1. यशोगाथा

Success Story : मधुमक्षिका पालनाचा ध्यास घेतलेली कन्या

कृषी शिक्षण घेत असताना सुरुवातीला इतर विद्यार्थी वर्गासारखी स्पर्धा परीक्षा करावे ही मानसिकता तिची देखील होती. पण कृषी क्षेत्रातील संधी पाहता तीने नवा मार्ग निवडला तो म्हणजे कृषिपूरक व्यवसायाचा. शेवटच्या वर्षाला असताना महाविद्यालयीन प्रकल्प म्हणून श्वेताने मधुमक्षिका हा विषय निवडला. सुरुवातीला मधुमक्षिका क्षेत्रात काम करणारे शाश्वत प्रकल्प शोधण्यास तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

Success Story

Success Story

मधुमक्षिका आणि माणूस यांचा एक वेगळा ऋणानुबंध आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की, जगातील शेवटची मधमाशी मरण पावल्यानंतर ४ वर्षांच्या आत मानव प्रजाती पृथ्वीवरून नामशेष होईल. बदलत्या वातावरणीय परिस्थितीत कदाचित तो दिवस दूर नाही अशी मानवाची वागणूक सुरु आहे. या सर्व सद्यस्थितीत मधमाशी वाचवणे यासाठी खूप कमी मंडळी काम करत आहेत त्यातील एक धोरणी विचाराची आणि अनेक महिला व तरुणींना दिशा मिळावी याकरिता देशभर फिरून काम करणारी श्वेता वायाळ-गायकवाड.

वडील शेतकरी आणि आई शिक्षिका अशा सामान्य परिस्थिती असलेल्या सर्वसाधारण कुटुंबात श्वेताचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील अवसरी खुर्द या गावी झाला. जसे सर्वसाधारण मुलं शिकतात त्याचप्रमाणे त्यांचही एका गावात शिक्षण सुरू होतं पुढे आण्णासाहेब आवटे महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली. कृषी शिक्षणासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव (पुणे) येथे तीने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि तिच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.

कृषी शिक्षण घेत असताना सुरुवातीला इतर विद्यार्थी वर्गासारखी स्पर्धा परीक्षा करावे ही मानसिकता तिची देखील होती. पण कृषी क्षेत्रातील संधी पाहता तीने नवा मार्ग निवडला तो म्हणजे कृषिपूरक व्यवसायाचा. शेवटच्या वर्षाला असताना महाविद्यालयीन प्रकल्प म्हणून श्वेताने मधुमक्षिका हा विषय निवडला. सुरुवातीला मधुमक्षिका क्षेत्रात काम करणारे शाश्वत प्रकल्प शोधण्यास तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पुढे एका संपर्कातून तीने मधुमक्षिका क्षेत्रातील तज्ञ मा. विजय महाजन यांच्याकडे प्रकल्प आणि अनुभव घेण्यास सुरुवात केली. प्रशिक्षण आणि अनुभव घेताना पडेल ते काम तीने केले त्यामुळे तिला अनुभव येत गेला. प्रशिक्षण घेताना मधुमक्षिका संवर्धन ते प्रक्रिया सोबत त्याची विक्री व्यवस्था यावर सखोल अभ्यास करून तब्बल सहा महिने जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण केले.

ग्रामीण भागात काम करताना भरपूर अडचणी येतात. श्वेताला देखील सुरुवातीला भांडवलाची कमी असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ नोकरी करावी लागली. पण नोकरी करत असताना आपल्याला मधुमक्षिका क्षेत्रातचं कारकीर्द करायची हे मात्र मनाशी पक्के केले होते. भारत सरकारच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (CBRTI) पुणे येथील संशोधक वर्गाच्या सातत्याने संपर्कात राहून विविध प्रशिक्षणाचे टप्पे देखील पूर्ण केले.

उद्योजकांसाठी ट्रेनिंग
केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (CBRTI) संस्थेच्या माध्यमातून तीने देशभर विविध शेतकरी आणि उद्योजक यांच्यासाठी ट्रेनिंग घेतले आहे. आजपर्यत देशभरातील सात पेक्षा जास्त राज्यात श्वेता शेतकरी बांधवांसाठी प्रशिक्षण घेत आहेत. विविध राज्यात प्रशिक्षण घेत असताना तेथील वातावरण, मधपाळ यांच्याशी संपर्क साधत तेथील विविध उपक्रम आणि संशोधन याचे देखील तीने सखोल ज्ञान मिळवले.

