1. यशकथा

शिवाजी महाराजांना आदर्श मानत केली अपंगत्वावर मात; उभारला स्वता:चा व्यवसाय

KJ Staff
KJ Staff


पुणे उत्तमराव डुकरे हे जुन्नर परिसरातील आदराने घेतले जाणारे नाव. त्याचा संघर्ष पाहून पंचक्रोशीतील तरुण शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष प्रेम आहे. त्याचे कारण तसेच विशेष आहे. आज हा एका पायाने अपंग असणारा शेतकरी जुन्नर परिसरातील कुक्कुटपालन करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचा आधारवड आहे. उत्तमराव हा पाच फुटाच्या शेतकऱ्याने कुक्कटपालन क्षेत्रात आपले स्वतःचे अग्रस्थान निर्माण केले आहे.  त्यांनी केलेला केलेला संघर्ष सुद्धा मोठा आहे. या सगळ्याचे श्रेय ते छत्रपती शिवाजी महाराजांना देतात. आपल्या  अंपगत्वावर मात करुन  उत्तमराव डुकरे यांनी यशाच्या शिखर गाठले आहे.  

उत्तमरावांचे आयुष्य वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत सामान्य होते. लहानपणी खेळत असताना लाकडाचा ओंडका त्यांच्या पायावर पडला आणि जखम झाली. जखम खोल होती.  घरच्यांनी गावात उपचार केले परंतु जखम भरून आली नाही.  निम्म्या पायात पु झाला. शहरातल्या डॉक्टरांनी पाय कापायला सांगितला. मग  जगण्याचा संघर्ष सुरू झाला. अचानक एक पाय गेल्याने उत्तरामराव कायमचे अधू बनले. मोठे होत असताना आपण आयुष्यात काही करू  शकणार नाही हे भूत त्यांचं मानगुटीवर बसले. पुढे जगण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रिपेरिंगचा आयटीआय केला. पण त्यातून त्यात पुरेसा पैसा मिळत नव्हता,  कसबसा घर खर्च निघत होता.

उत्तम डुकरे यांच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष स्थान आहे. त्यांच्या आयुष्याची प्रेरणा शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. जेव्हा शिवाजी महाराज पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना कळले तेव्हा त्यांना आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. एक पायाने अपंग असताना त्यांनी त्याच्या एम ८० या दुकाचीवर जुन्नर ते रायगड असा प्रवास केला. ते एका पायाने अपंग असूनदेखील रायगड किल्ला चढला.

त्यातनंतर त्यांनी कुक्कुटपालनाच्या व्यवसायात उडी घेतली. २००७ मध्ये केवळ ४००० पक्ष्यांपासून सुरू केलेला उद्योग १६००० पक्ष्यांपर्यंत पोहोचला आहे. हा त्यांचा प्रवास खूप संघर्षमय आहे.  उत्तम डुकरे म्हणतात कि, “सुरुवातीला मला अपयश आले. परंतु मी खचून गेलो नाही. कारण शिवाजी महाराजांची प्रेरणा माझ्यामागे होती. शिवाजी महाराजांना अनेकवेळा माघार घ्यावी लागली. पुरंदरचा तह करावा लागला. जवळपास सगळे जिंकलेले किल्ले गेले. शिवाजी महाराज न खचता पुढे गेले. पुढच्या तीन महिन्यात त्यांनी जवळपास सर्व किल्ले परत मिळवले. या गोष्टींमुळे  मी त्यांना आदर्श मानले आणि मागे वळून पहिले नाही. आज एका महिन्यात २.५ लाख रुपये उत्पन्न मिळते. मी तरुण शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करतो. कायम मार्गदर्शन करण्याची माझी भूमिका असते.” “ माझ्या सुरुवातीच्या काळात मला संघर्ष करावा लागला. सुरुवातीला लोक  विश्वास ठेवायला तयार नव्हत्या. हा माणूस ( म्हणजे मी अपंग ) हा कसे पक्षी सांभाळणार म्हणून मला अनेकांनी नकार दिला. या काळात माझ्या बायकोची मला साथ लाभली. ती मी अपंग असताना माझ्याशी लग्नाला तयार झाली. संगीता आणि मी प्राणिकपणे प्रयत्न करून पक्षी वाढवले, नंतर लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला. आज आम्ही बारामती ऍग्रो, वेंकटेश्वरासारख्या  मोठ्या कपंन्याबरोबर काम करतो. २०१५ साली इस्रायली कृषी  अभ्यासकांनी आमच्या पोल्टीफार्मला भेट दिली. ते माझ्याकडे पाहून अचंबित झाले. त्यांनी कौतुकाची थाप पाठीवर टाकली. आज माझ्याकडे वातानुकूलित म्हणजे सामान्य भाषेत एसी पॉलिट्रीफार्म आहे.  त्यात जवळजळ ८ हजार पक्षी आहेत. संपूर्ण शेड्स ऑटोमेटेड म्हणजे स्वयंचलित आहेत. त्यामुळे  माणसाचे काम वाचले आहे.” दरम्यान उत्तमराव यांच्या या यशाचे कौतुक पंचक्रोशीतील लोक करत असतात.  इतकेच नाही तर उत्तमराव यांना अॅगोवनचा स्मार्ट शेतकरीचा पुरस्कार ही मिळाला आहे. 


