सध्या शेतकरी आता शेतीमध्ये ज्या पिकांची लागवड करतात ती करण्या अगोदर संबंधित पिकाची बाजारपेठ उपलब्धता पाहूनच लागवड केली जाते. तसेच बरेचसे शेतकरी हे विकेल तेच पिकेल या संकल्पनेवर आधारित पिकांची लागवड करताना सध्या दिसत आहे
.कारण नुसते पिकांच्या लागवडीला महत्त्व नसून संबंधित पिकाला बाजारपेठेत किती मागणी आहे हे पाहणे जास्त महत्त्वाचे असते. आणि त्या दृष्टीने पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. असाच एक बदल एका शेतकऱ्याने करून चांगल्या प्रकारे यश मिळवले आहे. अशा शेतकऱ्यांची या लेखात माहिती घेऊ.
शेतकऱ्याची यशोगाथा
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हर्दोली या गावचे शेतकरी सेवकराम यांनी पीक पद्धतीचा बदल स्वीकारत मिरची लागवड केली व ही मिरची सध्या राजधानी दिल्लीच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे.दिल्लीच्या बाजारपेठेमध्ये मिरचीला मागणी असल्यानेथेट शेताच्या बांधावर येऊन व्यापारी मिरची खरेदी करीत आहेत.पीकपद्धतीत केलेला बदल हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. बरेच शेतकरी अजूनही पारंपरिक पिकांची लागवड करतात. यामध्ये ते कोणत्याही प्रकारच्या नफातोट्याचा विचार करीत नाही.
परंतु बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन उत्पादन घेतले तर चांगल्या प्रकारच्या आर्थिक उत्पन्न हातात येऊ शकते. हे हर्दोली येथील सेवक लाल झंझाड यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी भाजीपाल्याचे यशस्वीरीत्या उत्पादन घेतले व विक्री व्यवस्थेच्या जोरावर ते विकून देखील दाखवले. अगोदर पारंपरिक पिकांची लागवड करणारे सेवकराम यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने पीक पद्धतीत बदल केला व त्यानुसार पिकलेली मिरची आता थेट दिल्लीच्या बाजारात पोचली आहे. हिरव्या मिरचीला दिल्लीत मागणी वाढली असल्याने मिरचीचे दरही वाढले आहेत. मालाची गुणवत्ता आणि त्या मालाला बाजारपेठेत चांगली मागणी असली तर कुठलेही पीक चांगले उत्पन्न देऊ शकते.
सध्या हीच गोष्ट हिरव्या मिरचीला लागू होत आहे. मिरचीला दिल्ली मार्केटमध्ये चांगली मागणी असल्यामुळे व्यापारी थेट बांधावर येऊन मिरचीची खरेदी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील वाचला असून नफ्यातवाढ झाली आहे. त्यामुळे पीक पद्धतीत बदल आणि परिस्थितीनुसार मार्केटचा अभ्यास करून जर शेती पिकांचे नियोजन केले तर यश मिळवणे तितकेसे अवघड नाही.
Share your comments