‘मधुलेह’ हा ब्रॅन्ड रजिस्टर
प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना मध उत्पादनांची मागणी होऊ लागल्याने ‘मधुलेह’ हा ब्रॅन्ड रजिस्टर करून देशभर या उत्पादनांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. स्वताचा व्यवसाय सुरु करताना मुलगा लहान असल्यामुळे बाहेरील राज्यात जाऊन प्रशिक्षण घेता येईल का? हा व्यवसाय कशा पद्धतीने पुढे नेता येईल? असे अनेक प्रश्न मनामध्ये होते. यादरम्यान अनेक समस्या आल्या पण आई-वडिल व सासरच्या मंडळींची साथ त्यामुळे हा व्यवसाय त्या यशस्वीरित्या करत आहे. कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले तिचे पती सिद्धार्थ आणि कुटुंब यांचा मजबूत पाठींबा मिळाला.

व्यवसाय प्रशिक्षण
मधुमक्षिका पालन व्यवसाय फक्त स्वतः पुरता न ठेवता मध विक्री, प्रशिक्षण, परागीभवनासाठी पेट्यांची विक्री करणे अशा अनेक संधी याबद्दल श्वेता महिलांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करत असते. कमीत कमी जागा व भांडवलामध्ये व्यवसाय करता येऊ शकतो याचे ती स्वतः एक आदर्श उदाहरण आहे. निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाद्य आणि फुलोरा उपलब्ध आहे. पण त्याचाबद्दल लोकांना जाणीव नसल्याने अनेकदा नुकसान होण्याची जास्त शक्यता असते पण याचे व्यवस्थित नियोजन करून या व्यवसायामध्ये चांगला नफा मिळवता येऊ शकतो हे श्वेताने सिद्ध केले आहे. मधुमक्षिका व्यवसाय अतिशय फायदेशीर असून तो महिला वर्गासाठी शेती सोबत पूरक व्यवसाय म्हणून चांगले आर्थिक उत्पादन देणारा आहे. यावर श्वेताने विविध मॉडेल विकसित केलेले आहेत. घरातील विविध जबाबदाऱ्या सांभाळून ती हा व्यवसाय नेटाने पुढे नेत आहे.
मल्टी फ्लोरल, जांभूळ, तुळस, ओवा इत्यादी प्रकारचे मध विक्री केली जाते. त्याचप्रमाणे पराग कण, रॉयल जेली याची मागणीनुसार उत्पादन घेऊन विक्री करत आहे. मधुमक्षिका क्षेत्रात भविष्यात ट्रेसीबिलीटीसारखे जागतिक तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना शुद्ध आणि दर्जदार मध देण्याचा तिचा मानस आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
मधुमक्षिका क्षेत्रातील योगदानासाठी तिला भारत सरकार कृषि मंत्रालयाची स्वायत्त संस्था MANAGE चा National Agripreneur Award हा राष्ट्रीय पुरस्कार तर कृषिथोन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील देखील पुरस्कार तिला मिळाला आहे.

कृषि कॉलेजमधील सिनिअर रितेश पोपळघट सांगतात की, “मधुमक्षिका क्षेत्रात गेले सहा वर्षे काम करणारी श्वेता वायाळ-गायकवाड ही माझी ऍग्रीकल्चर कॉलेजमधील ज्युनिअर. आज देशभर ६ पेक्षा जास्त राज्यात तिचा 'मधुलेह हनी' हा कृषिपूरक उद्योगातील स्टार्टअप. तसंच प्रशिक्षण, मध उत्पादने, साहित्य पुरविण्याचे काम त्या करत आहेत.

'मधुलेह हनी'च्या माध्यमातून मल्टी-फ्लोरा हनी, जामुन हनी, तुलसी हनी, अजवेन हनी, लिची हनी, बी-पॉलेन, फ्रेश रॉयल जेली आणि मध उत्पादनासाठी लागणारे साहित्य देखील तिचा स्टार्टअप देशभर उपलब्ध करत आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना सिनिअर बॅच मधील सर्वेश घंगाळे यांनी 'रेशीम पालनाचा' प्रकल्प केला होता. त्यांना फॉलो करत वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि कृषिपूरक क्षेत्रातील मधुमक्षिका हा वेगळा विषय निवडून सुरुवात केली.