उत्तम डुकरे यांच्या पोल्ट्रीफार्मविषयी अधिक माहिती

असा आहे पोल्ट्री फार्म -

 • २०० बाय ३० फूट आणि १५० बे ४० फूट अशी दोन शेड्स
 • एकूण पक्षी १६ हजार ब्रॉयलर जातीचे.
 • अनेक खासगी कंपन्यांशी करार. 
 • वातानुकूलित पोल्ट्री असल्याने पक्षामागे २ रूपये अधिक दर मिळतो.
 •  पोल्ट्रीमधील सर्व कामे म्हणजे खाद्य, पाणी, तापमान नियंत्रण हे सर्व ऑटोमेटेड म्हणजे स्वयंचलित आहे.
 • ऑटोमेशनमुळे एक माणूस एक पोल्ट्री सांभाळू शकतो.
 • कोंबडी खताचे प्रतिवर्षी ३० ते ४० हजार रुपये मिळतात.
 • संपूर्ण पोल्ट्रीफार्म ऑटोमेटेड केल्याने झालेले फायदे.
 • थंड  पाणी तयार करण्यासाठी लागणाऱ्या टाक्यांची निर्मिती.
 • प्रकाशासाठी पडदे, निळ्या रंगाच्या विजेच्या बल्बचा वापर.
 • पिल्लाना उष्णता मिळण्यासाठी गॅस हिटरचा वापर करण्यात येतो.
 • पिल्लाना नियमित लास देण्यासाठी स्वच्छ पाण्याची टाकी.
 • वीजपुरवठा खाडीत होऊ नये म्हणून जनरेटरची सोय.
 • जर या सगळ्यात बिघाड झाला की धोक्याची घंटा वाजते. त्यामुळे लगेच दुरुस्त करता येते.
 • या वातानुकूलित यंत्रणेमुळे डुकरे यांना झालेले फायदे.
 • पक्षीखाद्याची नासाडी थांबली.
 • शेड्समध्ये अधिक पक्षी साठवता येऊ लागले.
 • पक्षीवाढीचा कालावधी कमी होऊन नवीन पक्षी येऊ लागले.
 • साधारपणे पक्ष्याचा वजनवाढीचा काळ कमी झाला. उदा.  पूर्वी ४२ ते ४५ दिवसात मिळणारे आवाज आता ३५ व्या दिवसात मिळू लागले. उन्हाळयात उष्णतेमुळे होणारा पक्ष्यांचा मृत्यू कमी झाला.
 • या सर्व प्रतीच्या कामांना बँक अर्थसहाय्य देते. आपल्याला आपला मुद्दा नीटपणे मांडता आला पाहिजे.

बायकोची खंबीर साथ :

  या सगळ्यात उत्तमरावांना बायकोची खंबीर साथ मिळाली. ते म्हणतात कि, “ मी अपंग असताना कुणीही माझ्याआधी लग्न केले नसते. जर लग्न करायचे झाले असते  तर एखादी अपंग मुलगी शोधावी लागली असती. पण संगीता माझी परिस्थिती अशी आहे हे पाहूनही लग्नाला तयार झाली. आज आमचा सुखाचा संसार सुरू आहे. शिवाजी महाराज आणि संगीताने माझ्या आयुष्यातील संघर्ष जिवंत ठेवला. आज माझ्या बोलेरो गाडीतून ती शेजारी बसली असताना तिच्या डोळ्यातील समाधान पाहून जग जिंकल्यासारखं वाटतं, अशा आपल्या भावना, पत्नीविषयी असलेले त्यांचे प्रेम उत्तमरावांनी कृषी जागरण मराठीशी बोलताना व्यक्त केले.

लेखक - शेखर पायगुडे - 9921215008

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters