1. यशोगाथा

डी.एड.करून शिक्षिका न होता सुरू केला कुक्कुटपालनासह भाजीपाला शेतीचा व्यवसाय; मिळवली नवी ओळख

लखमापूर येथील आश्‍विनी नीलेश साळुंके सहा वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. देशी व लेअर कोंबडीपालनात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब, योग्य व्यवस्थापनाची जोड देत त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे. आश्‍विनी यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. चिंचवे-उमराणे (ता. मालेगाव) येथे दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीमध्ये संघर्ष ठरलेला.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
देशी व लेअर कोंबडीपालन

देशी व लेअर कोंबडीपालन

लखमापूर येथील आश्‍विनी नीलेश साळुंके सहा वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. देशी व लेअर कोंबडीपालनात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब, योग्य व्यवस्थापनाची जोड देत त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे. आश्‍विनी यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. चिंचवे-उमराणे (ता. मालेगाव) येथे दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीमध्ये संघर्ष ठरलेला. शेतीमधील अडचणी पाहून मुलीने शिकून नोकरी करावी यासाठी वडिलांचे प्रयत्न सुरू होते.

आश्‍विनी ह्यांनी विज्ञानशाखेत बारावी झाल्यानंतर पुढे डी.एड.चे शिक्षण घेऊन अध्यापन क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहिले. मात्र शिक्षणक्षेत्रात संधी उपलब्ध न झाल्याने बेरोजगारीच वाट्याला आली. पुढे त्यांचा विवाह २०१४ मध्ये लखमापूर (ता. सटाणा) येथील नीलेश साळुंके यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर शिक्षिकेची नोकरी करावी अशी त्यांच्या मनात कायम इच्छा होती. मात्र संधी नसल्याने हिरमोड झाला. परंतु काहीतरी वेगळे करून दाखवावे ही जिद्द कायम होती. याअनुषंगाने कृषिपूरक व्यवसाय करावा अशी संकल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी पती नीलेश यांच्यासोबत कुक्कुटपालनाबाबत चर्चा केली. त्यांनीदेखील आश्‍विनी यांना चांगली साथ दिल्याने कुक्कुटपालनाचे नियोजन सुरू केले.

*पोल्ट्री शेडची उभारणी*

आश्‍विनी यांनी २०१५ मध्ये नातेवाइकांकडून १० गुंठे क्षेत्र भाडे तत्त्वावर घेतले. यामध्ये चार गुंठ्यांवर कुक्कुटपालनासाठी शेड उभारली. त्या वेळी कडकनाथ कोंबडीपालनाचा ट्रेंड असल्याने सुरुवातीला ५०० कडकनाथ पिलांचे संगोपन सुरू केले. मात्र कोंबड्या विक्रीयोग्य झाल्यानंतर कमी मागणी व विक्रीत अडचणी असल्याने त्यांनी या कोंबड्या कमी केल्या. पुढे बाजारपेठेची मागणी अभ्यासून लेअर कोंबडीपालनाचे नियोजन केले. अंडी देण्यायोग्य १००० लेअर कोंबड्यांची पुणे येथून खरेदी करून पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू केला.

काटेकोर नियोजनावर भर

  • कुक्कुटपालनात खाद्य, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचा भाग. सकाळी सात आणि सायंकाळी पाच वाजता खाद्यपुरवठा.
  • व्यवस्थापनात सुलभता यावी यासाठी उपलब्ध भांडवलानुसार अद्ययावत यंत्रणेचा वापर.
  • पाणी पाजण्यासाठी सेमी स्वयंचलित ड्रिंकर यंत्रणेचा वापर. पाणी निर्जंतुक असण्यासह सामू नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न.
  • वेळापत्रकानुसार योग्य खाद्य पुरवठा.
  • वेळोवेळी शेडची स्वच्छता व निर्जंतुकीकरण.
  • संगोपन कालावधीत कोंबड्यांची मरतुक कमी होण्यासाठी जैवसुरक्षेकडे विशेष लक्ष.
  • दैनंदिन खाद्य, औषधे, आरोग्य, मरतुक याबाबतच्या नोंदी.

 

अंडी विक्री केंद्र

लखमापूर हे बाजारपेठेचे गाव, त्यामुळे येथील मागणी व पुरवठा याचा अभ्यास करून आश्‍विनीताई दररोज सरासरी ८०० अंड्यांची विक्री गाव परिसरातील बाजारपेठेत करतात स्वतःच्या विक्री केंद्रात दररोज ५०० अंडी आणि व्यापाऱ्यांना ३०० अंड्यांची विक्री केली जाते. ग्राहकांकडूनही अंडी विक्री केंद्राला चांगला प्रतिसाद आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन व पुरवठ्याचे गणित त्यांनी जुळविले आहे. केंद्रातून प्रति अंडे सहा रुपये नग या प्रमाणे विक्री केली जाते. त्यामुळे बाजारपेठेपेक्षा अधिकचे दोन पैसे मिळतात.

कोरोना काळात पोल्ट्रीचा आधार

कोरोनाच्या संकटकाळात अनेक व्यवसाय अडचणीत सापडले. मात्र आश्‍विनी यांना कोंबडीपालन आणि तोंडली लागवडीतून आर्थिक आधार मिळाला.त्यामुळे गेल्या दीड वर्षात संकटकाळातही खर्च वजा जाता दोन लाखांवर उत्पन्न मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या त्यामुळे आत्मविश्‍वास निर्माण होत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा सक्षमपणे सामोरे जाण्याची त्यांची तयारी झाली आहे.

कुटुंबीयांची साथ

आश्‍विनीताईंना पती नीलेश यांची चांगली साथ मिळाली आहे. दोन लहान मुले आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना कधी कधी कसरत होते. मात्र आनंदाने उपलब्ध संधीचे सोने करत अर्थकारण सक्षम करण्याचे आश्‍विनीताईंचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. कुक्कुटपालनात काही अडचण आली, तर नीलेश हे हॉटेल व्यवसाय सांभाळून त्यांना मदत करतात. पूरब आणि कार्तिक या मुलांनाही उद्योगनिर्मितीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे त्या सांगतात.

 

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील

पोल्ट्री शेडमधून महिन्याला एक ट्रॉली कोंबडी खत, यातून पाच हजारांचे अतिरिक्त उत्पन्न.
नावीन्यपूर्ण संधी ओळखून उपलब्ध जागेवरच ६० तितर पक्ष्यांचे संगोपन. १२० रुपये नग, तसेच त्याचे अंडे दोन ते तीन रुपये प्रमाणे विक्रीचे नियोजन.
सहा गुंठ्यांत गेल्या दोन वर्षांपासून तोंडलीचे दर्जेदार उत्पादन.स्थानिक बाजारपेठेत विक्रीतून महिन्याला सहा हजार रुपयांचे उत्पन्न._
दरमहा कुक्कुटपालन, भाजीपाला विक्रीतून तीस हजाराचे उत्पन्न त्यांना मिळते.

शंभर देशी कोंबड्यांचे संगोपन

आश्‍विनीताईंनी देशी कोंबड्यांची अंडी आणि चिकनसाठी असलेली मागणी लक्षात घेऊन त्यांना देशी कोंबड्यांचे संगोपन सुरू केले. या ठिकाणी कावेरी, गावठी आणि काही प्रमाणात कडकनाथ जातींच्या १०० कोंबड्यांचे संगोपन केले जाते. शेड परिसरात त्यांनी सहा गुंठे क्षेत्रावर तोंडली लागवड केली आहे. तोंडलीच्या मांडवाखाली दिवसभर देशी कोंबड्या मुक्त पद्धतीने संचार करतात. त्यामुळे सावली उपलब्धतेसह पालापाचोळा, पिकून पडणारी तोंडली फळे कोंबड्यांना खाद्यासाठी उपलब्ध होतात.

रात्री कोंबड्यांना खुराड्यात ठेवले जाते. कोंबड्यांची नैसर्गिक पद्धतीने वाढ होत असल्याने उत्पादन खर्च कमी येतो. त्यामुळे सहाजिकच मिळणारे उत्पन्न त्यांच्या कौटुंबिक अर्थकारणाला चालना देणारे ठरले आहे. देशी कोंबडीची अंडी १० रुपये आणि कोंबडीची ६०० रुपये प्रति नग या दराने विक्री होते._

 

प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Started vegetable business including poultry farming After complete D.Ed Published on: 18 July 2021, 04:53 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters