सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. सध्या मिळत असलेल्या दरात कांदा लागवडीसाठी आलेला खर्च आणि वाहतुकीचा खर्च काढणे देखील अशक्य असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी नमूद करत आहेत. कांद्याच्या दराचा लहरीपणा नाशिक मधील एका शेतकऱ्याला चांगलाच ठाऊक होता यामुळे या शेतकऱ्याने कांदा पिकाला बगल दाखवत कलिंगड या हंगामी पिकांची लागवड केली आणि या शेतकऱ्यांसाठी हा बदल खूपच फायदेशीर ठरत आहे.
नाशिक जिल्ह्यातील मांडवड येथील विजय आहेर या शेतकऱ्याने कांदा या नगदी पिकाच्या लागवडीकडे पाठ फिरवत कलिंगडची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कलिंगड लागवड करण्यासाठी विजय यांना जवळपास दहा हजार रुपये खर्च आला. कलिंगड पिकासाठी त्यांना फवारणीचा खर्च आला नाही याशिवाय पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात बचत झाली. कलिंगड लागवडीसाठी त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला मल्चिंग पेपर अंथरून विजय यांनी कलिंगड लागवड केली आणि पाण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला.
यामुळे रोगराईचा धोका टळला आणि पाण्याची बचत झाली. विशेष म्हणजे कलिंगड लागवड केल्यापासून फक्त 70 दिवसांच्या कालावधीत कलिंगडाचे उत्पादन त्यांना मिळाले. 70 दिवसात त्यांनी 80 क्विंटल कलिंगड उत्पादित केले आणि 900 रुपये क्विंटल या दराने विक्री केली. विजय यांचे कलिंगड त्यांच्या बांधावरच खरेदी केले गेले आणि त्यांना यातून 70 हजार रुपये मिळाले.
आहेर सांगतात की, जर त्यांनी कलिंगड लागवड केली असती तर त्यांना 70 क्विंटलच्या आसपास कांद्याचे उत्पादन झाले असते. सध्याच्या बाजारभावात त्यांना यातून केवळ 45 हजार रुपये मिळाले असते. यात कांदा लागवडीचा खर्च वजा करता त्यांना केवळ पंधरा ते वीस हजार रुपये नफा मिळाला असता.
एवढेच नाही कांदा लागवड केली असती तर त्यांच्या कांदा पिकाला पाण्याअभावी तसेच सोडून द्यावे लागले असते. कारण की विजय यांनी कलिंगडाचे उत्पादन घेतल्यानंतर लगेचच धरणाचे पाणी आटले. यामुळे कांद्याला कदाचित तीन-चार महिने पाणी पुरलेचं नसते. यामुळे विजय यांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर ठरला आहे.
Share your comments