शेती परवडत नाही असे अनेकदा म्हटले जाते. असे असताना काही शेतकरी मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न काढून मोठी प्रगती करतात. काही शेतकरी अनेकदा शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. काही शेतकरी हे असे प्रयोग करतात की त्यातून त्यांची चांगली कमाई पण होते. असेच एक प्रकरण मराठवाडाच्या विदर्भ सीमेवर असलेल्या पानकनेर गावातून समोर आले आहे. येथे सालगडी म्हणून काम करणारा शेतकरी आता कोट्यवधीश झाला आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतीमध्ये अनेक चढउतार येत असताना या शेतकऱ्याने मात्र करून दाखवले आहे. या शेतकऱ्याचे नाव संतोष शिंदे असे आहे.
त्याने ८ एकर जमिनीवर नर्सरी उभी केली आहे. या नर्सरी उद्योगातून ते वर्षभरात ६ कोटींची उलाढाल करतात. अल्पभूधारक म्हणून त्यांची ओळख होती. शेतीला पाणी नसल्यामुळे त्यांनी सालगडी म्हणूनही काम केले आहे. मात्र आज ते अनेकांच्या पुढे एक आदर्श म्हणून उभे आहेत. त्यांनी सुरुवातीला हालाखीत दिवस काढले. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. सालगडी असतानाही आर्थिक अडचणी आल्या, त्यामुळे त्यांनी नर्सरी व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला एक गुंठ्यात नर्सरी व्यवसाय सुरु केला. तेव्हा त्यांनी अगदी कमी बजेटमध्ये हे सर्वकाही सुरु केले.
त्यांनी सुरुवातीला झेंडूच्या रोपट्याचे उत्पादन घेतले. त्यांना याच्यात चांगला आर्थिक फायदा झाला, त्यामुळे त्यांनी हाच व्यवसाय मोठा करण्याचे ठरवले. त्यांना पाणी देखील उपलब्ध नव्हते. संतोष यांनी त्यालाही पर्याय शोधला. संतोष यांनी विहीर खोदली. या विहीरीला चांगले पाणी लागले. नर्सरीचा हा व्यवसाय वाढू लागला आणि आता ही नर्सरी ८ एकर शेत जमिनीवर केली जात आहे. या नर्सरीत तंत्रज्ञानाचा वापर करत मिरची, टोमॅटो, झेंडू, पपई, टरबूज, खरबूज यासारख्या अनेक दहा ते बारा प्रजातीच्या रोपट्यांचे उत्पादन घेतले जाते. तसेच या नर्सरीमुळे १०० लोकांच्या हाताला काम मिळाले आहे. यामुळे एकेकाळी कामासाठी फिरणाऱ्या संतोष यांनी आता अनेकांना काम दिले आहे.
संतोष सध्या या व्यवसायातून वर्षाकाठी ६ कोटींची उलाढाल करतात. रोपट्यांच्या गुणवत्तेमुळे या रोपट्यांना महाराष्ट्रासोबत अनेक राज्यातून चांगली मागणी आहे. ते हे रोपटे ग्राहकांना घरपोच देत असतात. तसेच या वाहतूकीसाठी शिंदे यांनी स्वताचे ४ ट्रकही विकत घेतले आहे. यामुळे केवळ एका गुंठ्यातुन त्यांनी हे सगळं कमवले आहे. ते अनेकांना शेतीबाबत मार्गदर्शन देखील करतात. यामुळे कष्ट आणि काही नवीन करण्याच्या जिद्दीवरच सालगडी म्हणून काम करणारे संतोष आज करोडपती झाले आहे. या अनोख्या प्रयोगाची फक्त त्या गावात नाही, तर राज्यभरात चर्चा आहे.
Share your comments