सुरुवातीला प्रशिक्षण घेण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. नंतर प्रशिक्षण घेतले पण ते पुरेसे नसल्याने मधुमक्षिकाबद्दल अनेक साहित्य आणि पुस्तक वाचून ज्ञानाची कक्षा वाढवली. माहिती घेण्याचा संघर्ष इथपासून आजमितीला केंद्र शासनाची मास्टर ट्रेनर या पदापर्यंत येऊन काम करते आहे. कृषि मूल्य साखळीत काम करणारे तिचे पती सिद्धार्थ देखील या कामासाठी तिला पाठिंबा आणि प्रोत्साहन देत आहेत. एक मुलगी आहे हा न्यूनगंड न बाळगता देशभर प्रवास करून कृषि क्षेत्रातील एक वेगळं काम उभा करणारी श्वेता ही कम्फर्ट झोनमधील तरुण-तरुणींना बाहेर पडण्यासाठी एक वेगळा आदर्श उभा करत आहे.

श्वेताचा आदर्श घेऊन अनेक महिला आणि तरुणी आता मधुमक्षिका व्यवसायाकडे वळत आहेत. मधुमक्षिका काळाची गरज आहेत त्या जगल्या तर माणूस आणि हि सजीवसृष्टी टिकणार आहे. भविष्यातील शाश्वत विकास साधण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यत काम करून व्यवसाय आणि इतरांना देखील या उत्कर्त्षाचा मार्ग दाखवण्याची तिची भावना आहे.

मधविक्रीतून चांगले उत्पन्न
मधुमक्षिका पालनामध्ये मिलीफेरा जातीच्या मधमाशी पासून एका पेटी पासून वर्षाला ३० ते ३५ किलो मध मिळतो. सरासरी पाचशे रुपये किलो प्रमाणे याची विक्री आपण करू शकतो. काचेच्या बॉटलमध्ये पॅकिंग करून त्याला ब्रँडिंग स्टिकर करून त्याची विक्री केली. दीडशे, अडीचशे, पाचशे ग्रॅम अशा तीन पॅकिंग साईज मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. विक्रीसाठी आयुर्वेदिक शॉप त्याचप्रमाणे महिला बचत गटांची ग्रुप यांच्या माध्यमातून सुरुवात केली. आवडल्यानंतर रिटर्न ऑर्डर्स यायला लागल्या. ‌ सुपर शॉपी मध्ये ठेवायला सुरुवात केली. तिथून चांगला प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावला. तिथं होलसेल व किरकोळ विक्रेत्यांना मध विक्रीसाठी दिले. अशा पद्धतीने हळूहळू व्यवसाय वाढत गेला. मध विक्रीसाठी खूप वाव आहे.

मधाची विक्री आपण मध प्रोसेस करून सुद्धा करू शकतो व तसेच विक्री सुद्धा करु शकतो. कुठला व्यवसाय करत असताना सुरुवातीला उत्पादनाची विक्री कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न व्यवसायिका समोर असतो. मलाही अनेक अडचणी आल्या पण प्रत्येक अडचणीवर मात करत मधाची विक्री कशा पद्धतीने करता येईल. यासाठी नवनवीन संकल्पना मी शोधत गेले. त्यामध्ये दिवाळी गिफ्ट पॅक, हळदी कुंकवासाठी गिफ्ट, इत्यादी आयडिया येत गेल्या.

सरकारकडून व्यवसायासाठी मदत
सरकार देखील हा व्यवसाय वाढीसाठी मदत करत आहे. प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत पुरुषांसाठी सबसिडी आहे. प्रत्येक व्यवसायासाठी सबसिडी व्यवसाय तुम्ही कोणत्या भागात करता त्यावर अवलंबून आहे. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र मध्ये संपर्क साधला तर या व्यवसायाबद्दल तुम्हाला अधिक माहिती भेटेल व प्रशिक्षण देखील मिळेल. खादी ग्राम उद्योग आयोग मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी प्रशिक्षण व अनुदान देते. त्याचप्रमाणे मुद्रा लोन या मार्फत देखील आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकते. कमीत कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू करता येईल.

English Summary: Success Story A girl obsessed with beekeeping Published on: 14 November 2023, 09:51 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters