MFOI 2024 Road Show
  1. यशोगाथा

Success Story : सिताफळाने शेतकऱ्याला केले 'हिरो'

उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे पूर्वीच्या काळी म्हटले जायचे. सर्व व्यवसायांमध्ये शेतीला सर्वोत्तम दर्जा दिला होता. यावर विचार केल्यावर असे लक्षात येते, की शेतीतून निघणारे उत्पादन हे मानवी जीवनाशी थेट संबंधित आहे. किंबहुना, त्यावरच माणसाचे जीवन अवलंबून आहे. अन्नामुळेच मानवी शरीराचे पोषण होते म्हणून अन्नाला परब्रह्म म्हटले आहे.

Success Story News

Success Story News

संकट आले म्हणजे माणूस त्यातून बाहेर पडण्याची धडपड करतोच. शेतकऱ्यांनी ही शेती वाचवण्यासाठी अनेक मार्ग शोधले. पारंपरिक पद्धतीला बगल देऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. पारंपरिक पिकांऐवजी विविध प्रकारची पिके घेऊ लागले. नवीन तंत्रज्ञान वापरले, फुलांफळांच्या नवीन जाती शोधून काढल्या. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीव्यवसायात आपला जम बसवला. त्यांपैकीच एक आहेत सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे येथील नवनाथ मल्हारी कसपटे. त्यांनी त्यांच्या कोरडवाहू जमिनीतून अक्षरशः सोने पिकवले आहे. सीताफळासारख्या बहुगुणी पण दुर्लक्षित फळाची शेती करून ते स्वतः समृद्ध झाले व इतरांचाही समृद्धीचा मार्ग प्रशस्त केला.

उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे पूर्वीच्या काळी म्हटले जायचे. सर्व व्यवसायांमध्ये शेतीला सर्वोत्तम दर्जा दिला होता. यावर विचार केल्यावर असे लक्षात येते, की शेतीतून निघणारे उत्पादन हे मानवी जीवनाशी थेट संबंधित आहे. किंबहुना, त्यावरच माणसाचे जीवन अवलंबून आहे. अन्नामुळेच मानवी शरीराचे पोषण होते म्हणून अन्नाला परब्रह्म म्हटले आहे. तुमच्याजवळ असलेले पैसे तुमची भूक भागवू शकत नाही. ते पैसे खर्चून तुम्हाला अन्न घ्यावे लागते. तुमच्या खिशात कितीही पैसे असले, तरी त्याने पोटातली भूक क्षमत नाही. त्यामुळे पूर्वीच्या काळी धनधान्य, भाजीपाला, फळे फुले यांना समृद्धी म्हटले जायचे. ही समृद्धी देणारी शेती उत्तम समजत असत. कालांतराने एकत्र कुटुंबपद्धती लयास गेली.

जमिनीची तुकड्यांत विभागणी झाली. निसर्गात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे पाऊसमान कमी झाले आणि शेती लयास जाऊ लागली. लाखाचा पोशिंदा असलेला बळीराजाच उपाशी राहू लागला. मात्र या सर्व परिस्थितीतून स्वतःच्या मेहनतीने व अथक प्रयत्नांनी नवनाथ कसपटे यांनी मार्ग शोधून काढला. पारंपरिक पद्धतीने शेती न करता सीताफळाच्या नवीन नवीन जाती विकसित करून विक्रमी पीक घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. देशात आणि विदेशांत त्यांच्या मालाला मागणी आहे. त्यामागे त्यांची चाळीस वर्षांची तपश्चर्या आहे. त्यांचा हा प्रवास शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.

नवनाथ मल्हारी कसपटे यांचा जन्म बार्शी तालुक्यातल्या गोरमाळे या गावात १ जून १९५५ ला झाला. घरी थोडीबहुत शेती होती, पण कोरडवाहू क्षेत्र. त्यामुळे फारसे उत्पादन नाही. आई-वडील शिकलेले नव्हते. नवनाथ यांना दोन भाऊ आणि एक बहीण. ते इयत्ता सहावीमध्ये असतानाच त्यांची आई वारली. आईच्या जाण्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्यांच्या जमिनीतून जेमतेम पोटापुरते मिळायचे. त्यातच इ.स. १९७२ चा दुष्काळ पडला. दुष्काळी कामावर सहा महिने खडी फोडायचे कामही त्यांनी केले. नवनाथ कसपटे दहावीपर्यंत शिकले.

पुढे शिकण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक परिस्थिती नव्हती. ते घरच्या शेतात काम करू लागले. याच शेतातून सोने कसे पिकवायचे यावर ते विचार करू लागले. त्यासाठी त्यांनी शेतीविषयक ज्ञान मिळवायला सुरुवात केली. दाभोळकर सरांचे व्याख्यान ते मनापासून ऐकायचे. त्यावर अभ्यास करायचे. इ.स.१९८५ ला त्यांनी शेतात बोअरवेल खोदली आणि पाण्याचा प्रश्न मिटला. पपई, सीताफळ, बोर, अशी पिकं घ्यायला सुरुवात केली. सुदैवाने त्यांना अनिल दबडे व शरद हवेली यांच्यासारखे गुरु भेटले. त्यांनी द्राक्ष पिकाविषयी मोकळेपणाने मार्गदर्शन केले.

'सर्वाधिक द्राक्षनिर्यातदार'पुरस्काराने सन्मानित
नवनाथ कसपटे यांनी द्राक्ष लागवड करायला सुरुवात केली. नंतर दुसरी बोअरवेल खोदली. तिलाही पाणी लागले. हळूहळू द्राक्षबाग वीस एकरपर्यंत वाढवली. पहिल्याच वर्षी द्राक्षनिर्यात केली. तेव्हापासून सतत २५ वर्षे त्यांची द्राक्षं परदेशांत जायची. लंडनलाही द्राक्षं निर्यात केली. इ.स. २००१ मध्ये त्यांना महाग्रेप्सने लंडनला पाठवले. इ.स. ९७-९८ मध्ये 'सर्वाधिक द्राक्षनिर्यातदार' असा पुरस्कार त्यांना मिळाला. इ.स.२०११ पर्यंत द्राक्षनिर्यात करत होते.

त्या वेळेची आठवण सांगताना ते म्हणतात, ‘शेतमजूर भल्या पहाटे काळोखातच कंदील घेऊन शेतात यायचे, पण द्राक्षं पारखून काढता यावीत म्हणून थोडे उजाडल्यावरच द्राक्षतोडणीला सुरुवात व्हायची. नंतर पॅकिंग होऊन सकाळी दहा वाजता शेजारच्या गावात बैलगाडीने माल पाठवला जायचा. आमच्या गावात पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे मालवाहतुकीसाठी मोठे वाहन गावात येत नव्हते.'

हळूहळू जमिनीतले पाणी कमी व्हायला लागले. कमी पाण्यावरचे पीक म्हणून नवनाथ कसपटे सीताफळ लागवडीकडे वळले आणि पुढे सीताफळ उत्पादन हेच त्यांचे जीवन झाले. नवनाथ कसपटे सांगतात, 'सीताफळाला जानेवारी ते जून या काळामध्ये पाणी लागत नाही. म्हणजेच, केवळ पावसाच्या पाण्यावर भागते. सीताफळ हे हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीत होणारे पीक आहे. कीटकनाशकांचाही फारसा उपयोग करावा लागत नाही. चवीने मधुर असणारे हे फळ आरोग्यदायक आहे. पित्तशामक, वातदोष कमी करणारे व रक्तवर्धक आहे. '

सीताफळाची जात विकसित
सीताफळाची लागवड करायला सुरुवात केली, पण तेवढ्यावरच ते स्वस्थ बसले नाहीत. सीताफळाची अधिक चांगली जात कशी विकसित करता येईल यावर ते विचार करू लागले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. संशोधनांमध्ये दहा अकरा वर्षे गेली. अखेर इ.स.२००१ मध्ये 'एन एम के १ उर्फ गोल्डन' ही सीताफळाची जात विकसित केली. अनेक वर्षांच्या अभ्यासपूर्ण संशोधनाला लागलेले ते एक मधुर फळ होते. त्यांनी आपल्या नावातली अद्याक्षरे एकत्र करून ते नाव या जातीला दिले. गोल्डन सीताफळाने अक्षरशः क्रांती केली. जुन्या वाणाचे एकरी उत्पादन चार टन येत होते. पण या नवीनवाणामुळे ते एकरी आठ ते बारा टन येऊ लागले. या विकसित जातीने कसपटे यांना समृद्धी आणि कीर्ती दिली.

'महाराष्ट्र सीताफळ संघ' स्थापन
अलीकडच्या काळामध्ये कोणतेही कार्य यशस्वी व्हायचे असेल, तर त्याला एक व्यासपीठ लागते. नवनाथ कसपटे यांनी सीताफळ लागवडीचा प्रचार आणि विक्री यासाठी इ.स.२००१ मध्ये 'महाराष्ट्र सीताफळ संघ' स्थापन केला. त्याचे ते संस्थापकीय अध्यक्ष आहेत. 'अखिल भारतीय सीताफळ संघा'चे ही ते अध्यक्ष आहेत. इ.स. २०१९ मध्ये देशातले सीताफळातील पहिले पेटंट त्यांनी मिळवले. आज देशांत सीताफळांची ८० टक्के लागवड त्यांनी विकसित केलेल्या गोल्डन या जातीची आहे. संघाचा अध्यक्ष या नात्याने ते अनेक राज्यात फिरतात, याबाबत व्याख्याने देतात.

सीताफळाची लागवड योग्य रीतीने केली, तर नक्कीच भरघोस उत्पादन मिळते; पण हे पारंपरिक पीक नाही. त्याची लागवड अलीकडेच होऊ लागल्याने, त्याबाबत शास्त्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी ते दरमहा निःशुल्क एक दिवसाचे प्रशिक्षणसुद्धा आयोजित करतात. साधारणपणे दीडशे-अडीचशे लोक या प्रशिक्षणाला येतात. पीपीटी तंत्राचा वापर करून प्रशिक्षण दिले जाते. जेवण व प्रशिक्षण मोफत असते. परराज्यांतूनही प्रशिक्षणासाठी लोक येतात. सीताफळ उत्पादनातून सर्वांनाच लाभ व्हावा, समाजाला याचा फायदा व्हावा, म्हणून ते अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करतात. रामदास स्वामी म्हणतात,'जे जे आपणासी ठावे, ते इतरांसी सांगावे । शहाणे करूनी सोडावे सकल जन ।। ' याचेच हे उत्तम उदाहरण आहे!

'मधुबन'नावाने नर्सरीची निर्मिती
नवनाथ कसपटे यांनी इ.स. १९९७-९८मध्ये 'मधुबन' या नावाने नर्सरी उभारली. ही भारतातील सर्वांत मोठी सीताफळ नर्सरी आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर ही नर्सरी उभी आहे. त्यामध्ये जागतिक दर्जाच्या सीताफळांच्या ४२ जातींची रोपे मिळतात. या नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांना ६० लाखांहून अधिक रोपे उपलब्ध करून दिली आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या जातीच्या सीताफळाचे त्यांनी पेटंट घेतले आहे त्या जातीची रोपेच ते देतात. त्यामध्ये शंभर टक्के शुद्धतेची हमी असते. स्वतःसाठी जगताना दुसऱ्यांनाही जगवण्याचे कार्य ते याद्वारे करत आहेत.

सीताफळ संशोधनासाठी प्रयोगशाळेची निर्मिती
सीताफळावर संशोधनासाठी त्यांनी एक प्रयोगशाळा उभारली आहे. त्यांच्या शेतामध्ये सीताफळाच्या तीन हजार जातींवर संशोधन चालू आहे व त्यामध्ये निवडक २४ जातीच्या वाणांवर संशोधन चालू आहे. प्रयोगशाळेमध्ये फळाची लांबी, वजन, पिकल्यानंतरचे वजन, टिकण्याचा कालावधी, आतील गराचे प्रमाण, बियांची वर्गवारी व गुणधर्म, गरातील साखरेचे व आम्लाचे प्रमाण, इतक्या सगळ्या गोष्टींबाबत सूक्ष्म निरीक्षणे नोंदवली जातात आणि त्यातूनच महत्त्वपूर्ण संशोधन आकार घेते. मायक्रोबायॉलॉजीमध्ये पदवी संपादन केलेली त्यांची सून अमृता रवींद्र कसपटे यांची प्रयोगशाळेत या कामासाठी मदत होते. त्यांच्या नर्सरी व शेती व्यवसायामुळे जवळजवळ २०० ते २५० लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्या दीड हजार लोकवस्तीच्या गावाचे ९५ टक्के अर्थकारण सीताफळावर अवलंबून आहे. या छोट्याशा गावामध्ये दीडशे नर्सरी आहेत. रस्त्याच्या कडेला बसून सीताफळांच्या रोपांची विक्री केली जाते. यावरून वाणाची लोकप्रियता आणि प्रसिद्धी लक्षात येते. अनेक लोकांचे जीवन या सीताफळरूपी गंगेने समृद्ध केले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून गेले आहे.

खर्च आणि उत्पन्न किती?
सीताफळाच्या लागवडीचा एकरी खर्च सुमारे एक लाख रुपये आहे. पण तिसऱ्या वर्षापासून १ लाख रुपये उत्पन्न चालू होते व ५ वर्षापासून पुढे एकरी ४ ते ५ लाख रुपये उत्पन्न मिळते. सुरुवातीच्या काळात तर एकरी बारा लाख रुपये उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतले. या उत्पादनामुळे कित्येक शेतकरी दरवर्षी लखपती अथवा करोडोपती होत आहेत. आपल्या या उद्धारकर्त्याबाबत लोकांच्या मनात प्रचंड आदर आहे. शेतकरी स्वतः येऊन त्यांचा सत्कार करतात. बऱ्याच लोकांनी नवनाथ कसपटे यांचे फोटो प्रेमाने घरात लावले आहेत. तेलंगणात तर त्यांचा डिजिटल फोटो लावून सीताफळांची विक्री केली जाते. नवनाथ कसपटे हे सीताफळ उत्पादनातील 'ब्रँड नेम' झाले आहे.

पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बेंगलुरू हैदराबाद ही सर्व शहरे त्यांच्या मालाची बाजारपेठ आहेत. शहरामध्ये चांगला भाव मिळतो. त्यांनी विकसित केलेल्या NMK-१ गोल्डन या सीताफळ जातीस भरपूर गर असून यामध्ये खूप कमी बिया निघतात. इतर जातींच्या सीताफळांच्या प्रमाणात या सीताफळाचे वजन जास्त भरते. ६०० ते १००० ग्रॅमवजनाची फळे सहज मिळतात. NMK-१ गोल्डन जातीची सीताफळे दिसायला आकर्षक, देखणी, डोळे मोठे, रंग सोनेरी पिवळा अशी असतात. या फळांना क्रॅकिंग होत नाही व पिकलेले फळ झाडावरून खाली पडले तरी सहजासहजी फुटत नाही. त्यामुळे NMK-१ गोल्डन सीताफळांना भारताच्या कानाकोपऱ्यात रस्ता वाहतुकीने पाठवली जाऊ शकतात. दुबई, लंडन येथे हवाई मार्गाने खराब न होता पोहोचवली जाऊ शकतात व तेथे चांगली मागणी आहे. पंजाबमधील मोहाली येथील कृषी विद्यापीठातून श्री. योगेश गुप्ता यांनी तीन वर्षे मधुबन नर्सरीत राहून NMK १ गोल्डनवर पीएच.डी. पूर्ण केली आहे.

बेंगलुरूविद्यापीठाकडून डि.लिट.पदवी
नवनाथ कसपटे यांना शंभराहून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. हे पुरस्कार जतन करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र खोली बांधली आहे. यावरूनच त्यांच्या पुरस्कारांची संख्या लक्षात येते. नवनाथजी म्हणतात, 'मी दहावी शिकलेला माणूस. पण मला बेंगलुरूविद्यापीठाने डि.लिट. ही पदवी दिली. याहून अधिक धन्यता कशात असणार ?' कृषी क्षेत्रातील कृषिगौरव हा पुरस्कार त्यांना इस २०१८ मध्ये मिळाला. शासकीय, निमशासकीय व अन्य विविध संघटना यांच्याकडून त्यांना वेळोवेळी सन्मानित केले गेले.

इ.स.२०१२ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया येथील 'आंतरराष्ट्रीय सीताफळ परिषदे' मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली. हा सुद्धा एक सर्वोच्च सन्मान आहे. त्यांना त्यांची पत्नी सौ. सुलन यांची मोलाची साथ आहे. घरची सर्व आघाडी त्या संभाळतात. सुरुवातीच्या दिवसात शेतातही त्यांनी भरपूर कष्ट केले. ज्येष्ठ चिरंजीव रवींद्र हे शेती बघतात व व्यवसायात वडिलांना मदत करतात. धाकटे चिरंजीव प्रवीण यांनी ट्रॅक्टरची डीलरशिप घेतली आहे. दोन्ही सुना अमृत आणि सोनाली यासुद्धा व्यवसायात मदत करतात.

हालाखीची परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले नवनाथ, दुष्काळी कामात रस्त्यावर खडी फोडायचे काम केलेले नवनाथ आज आपल्या कोरडवाहू जमिनीतून लाखो रुपयांचे पीक घेतात. जेमतेम दहावीपर्यंत शिकलेले नवनाथ विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळवतात. एम्.बी.ए. झालेल्या तरुणांनासुद्धा आपल्या उद्योगात रोजगार देतात. आपल्या उत्पादनाचे नाव अधिसूचित दाखल करण्यापासून घेण्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करतात. इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये भारताचे पेटंट प्रतिनिधित्व करतात. देशभर व्याख्याने देतात. प्रशिक्षण देऊन अनेकांचे जीवन उजळून टाकतात. या सर्वच गोष्टी 'नवल वर्तले गे माये' या सदरात मोडतात, थक्क करून टाकतात! शून्यातून विश्व उभे करणाऱ्या त्यांच्या या कर्तृत्वाला मनःपूर्वक दाद द्यायलाच हवी !

English Summary: Sitaphal made the farmer a hero Success Story News Published on: 03 November 2023, 05:11 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters