यशोगाथा ; शेतीला कुक्कुटपालन अन् शेळीपालनाची जोड देऊन मिळाली नवी ओळख

02 October 2020 02:40 PM


आजच्या तंत्रज्ञान युक्‍त वातावरणात सगळ्याच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब होताना दिसत आहे.  त्याला शेती क्षेत्र सुद्धा अपवाद नाही, परंतु होते असे की शेती ही पावसावर अवलंबून असते.  कधी अत्यंत कमी पाऊस तर कधी अतिपाऊस यामुळे शेतीत प्रचंड प्रमाणात आर्थिक तोटा होतो.  शेतीमालाच्या किमतीतील अनियमितता, काही अंशी सरकारी धोरणे हे सगळी कारणे शेतीत तोट्याचे गणित दाखवतात.  मग एक सर्वमत बनते की, शेती परवडत नाही. परंतु याच सगळ्या वस्तुस्थितीला फाटा देत काही तरुण शेतकरी हे आव्हान स्वीकारून अफाट जिद्द, कष्ट व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर शेती कशी फायद्याची आहे.  किंवा फायद्याची होऊ शकते हे सिद्ध करून दाखवतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत खेडा (जळगाव) येथील तरुण हरहुन्नरी शेतकरी योगेश तोयाराम महाजन. योगेश यांच्या संघर्षाची व शेती व शेतीला जोडधंदा म्हणून उभारलेला गोट फार्म,  कुक्कुटपालन व त्याविषयीच्या आर्थिक गणित त्याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 योगेश तोयाराम महाजन हे मूळचे हनुमंत खेडा( जळगाव) येथील शेतकरी आहेत.  त्यांच्याकडे स्वतःची तीन एकर बागायती जमीन आहे. त्या जमिनीत ते कपाशी, मिरची, काकडी, वांगी इत्यादी पिके घेतात. या सर्व पिकांसाठी त्यांनी शेतात ठिबकचा वापर करून योग्य नियोजन केले आहे. पण शेती करीत असताना त्यांनी अल्प गुंतवणुकीतून शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. 

योगेश यांचे शेळीपालनाचे नियोजन

 शेतीला एखाद्या जोडधंद्याची जोड देऊन उत्पन्नात वाढ करण्याचे मार्ग चोखंदळत असताना त्यांना मालखेडा येथील शेळी पालक लीलाधर पाटील यांची यशोगाथा वाचण्यात आली.  त्यानंतर योगेश यांनी  त्यांच्याशी संपर्क साधून शेळीपालनातील बारकावे,  नियोजन वगैरे गोष्टी समजून घेतल्या.  त्यानंतर योगेश यांनी शेळीपालन व्यवसाय उतरण्याचे ठरवले.  त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम सन २०१७ च्या अखेरीस चार शेळ्या खरेदी केल्या. त्यानंतर शेळ्यांमध्ये वाढ होत जाऊन आजमितीस त्यांच्याकडे लहान-मोठे पकडून एकूण ४० शेळ्या आहेत. त्यांनी त्यांच्या शेतातच म्हाळसाई गोट फार्म या नावाने छोटेखानी उत्तम नियोजनात्मक शेड बांधून त्यात शेळीपालनाला सुरुवात केली.

याविषयीची अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, शेळीपालनातील व्यवसाय, बकऱ्याचे संख्या कशी वाढवावी, याबद्दल त्यांनी सांगितले की, ते फक्त बोकडांची विक्री करतात. म्हणजेच योगेश महाजन शेळी विकत नाहीत कारण शेळीपालनात शेळ्यांची संख्या वाढवण्यासाठी ते शेळी विकत नाहीत. त्यामुळे होते असे की, फार्म मधील शेळ्यांची संख्या वाढत जाऊन उत्पन्नातही वाढ होते.  शेळीपालनातील आर्थिक गणित समजावून सांगताना त्यांनी सांगितले की,  बोकड साधारणतः ६ ते ७ महिन्याचे झाले की ते विकतात. यामधून त्यांना वर्षाकाठी एक ते सव्वा लाख रुपये मिळतात.  त्यांच्या शेडमध्ये एकूण ४० शेळ्या असून सगळ्या गावरान जातीच्या आहेत.  तसेच त्यांनी ४० शेळ्या मागे तीन उत्तम प्रकारचे नर बोकड प्रजननासाठी ठेवले आहेत.

 


शेळ्यांच्या चाऱ्याचे नियोजन

योगेश महाजन यांनी शेळ्यांच्या चाऱ्याच्या नियोजनाविषयी माहिती देताना सांगितले की, वर्षाच्या पावसाळ्याचे चार महिने ते बंदिस्त शेळी पालन करतात.  उरलेल्या ८ महिने ते शेळ्यांना चारण्यासाठी माळरानावर नेतात.  तेथे काटेरी वनस्पती, झुडपे त्याचा उपयोग शेळ्यांना चाऱ्यासाठी होतो.  या ८ महिन्यात दररोज सकाळी व संध्याकाळी शेळ्यांना चराईसाठी सोडण्यात येते.  पावसाळ्याचे चार महिन्याचे चाऱ्याचे नियोजन करताना त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या शेतात लावलेला हिरवा मका, ज्वारी, दादर यापासून उत्तम प्रतीचा मुरघास बनवून ठेवतात. हा मुरघास साठवून ठेवण्यासाठी खास पद्धतीच्या बॅग कोपरगाववरुन आणून त्या बॅगा भरून ठेवतात.  त्या मुरघासचा उपयोग त्यांना पावसाळ्याच्या चार महिन्यात शेळ्यांना चारा म्हणून होतो.  या सगळ्या नियोजनाने खाद्यावरील खर्चात बचत होऊन शेळीपालन आर्थिकदृष्ट्या फायद्याचे बनत आहे. 


अल्‍प गुंतवणूक करून सुरु केला गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय

योगेश महाजन यांनी शेळीपालनासोबत गावरान कोंबड्यांचे पालन सुरू केले. त्यासाठी त्यांनी अल्पशी गुंतवणूक करून चार मादी व एक नर कोंबडा खरेदी केला. आज मितीस एका वर्षात त्यांच्याकडे लहान मोठ्या गावरान जातीच्या ५० ते ५५ कोंबड्या आहेत.  या कुक्कुटपालनाच्या आर्थिक गणित समजावून सांगताना त्यांनी सांगितले की, ते आजूबाजूच्या परिसरात गावरान अंड्यांची विक्री करतात.  एका दिवसात कोंबड्यांपासून त्यांना दिवसाकाठी २० अंडी मिळतात.  अंड्यांची विक्री बारा रुपयाप्रमाणे करतात.  या विक्रीतून त्यांना दिवसाकाठी २४० ते २५० रुपये मिळतात.

महिन्याचा विचार केला, तर महिन्याकाठी ७ हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळते.  तसेच कोंबडीची विक्रीविषयी त्यांनी सांगितले की, ते फक्त कोंबडा विकतात, कोंबडी विकत नाहीत. कारण त्यांना कोंबड्यांची संख्या वाढवायची आहे. त्यासाठी ते अंडी उबविण्यासाठी कोंबड्या बसवितात, त्यामुळे त्यांच्या कोंबड्यांची संख्या वाढवण्यास मदत होते. कोंबडा विक्रीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की,  एक कोंबडा ते स्थानिक बाजारात ७०० ते ८०० रुपयाला विकतात.  एका वर्षात साधारणपणे १० ते १२ कोंबड्यांची विक्री केली जाते.  यामधून या अंड्यांची विक्री व कोंबड्यांची विक्री यामधूनही अल्प गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळते.

 


तंत्रशुद्ध शेतीचे नियोजन

योगेश महाजन यांनी त्यांच्या शेतीविषयी माहिती देताना सांगितले की, ते बहुतांशी भाजीपाला वर्गीय पिके घेतात. म्हणजेच ३ एकर मधून २ एकरात त्यांचा भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. सध्या त्यांनी दीड एकर अंकुर  १४१२ या वाणाचे वांगे लावले आहेत. साधारण त्याचे उत्पादन ते  मार्चपर्यंत घेतात. दर तीन दिवसाला वांग्याचा तोडा होतो, प्रति तोळा त्यांना ६ ते ७ क्विंटल उत्पादन होते. पारोळा, अमळनेर बाजार समितीत ते वांगे विक्रीस नेतात. सरासरी दर २० ते २५ रुपये मिळत आहे. त्यामधून  त्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. त्यासोबतच ते मिरची व काकडी ही लावतात. मिरची ते विक्रीसाठी सुरतला नेतात गेल्या वर्षी त्यांना मिरचीला २० रुपये किलो दर मिळाला होता. यावर्षी ३० ते ३५ रुपये किलो दर मिळत आहे. हे लावलेले वांग्याचे उत्पादन हे  मार्चपर्यंत घेतले जाईल. त्यानंतर जूनमध्ये हे वांगे उपटून पीक फेरपालट करून दुसरा क्षेत्रावर परत जून महिन्यात वांगी लागवड करतात. अशा उत्तम प्रकारचे शेतीचे नियोजन योगेश करतात.

योगेश यांच्या उदाहरणावरून असे दिसते की, भलतेच मोठे स्वप्न न पाहता जर उत्तम नियोजन असले तर छोट्याशा गुंतवणुकीतून शेती व्यवसाय आणि त्याला पूरक शेळीपालना सारखे व्यवसाय केले तर कालांतराने फार मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे ही उक्ती योगेश महाजन यांना तंतोतंत लागू होते.

 संपर्क- योगेश महाजन

 मोबाईल नंबर-7620760900

यशोगाथा Poultry farming goat farming agriculture success story कुक्कुटपालन शेळीपालन शेती
English Summary: Success story - Poultry farming and goat farming have been added to agriculture

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.