राज्यातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणात आधुनिकतेची कास धरीत आहेत, आधुनिकतेची कास धरून शेतकरी बांधव आता शेती क्षेत्रात नवनवीन नाविन्यपूर्ण प्रयोग कार्यान्वित करीत आहेत. असाच काहीसा हटके व नाविन्यपूर्ण प्रयोग पुणे जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने केला आहे. या अवलिया शेतकऱ्याने चक्क पांढऱ्या जांभळाची लागवड करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सराफवाडी मध्ये हा आगळा वेगळा व नावीन्यपूर्ण प्रयोग अमलात आणला गेला आहे. मौजे सराफवाडी येथील भरत वामन लाळगे या हुन्नरी शेतकऱ्याने हा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे.
इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली जाते, फळबाग पिकांपैकी जांभळाची देखील लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, परंतु तालुक्यात पांढऱ्या जांभळाची लागवड करण्याचा हा पहिलावहिला प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. यंदा प्रथमच सराफवाडी च्या भरत यांनी पांढऱ्या जांभळाची लागवड केली आहे आणि आगामी काही दिवसात या पांढऱ्या जांभूळ लागवडीतून हा अवलिया शेतकरी भरघोस उत्पादन प्राप्त करणार आहे. भरत नेहमीच आपल्या शेतीत नवनवीन पिकांची लागवड करीत आले आहेत, यंदा त्यांनी पांढऱ्या जांभळाची लागवड करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. या अवलिया शेतकऱ्याने ओडिशा राज्यातून पांढऱ्या जांभळाचे रोपे मागवली होती. जांभळाची रोपे मागवल्यानंतर भरत यांनी 12 बाय 12 या अंतरावर ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून पांढऱ्या जांभळाची लागवड केली.
भरत यांनी लावलेल्या जांभळाला यंदा तीन वर्षे कम्प्लिट झालेत, त्यामुळे त्यांनी यंदा प्रथमच या पांढऱ्या जांभूळचा बहार धरला आहे. सध्या भरत यांचे पांढरे जांभूळ फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत आणि उन्हाळ्याच्या शेवटी यापासून उत्पादन प्राप्त होणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. पांढऱ्या जांभूळमध्ये मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असल्याचा दावा केला जातो, त्यामुळे त्याचे सेवन मानवी आरोग्यासाठी विशेष लाभप्रद असल्याचे सांगितले जाते आणि म्हणूनच या पांढऱ्या जांभळाला विशेष मागणी असल्याचे सांगितले जाते. पांढरे जांभूळ आतून व बाहेरून पांढरेच असते, या फळाला देशांतर्गत एक मोठी बाजारपेठ आहे.
या फळाची मागणी दिल्ली बेंगलोर मुंबई पुणे यांसारख्या मेट्रो शहरात मोठ्या प्रमाणात असते. या फळाला इतर जांभळापेक्षा अधिक बाजार भाव प्राप्त होत असतो, या पांढऱ्या जांभळाला सुमारे चारशे रुपये प्रति किलोपर्यंत असा दर मिळत असल्याचे सांगितले जाते. भरत यांना पांढऱ्या जांभळाच्या शेतीसाठी आपल्या परिवारातील सदस्यांचे मोठे अनमोल सहकार्य लाभत आहे. भरत यांच्या मते, शेतकरी बांधवांनी नेहमीच शेती क्षेत्रात नवनवीन नावीन्यपूर्ण प्रयोग कार्यान्वित करणे काळाची गरज बनली आहे.
Share your comments