्या तीस गुंठे कांद्याच्या क्षेत्रातून 2 लाख 32 हजार रुपयांचे जबराट उत्पन्न प्राप्त झाले आहे. हवेली तालुक्यात अनेक शेतकरी कांदा पिकाची लागवड करत असतात, अनेकदा परिसरातील शेतकऱ्यांना कांदा पिकातील उत्पादनखर्च काढणे देखील शक्य होत नसते असे असले तरी परिसरातील शेतकरी नेहमीच कांदा या नगदी पिकाला पसंती दर्शवित असतात. या वर्षी देखील येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. शिवारातील महाडिक या शेतकऱ्यांनी देखील कांद्याचे पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले आहे. मौजे शिंदवणे येथील शेतकरी सचिन महाडिक गेल्या पंधरा वर्षांपासून कांद्याचे उत्पादन घेत आहेत. या पंधरा वर्षात त्यांना कांद्याच्या लहरीपणाचा चांगलाच प्रत्यय आला आहे.
अनेकदा सचिन यांना कांद्यातून उत्पादन खर्च देखील काढता आला नाही परंतु असे असले तरी सचिन यांचे कांद्यावरचे प्रेम कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहे. कांद्याच्या याच प्रेमापोटी त्यांनी यंदादेखील 30 गुंठे क्षेत्रात कांद्याची लागवड केली, लागवड केल्यानंतर वातावरणात आमूलाग्र बदल घडून आला, हवामान बदलाचा सचिनच्या कांद्याला देखील मोठा फटका बसला मात्र योग्य नियोजनाने सचिन यांनी आपले कांद्याचे पीक जोपासले. सचिन यांनी कांदा पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग करून पाण्याचे व्यवस्थापन केले योग्य मार्गदर्शनाने त्यांनी कांद्यासाठी योग्य औषधांची निवड केली. सचिन यांनी आपल्या कांदा पिकासाठी रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा अधिक वापर केला.
त्यांनी कांदा पिकासाठी शेणखताचा जास्त वापर केला आणि रासायनिक खताचा अतिशय संतुलित वापर केला. त्यामुळे कांदा पिकाची उत्पादनक्षमता वाढली असल्याचे सचिनने नमूद केले. शिंदवणे शिवारातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी कवडीमोल उत्पादन प्राप्त झाले मात्र सचिन यांनी आपल्या योग्य नियोजनाने आणि अपार कष्टाने कांद्याच्या पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले. सचिन यांना 30 गुंठे क्षेत्रात कांदा लागवडीसाठी 50 हजार रुपये खर्च आला आणि त्यांना यातून जवळपास दोन लाख 32 हजार रुपयांचा विक्रमी उत्पादन प्राप्त झाले. खर्च वजा जाता 1 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांच्या पदरी पडले.
Share your comments