1. यशकथा

उद्योगशीलतेचा विस्मयपूर्ण प्रवास : पितांबरी

KJ Staff
KJ Staff


पितांबरी पावडरीचा जन्म गृहिणींच्या गरजेतून झाला असं म्हणता येईल. ही घराघरांत पोहोचलेली पितांबरी गेली तीस वर्षं विविध उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्‍वास उंचावतेच आहे. भांडी घासायची पावडर ते चंदनाची झाडं आणि लेमन ग्रास ऑईल ते स्वतःच्या जमिनीत उगवलेल्या फुलांच्या नैसर्गिक सुगंध व अर्कापासून तयार केलेल्या अगरबत्त्या, बांबू उत्पादन असा मोठा प्रवास आज पितांबरी समूहाचे सर्वेसर्वा श्री. रवींद्र वामनराव प्रभुदेसाई मोठ्या अभिमानाने सांगतात. कारण हा उद्योग विस्तारलाय चिकाटी, प्रामाणिकपणा, सर्जनशीलता व ग्राहकांच्या विश्‍वासातून....‘व्यवसाय करताना ग्राहकांशी प्रामाणिक राहावं लागतं, त्यांच्या नेमक्या गरजा ओळखाव्या लागतात.’

कोकणातील प्रभुदेसाई यांच्या घरातला मुलगा वडिलांसारखाच वेगळा विचार करतो आणि विज्ञान शाखेतील पदवी असताना नोकरी न करता व्यवसायच करायचा असं ठरवतो. अर्थातच, वडिलांची साथ असतेच! वेगळे विचार, संशोधनं करून ‘पितांबरी’च्या रुपाने मोठं साम्राज्य उभं करतो. पितांबरी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील कै. वामनराव प्रभुदेसाई यांची ही कहाणी! वामनराव प्रभुदेसाई यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. व्यवसायाची परंपरा घरातूनच असल्याने रवींद्र यांनी बी.एस.सी. केमिस्ट्री झाल्यावर मोझॅक टाइल्स बनवण्याचा बंद पडलेला कारखाना चालवायला घेतला. पण त्यात तीन लाखांचा फटका बसला. अकाउंटस, टॅक्सेशनची माहिती करून घेण्याबरोबरच माणसांशी व्यवहार कसे करायचे, हे समजायला हवं, असं या व्यवसायादरम्यान प्रभुदेसाई यांच्या लक्षात आलं. त्यासाठी मॅनेजमेंटचं रीतसर शिक्षण घेऊनच नव्या दमाने व्यवसाय सुरू करायचा असं त्यांनी ठरवलं. व्यवसायात निर्माण होणार्‍या त्रुटींवर मात करण्यासाठी शिकत राहायला हवं, हे त्यांचं तत्वज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे.

बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी’ ही प्रशांत दामले यांनी केलेली पितांबरीची जाहिरात गेली तीस वर्षे मराठी कुटुंबांवर राज्य करते आहे. त्या काळी घराघरांतून तांब्या-पितळ्याची भांडी वापरली जायची. चिंच, राखेने रगडून रगडून घासली तरच ही भांडी स्वच्छ निघायची. गृहिणींना आपला भरपूर वेळ, ऊर्जा त्यासाठी वापरावी लागायची. त्यावेळी विज्ञानात पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात पदविका घेतलेल्या श्री. रवींद्र वामनराव प्रभुदेसाई व त्यांचे वडील कै. वामनराव प्रभुदेसाई यांनी गृहिणींची नेमकी गरज ओळखली आणि ‘पितांबरी’ या पावडरीचा जन्म झाला. डीबीएम केल्यावर रवींद्र यांनी डिटर्जंट तयार करण्याचा व्यवसाय वडिलांच्या वापरात नसलेल्या जागेवर सुरू केला. ‘व्यवसायासाठी स्वतःची जागा असणं ही खूप जमेची बाब होती’ असं प्रभुदेसाई सांगतात.

त्यावेळी बाजारात डिटर्जंट अनेक होती; पण तांब्या-पितळेला लख्ख करणार्‍या साबणाची, पावडरीची उणीव होती. त्याचाच व्यवसायासाठी लाभ घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. पितळे-तांब्याची भांडी झटपट चकाचक करणारी ‘कॉपशाईन’ ही पावडर अथक संशोधनानंतर तयार झाली. सुरुवातीला ‘ताज’ सारख्या मोठमोठ्या हॉटेल्सना या पावडरची विक्री ते करत. नंतर हे उत्पादन घराघरांत पोहोचवण्याचा त्यांनी विचार केला. मोठ्या हॉटेल्सना अधिक स्वस्त उत्पादन देणारं कोणी भेटलं तर प्रभुदेसाई यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असता, ही काळाची पावलं आधीच ओळखून त्यांनी हा निर्णय घेतला. त्या पावडरीमध्ये फेरबदल करून ‘पितांबरी’ची निर्मिती झाली. त्यानंतर सेल्समन नेमून घराघरांतून त्याची छोट्या पिशव्यांमधून विक्रीही होऊ लागली. मागणी वाढल्यावर सेल्समनच त्यांचे एजंट झाले. विक्री व्यवस्थेची यंत्रणा उत्तम राबवण्यासाठी त्यांनी विविध राज्यांत वितरकही नेमले. ही पावडरच इतकी प्रभावी आहे, की ती बाजारात आणि तिथून घराघरांत कधी पोहोचली, हे कळलंच नाही. इतकी की ‘माहेरी जाणार्‍या बायकां’च्याही ती अंगवळणी पडलीय.


दर्जा कायम राखल्यामुळे इतकी वर्षं ही पावडर वाणसामानातला एक अविभाज्य भाग बनलीय. या पावडरीने उद्योगविश्‍वात इतिहास घडवला. 1999-2000 साली पितांबरी समूहाची वार्षिक उलाढाल 10 कोटी रुपये इतकी होती. त्याचवेळेला संकटांची मालिकाही त्यांच्या आयुष्यात सुरू झाली. कामगारांच्या समस्या, संप, त्यामुळे वेळेत ऑर्डर पुर्ण न करता येणं, कमी वयात उच्च रक्तदाब अशा अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं.

त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, की व्यवसायाच्या भरभराटीबरोबरच मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. मानसिक शांतता असेल तरच आपण व्यवसायवृद्धी चांगल्या पद्धतीने करू शकतो. ते म्हणतात, “तो माझ्यासाठी परीक्षेचा काळ होता. विचार केल्यावर लक्षात आलं, की ताण येत नाही तर तो घेतला जातो. व्यवसाय असेल तर तो ताण कितीतरी पटींनी वाढतो. अशावेळी ब्रह्मविद्या, प्राणायाम, अध्यात्मिक साधना, नामजप, ध्यान-धारणा आणि संध्याकाळचं निसर्गाच्या सानिध्यातलं चालणं हे माझ्या जीवनशैलीत आणलं आणि त्यानं मला तारलं. शास्त्रीय संगीत नित्यनेमाने ऐकू लागलो, त्यामुळे मन ताजंतवानं होतं. या जीवनशैलीतून ताणामुळे येणारे नकारात्मक विचार माझ्यापासून लांब राहू लागले. व्यवसायानिमित्ताने असंख्य माणसांना भेटावं लागतं, तरीही ताणतणाव माझ्यापासून दूर राहतो.”

व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमधून रवींद्र खूप शिकले. व्यवसाय असेल तर चढउतार येणार, कधी आर्थिक संकटंही येणार हे गृहीत धरून वागायला हवं, असं त्यांना वाटतं. अपयशानं घाबरायचं नाही, तर खंबीरपणे पुढं जायचं, असं ते आवर्जून सांगतात. तसंच कोणत्याही व्यावसायिकाने भाबडेपणा दाखवून चालत नाही, तर धूर्तपणा आणि मुत्सद्दीपणा त्याच्या अंगी असलाच पाहिजे. रवींद्र यांनाही एक कटू अनुभव आला. गुजरातमधील एका व्यापार्‍याने पितांबरीची नक्कल करून तशी पावडर विकायला सुरुवात केली. त्याचा पितांबरीवर परिणाम होत होता. त्या मालाची गुणवत्ता चांगली नसल्यानं पितांबरीचं नाव खराब होण्याचाही धोका होताच. त्याच्यावर ठाण्यात केस करून प्रभुदेसाई यांनी त्याला वठणीवर आणलं. अशावेळी भाबडेपणापेक्षा मुत्सद्दीपणा उपयोगी पडतो, असं ते सांगतात. काळओघात तांब्या-पितळ्याची भांडी वापरणं कमी होईल, पण तरीही देवघर, न्हाणीघर, स्वयंपाकघर अशा ठिकाणी काही भांडी सामान्य माणूस तांब्या-पितळेची वापरणार ही दूरदृष्टी प्रभुदेसाई यांच्याकडं होती. तसंच केवळ या पावडरीच्या यशावर समाधान न मानता स्वच्छता, खाद्य, आयुर्वेद, परिमळ अशा उत्पादनांमध्ये उतरण्याचा निर्णय ही देखील त्यांची दूरदृष्टीच!

सुगंधित फुलांकडे...

पितांबरीच्या दमदार उत्पादनानंतर श्री. रवींद्र प्रभुदेसाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील तळवड्याला त्यांच्या काकूंकडे गेले. तिथं आणखी वेगवेगळी उत्पादनं तयार करायचा विचार त्यांना सुचला. कोकणातील दापोली म्हणजे अर्थातच भात शेतीचा परिसर. दापोलीजवळ एका ओळखीच्या व्यक्तीकडून त्यांनी दोन एकर शेतजमीन विकत घेतली. तिथं श्री. वालावलकर यांच्याकडून सौंदर्या जातीच्या सोनचाफ्याची लागवड केली. रोज तीनशे ते चारशे फुलं यायला लागली. या फुलांची विक्री कुठं करणार? ही टवटवीत फुलं तशीच्या तशी मुंबईला आणण्याचा हरतर्‍हेनं प्रयत्न केल्यानंतर प्रभुदेसाई यांच्या असं लक्षात आलं, की फुलं नाशवंत असल्यानं लगेच कोमेजतात. त्यामुळे ती तशीच्या तशी विक्रीसाठी पाठवता येणार नाहीत. नवनवीन प्रयोग करण्याची सवय, धाडस आणि कल्पकता असल्यानं प्रभुदेसाई हे हतबल झाले नाहीत, की त्यांनी पिक पद्धती बदलली नाही. त्यांच्या सुसज्ज संशोधन आणि विकास सेंटर मध्ये या फुलांचा नैसर्गिक अर्क तयार केला. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की नैसर्गिक सुगंधाच्या सोनचाफ्याच्या कॉन्सन्ट्रेटला देशातूनच नव्हे; तर परदेशातूनही मागणी येऊ लागली.

यावरच समाधान न मानता त्यांनी विविध फुलांच्या अगरबत्तीच्या क्षेत्रात संपूर्ण तयारीनिशी उतरायचं ठरवलं. बाजारातल्या बहुसंख्य ब्रँडच्या अगरबत्त्या भरपूर रसायनं वापरून तयार केलेल्या असल्यानं रसायनविरहित नैसर्गिक वासाच्या अगरबत्त्यांचा ब्रँड ‘देवभक्ती’ या नावानं रजिस्टर करायचा असं त्यांनी ठरवलं. सोनचाफ्यानंतर चाफा, निशिगंधा, चमेली, मोगरा, कृष्णकमळ, गुलाब, पारिजातक, अनंताची पांढरी फुलं या फुलांच्या नैसर्गिक वासाच्या दुर्मिळ अगरबत्त्यांचा वास आता महाराष्ट्राबरोबरच गुजरात व कर्नाटकमध्येही दरवळतोय. पितांबरीप्रमाणेच या अगरबत्त्यांच्या जाहिरातीही दूरचित्रवाणी संचावर झळकताहेत. संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतही या अगरबत्त्या लोकप्रिय ठरताहेत. सुरुवातीची 2 एकरची जागा आता 55 एकर इतकी विस्तारली आहे. ग्राहक उपयोगी उत्पादन तयार करायचं तर त्यासाठी लागणारा कच्चा माल आपलाच हवा, अशी श्री. प्रभुदेसाई यांची धारणा आहे. आपल्या शेतातील फुलांचा दरवळ अगरबत्त्यांच्या रूपानं देश-परदेशापर्यंत पोहोचला आहे, याचं समाधान वाटतं. दुबई, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, इंग्लंड, अमेरिका इत्यादी ठिकाणीही लोकांची या अगरबत्त्यांना पसंती आहे.”


स्वयंपूर्णतेच्या दिशेनं वाटचाल...

अगरबत्तीसाठी कच्चा माल म्हणजे फुलं स्वतःच्या शेतातून तयार करणार्‍या प्रभुदेसाई यांनी अगरबत्ती निर्मितीसाठी लागणार्‍या काड्यांसाठी बांबूच्या झाडांची लागवडही सुरू केलीय. कारण त्यांना त्या बांबूच्या काड्या चीन किंवा व्हिएतनाममधून आणाव्या लागायच्या. या काड्यांच्या निर्मितीसाठी दापोलीला त्यांनी बांबूसाठीची टिश्यू कल्चरची लॅब सुरू केली आहे. यात बांबूच्या तीन जाती असून पाच वर्षांत बांबू तयार होतो. भारतात आसाम, रांची, मध्यप्रदेशमधून कोकणात आणायचा त्यांचा विचार आहे. केरळ, आसाम आणि कोकण इथलं हवामान सारखं असल्यानं हे शक्य होतंय. त्यासाठी कोकणात बांबू स्टिक्स तयार करणारी मशीनरीही घेतलीय. बांबू संशोधन आणि टिश्यू कल्चर रोपनिर्मितीसाठी कोकण कृषी विद्यापीठाशी करारही केलेला आहे. टिश्यू कल्चर बांबूची कंत्राटी पद्धतीची शेती करून कोकणातल्या अनेक शेतकर्‍यांना ‘निश्‍चित उत्पन्न’ देणारा रोजगार पितांबरी उद्योग समूहानं दिलाय. तसंच तळवड्याला ऊसाची लागवड करून गुर्‍हाळाबरोबरच पावडर स्वरूपातील गूळ आणि काकवीचा ब्रँडही ‘रुचियाना’ ब्रँडनेम अंतर्गत सुरू केलाय. आता फ्लेवर्ड काकवीही बाजारात आणणार असल्याचं प्रभुदेसाई सांगतात.

गवती चहाचं तेल...

अगरबत्त्यांच्या बरोबरीनं गवती चहाच्या पानांपासून लेमन ग्रास ऑईल काढण्याची प्रक्रियाही श्री. प्रभुदेसाई यांनी सुरू केली. त्याबद्दल ते माहिती देतात, “तळवडं परिसरात लोकांच्या पडीक जमिनी खूप आहेत. अर्जुना नदीवर करक गावात धरण झालंय. त्यामुळं बारमाही पाणी असतं. नव्वद दिवसांनी तयार होणारं गवती चहाचं पिक तिथं वीस एकरवर लावलंय.” ही गवती चहाची रोपं त्यांनी परदेशातून आणली असून त्याला ठिबकने पाणी दिलं जातं. सध्या एल एट व कृष्णा जातीची रोपं तिथं लावली आहेत. वीस एकरात तीन भागांमध्ये ही पिकं लावलेलं असून तिथं गवती चहाचा अर्क काढणारं यंत्रही आहे. कृषीपदवीधारक विद्यार्थी, केमिस्ट आणि इतर कामगार वर्ग आहे. वीस एकरचं एक याप्रमाणे तीन युनिटस् असून एका युनिटमधून रोज दहा लिटर गवती चहाचं तेल विकलं जातं. गवती चहाच्या तेल प्रक्रियेसाठी चिपळूणला 40 एकर, पेडांबे गावात 40 एकर, तळवड्याजवळ सौंदळ गावात 60 एकर जागा घेतली आहे. सध्या शंभर एकरवर पाच युनिटस्मध्ये हे काम चालतं.

भांडी घासायचा बार, हात धुण्याचा साबण, तसंच खाद्यपदार्थांमध्ये लेमन फ्लेवरसाठीही हे तेल वापरलं जात असल्यानं त्याला आणखी मागणी आहे. त्यामुळे हा प्रकल्प पाचशे एकरवर करायचा त्यांचा मानस आहे. याबरोबरच ठाणे जिल्ह्यातील वाड्याच्या पुढं 40 एकर जमिनीवर पामारोशा वनस्पतीची नर्सरी उभी केलीय.

चंदनाचे परिमळ...

याबरोबरच पितांबरी उद्योग समूहाने तळवडं, ताम्हणे, दापोली इथं चंदनाची दोन ते तीन हजार झाडं लावली आहेत. कर्नाटक आणि केरळबरोबरच आता महाराष्ट्रही चंदनाच्या उद्योगाबाबत लवकरच ओळखला जाईल. कोकणच्या भूमीत चंदनाचं रोपटं रुजेल काय, यावर उत्तर देताना श्री. प्रभुदेसाई सांगतात की, “चंदनाच्या बाजूला तुरीची झाडं लावावी लागतात. ही तुरीची झाडं चंदनाला हवं असलेलं खाद्य देतात.” अजून 15 वर्षांनी चंदनाचं खोड तयार होईल. चंदनाच्या एका झाडाच्या खोडाची किंमत 20 लाख रुपये असते, तर चंदनाच्या एका लिटर तेलाची किंमत एक लाख रुपये असते. कोंकण कृषी विद्यापीठ, कर्नाटक सरकार आणि पितांबरी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने चंदनाचा मोठा प्रकल्प भविष्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी चंदनाची रोपं बंगळुरू आणि केरळहून आणली जातात.

पितांबरी उद्योगसमूहाने माणसाला आवश्यक असणार्‍या गरजा शोधून त्याप्रमाणे अत्यंत दर्जेदार वस्तूंची उत्पादने सुरू केली. तब्बल 30 वर्षं आपली प्रतिमा ग्राहकांच्या मनात प्रामाणिकपणे ठसवणं हे काही सोपं काम नसतं. पण ते शक्य केलं; इतकंच नव्हे तर पितांबरी पावडरबरोबर अगरबत्त्या, सुगंधी वनस्पतींची लागवड, बांबू, ऊस, गूळ, सिट्रोनेलासारख्या औषधी वनस्पतींची लागवड, गवती चहापासून तेलनिर्मिती, टिश्यू कल्चर केळी आणि चंदनाची लागवड... हा प्रवास मोठा आणि विस्तारणाराच आहे. एक मराठी माणूस इतकं मोठं उद्योगविश्‍व उभं करतो आणि हजारो हातांना काम देतो, हजारो वितरकांच्या संपर्कात असतो, पडीक जमिनीही लागवडीखाली आणतो. कोकणच्या मातीतली ही कहाणी विस्मयचकित करणारी आहेच; पण प्रेरणादायीही आहे.

गोमूत्र प्लस कॅप्सुल म्हणजे निरोगी देशी गाईचे गोमुत्र. हिरडा, बेहडा व आवळा यांचा संगम. गोमूत्र प्लसमध्ये त्याचा वापर करून पितांबरी समूहाने गोमूत्राची उपयुक्तता वाढवली. पाच उपकंपन्या असलेला हा भारतातील मोठा उद्योगसमूह गुणवत्ता, कल्पकता व सातत्याच्या जोरावर दिवसेंदिवस उद्योगाची नवी शिखरं पादाक्रांत करत आहे. रबाळे इथं स्वतंत्र संशोधन व विकास विभागात आयुर्वेदिक औषधांची गुणवत्ता तपासली जाते. नेपाळ, इराण, दुबई, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका यांसह अनेक देशांत आज पितांबरीची विविध उत्पादनं पाहायला मिळतात. क्युअर ऑन हे वेदनाशामक व वसुंधरा बेबी मसाज ऑईल यांसह सॅनीटॉलसारखी उत्पादनं म्हणजे रोजच्या जगण्याला आवश्यक असणार्‍या गोष्टी. 2018-19 साली 200 कोटी रुपये उलाढाल असलेल्या पितांबरी समूहाचे प्रभुदेसाई यांना वाचनाचा छंद आहे. घरच्या वाचनालयात पुस्तकं वाचत मोकळा वेळ व्यतीत करायला त्यांना आवडतो. अध्यात्म, वाचन, संगीत, निसर्ग त्यांना अधिकाधिक समृद्ध करणार्‍या बाबी आहेत, असं त्यांना वाटतं.

उद्योग म्हणजे नफा, विकास हवा, दरवर्षी कमीत कमी 25 टक्के वाढ हवी. त्यांनी हेल्थ केअर क्षेत्रात प्रवेश केला आहे. फूड, अ‍ॅग्रो, निर्यात याद्वारे उलाढाल वाढवणार आहेत. नफा जास्त मिळावा यासाठी मुल्यवर्धन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणतात. कंपनी आपल्या हातातून निसटेल का वगैरे अनाठायी भीती न बाळगता रवींद्र यांनी संचालक मंडळाची नेमणूक केली, सीईओची नियुक्ती केली. कंपनी अजून 150 वर्षे टिकली पाहिजे हा उद्देश. पितांबरी समूहाचे प्रमुख श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्याकडं खरोखरच ‘चंदनाचा परिमळ’ आहे, असं अभिमानानं म्हणावं लागेल.

लेखक:
शिल्पा दातार-जोशी
नाशिक

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters