अल्प शेती क्षेत्रात कुटुंबाची गुजराण करणे शेतकऱ्यांसाठी कष्टदायक बनलं आहे. पण उपलब्ध शेतीत अधिकाधिक पिके न घेताही शेतकर्याला सुखाने जगता येते, याचा वस्तुपाठ पुनावळेने घालून दिला आहे. फक्त अर्धा एकर शेती तब्बल ४२ टन ऊस उत्पादन घेण्याचे अविश्वसनीय कार्य येथे यशस्वीपणे पार पडले आहे. पुनावळे (ता. मुळशी) येथील विठ्ठल दगडू ढवळे आणि सुनील दगडू ढवळे या बंधूंनी ही संकल्पना राबवली आहे.
अल्पभूधारकांसाठी एक नवी उमेद जागृत करणाऱ्या या प्रयोगातून नियोजनबद्ध शेतीचे एक अनोखे प्रारूप (मॉडेल) तयार केले आहे. बळीराजाने हतबल न होता या नियोजनबद्ध शेतीची कास धरली तर त्याच्या कुटुंबाला अन्यत्र कोठेही कामाला जावे जाणार नाही. सुनील ढवळे यांना उत्कृष्ट ऊस उत्पादनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृषिनिष्ठ (२००५) पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एका पूर्ण कुटुंबाला जगण्यासाठी आवश्यक असणारे धान्य, भाज्या आणि फळेही शेतात पिकवले गेले. कमी पाण्यात ही सेंद्रिय शेती करता येत असल्याने शेतकऱ्याला स्वावलंबी बनवणारा हा प्रयोग आहे. उपलब्ध पाणी आणि उपलब्ध शेतीमध्ये योग्य नियोजन यातून कुटुंबाच्या गरजा भागवून काही पैसे शिल्लक ठेवता येणारी अशी ही शेती नेमकी आहे तरी कशी ते पाहूया-
या शेतीमध्ये सिंचनासाठी ठिबक सिंचनचा वापर करण्यात आला. दूध, खत आणि इंधन (बायोगॅस) यासाठी गाई आहेत. पर्यावरण संतुलनाबरोबर नैसर्गिक साधनांचा वापर करून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व टिकाऊ कृषी उत्पादन करणे हे या शेतीचे वैशिष्ट्य. विशिष्ट जागा विशिष्ट गोष्टींसाठी निश्चित करूनच हा प्रकल्प साकारला आहे. दहा एकर क्षेत्रात घर, गो, गोबरगॅस, कोंबडीपालन, गांडूळ खत, निवडुंग अर्क, ऊस, भात, ज्वारी, मका, भुईमूग, सोयाबीन यांसारखी नगदी पिके घेतली. याबरोबर चाऱ्यासाठी विविध पिके, भाजीपाला, फळवर्गीय, पर्णवर्गीय व वेलवर्गीय पिके घेण्यात आली आहेत.
हेही वाचा : संत्र्याच्या शेतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झाली वाढ ; वाचा अमरावतीतील यशोगाथा
याशिवाय वेळेची बचत व सोयीस्कर शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रे जसे की ट्रॅक्टर, संयुक्त कापणी यंत्र, मलचर यांसारखे यंत्र देखील आहेत. तीन वर्ष सलग पीक देणारे ऊस, मक्याची कणसे, भुईमुग, तुर असे वेगळेपण येथे दिसते. केवळ अर्ध्या एकरात ४२ टन ऊस पिकवला गेला. उसापासून सेंद्रिय गूळ बनवला तर त्याला चांगला दर मिळतो. रासायनिक खते आणि औषधांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. नैसर्गिक पद्धतीने पुरेशा भाज्या, फळे, धान्य आणि त्यापासून उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे यामध्ये मार्गदर्शन देणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
खेड्यातील प्रत्येक कुटुंबाने अशा पद्धतीची शेती आत्मसात केली, तर नक्कीच ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यातून स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पनाही सत्यात उतरेल या उद्देशाने हा प्रकल्प साकारला आहे. केवळ उत्पन्नासाठी शेती न करता स्वतःच्या गरजाही त्यातून भाग भागवाव्यात या उद्देशाने शेती केली तरीही यातून नफा राहू शकतो. अर्ध्या एकरात इतके उत्पादन मिळू शकते. त्यातून शेतीची एक नवी उमेद फुलविण्याचा प्रयत्न सुनील ढवळे यांनी केला आहे. अशाप्रकारे शास्वत शेती करून सुद्धा शेतकरी कसे भरघोस उत्पादन घेऊन स्वावलंबी राहू शकतात याची खात्री ढवळे बंधूंनी पटवून दिली. अशी माहिती कृषी महाविद्यालय पुणे ची कृषिकन्या प्रेरणा कदम हिने दिली.
Share your comments