2020 मध्ये संपूर्ण जगावर कोरोनाव्हायरस नामक महाभयंकर आजाराचे सावट बघायला मिळाले होते, त्यामुळे संपूर्ण जग जैसे त्या परिस्थितीत थांबले होते. भारतात देखील 2020 च्या मार्च महिन्यात कोरोना नामक महाभयंकर आजाराने त्राहिमाम माजवला असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे डबघाईला आले होते, त्या लोकडाऊन च्या काळात अनेकांना मोठ्या भीषण समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र असे असले तरी या लॉकडाउनमुळे काही सकारात्मक बाबी देखील भारतात नजरेस पडल्या.
अशीच एक सकारात्मक बाब घडली ती उस्मानाबाद जिल्ह्यात, जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील मौजे शिराढोण गावातील रहिवासी शेतकरी सुभाष माकोडे लॉकडाऊन च्या काळात टोमॅटो शेती करून करोडपती झालेत. त्याचं झालं असं 2020 च्या मार्च मध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदी मुळे सुभाष यांचे औषध दुकान बंद होण्याच्या मार्गावर आले, त्यामुळे सुभाष यांनी उदरनिर्वाह भागवण्यासाठी शेतीची कास धरण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सुभाष यांनी टोमॅटो शेती करण्याचा निर्णय केला आणि आयर्मान जातीच्या टोमॅटोची लागवड केली. सुभाषने एका एकरात साडे पाच हजार टोमॅटो रोप लावली, म्हणजे एकूण 12 एकर क्षेत्रात त्यांनी 72 हजार टोमॅटोची रोपे लावली. मात्र ज्या पद्धतीने लॉकडाऊनने त्यांचे औषध दुकान बंद करून टाकले त्याच पद्धतीने टोमॅटो शेती साठी देखील कोरोनानामक व्हायरस काळ बनला. टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन त्यांनी प्राप्त केले मात्र संपूर्ण राज्यात नव्हे नव्हे तर संपूर्ण देशात संचारबंदी कायम असल्याने त्यांना त्यांचा शेतमाल विक्री करण्यास अडथळे आले, मात्र असे असले तरी टोमॅटो पिकासाठी लागलेला उत्पादन खर्च त्यांनी वसूल केला.
उत्पादन खर्च वसूल झाला असल्याने सुभाष यांना टोमॅटो शेती त्यांना तारू शकते असा आशावाद निर्माण झाला त्या अनुषंगाने त्यांनी परत एकदा आयुर्मान जातीच्या टोमॅटो लागवड करण्याची तयारी अंगी बाळगली. पुन्हा बारा एकर क्षेत्रात त्याच जातीच्या टोमॅटोची लागवड केली, त्यांनी यावेळी मल्चिंग पेपरचा वापर करत टोमॅटो लागवड केली. टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर त्यांनी, टोमॅटो पिकातुन दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले. आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर, व आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे सुभाष यांनी अवघ्या चार महिन्यात एक कोटी रुपयांचे उत्पन्न टोमॅटो पिकातून प्राप्त केले. सुभाष यांच्या मते, टोमॅटो लागवड करण्यासाठी त्यांना सुमारे 20 लाख रुपये पर्यंतचा खर्च आला होता म्हणजे उत्पादन खर्च वजा जाता सुभाष यांना निव्वळ 80 लाख रुपये नफा प्राप्त झाला. सुभाष यांनी टोमॅटोसाठी देशांतर्गत असलेल्या सर्व बाजारपेठांची माहिती जमा केली आणि त्या अनुषंगाने आपला माल देशांतर्गत मोठमोठ्या बाजार समितीत पाठवला.
त्यांनी बैंगलोर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, गुलबर्गा, केरळ, आंध्र प्रदेश या देशातील नामांकित बाजारपेठेत आपले टोमॅटो विक्रीसाठी पाठवले आणि त्याबदल्यात त्यांना चांगला नफा देखील मिळाला. सुभाष यांनी टोमॅटो पिकातून अवघ्या चार महिन्यात 15000 कॅरेट टोमॅटो उत्पादित केले. एवढेच नाही सुभाष यांनी आपल्या गावातील सुमारे 40 महिला आणि तीन पुरुषांना टोमॅटोच्या संपूर्ण हंगामभर दररोज रोजगार उपलब्ध करून दिला. सुभाष यांचे दैदीप्यमान यश इतर युवा शेतकऱ्यांसाठी खरंच प्रेरणादायी सिद्ध होणार एवढे नक्की.
Share your comments