कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. पण लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पोट भरण्यासाठी लोकांनी अनेक आपला व्यवसाय सुरू केला. तर काहींनी शेतीचा व्यवसाय सुरू केला आणि लाखो रुपयांची कमाई केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एका दाम्पत्याने पण कोरोना काळात मुंबईतील नोकरी सोडून स्वत:चा शेती व्यवसाय सुरु केला आणि दमदार कमाई केली.
शिवाजीनगर गावातील योगेश शंकर गावडे आणि योगिता गावडे दाम्पत्याने गावी येत हळदीची शेती सुरू केली. अन् अवघ्या काही महिन्यात त्यांनी यामध्ये यशही मिळवलं. त्यांच्या या प्रयोगामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता हळद लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे.
दापोली तालुक्यातील साखलोलीजवळील शिवाजीनगर गावातील योगेश गावडे या शेतकऱ्याने 3 गुंठे क्षेत्रावर ‘सेलम’ या सुधारित जातीच्या हळदीची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली.
वन्यप्राण्यांपासून संरक्षण
रानटी प्राणी, माकड-वानरांपासून संरक्षण पीक म्हणून हळद पिकाचा उपयोग होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हळद लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. दापोलीमध्ये शिवणारी, कोळबांद्रे, सडवे, साखलोळी व शिवाजी नगर असे 5 गावात मिळून जवळपास 60 ते 65 शेतकऱ्यांनी ‘सेलम’ या हळदीची शेती केली आहे.
सेलम जातीचा सदुपयोग करून यंदा हळद लागवडीचा प्रयोग
भूमी कृषी धन शेतकरी सेवा संघ ह्या छत्राखाली येऊन शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या सेलम जातीचा सदुपयोग करून यंदा हळद लागवडीचा प्रयोग केला. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून एक दिवसीय प्रशिक्षण घेऊन लागवडीबाबत इत्थंभूत माहिती घेतल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे त्यांनी यंदा या जातीची लागवड केली. यांच्याकडून ‘सेलम’ या स्थानिक जातीचे 500 हळद रोपे विकत घेऊन व स्वतः 200 रोपे तयार करून योगेश गावडे यांनी 3 गुंठे क्षेत्रावर हळदीची लागवड केली. केवळ सेंद्रिय खतावरच ही लागवड करायचे निश्चित केले. शेणखत संवर्धन सेंद्रिय खत वापर केले. मे महिन्यात लागवड केली. ज्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर लागवडीसाठी केला आणि त्यानुसार हळदीची झालेली वाढ पाहता यंदा चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वास वाटतो, असेही गावडे यांनी सांगितले.
योगेश गावडे यांचा नेहमीच्या पिकांपेक्षा वेगळे पीक घेण्याचा प्रयोग आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा उपक्रम कोकणातील अन्य शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरू शकेल. आजही कित्येक मुलं ही फक्त लग्न करण्यासाठी कंपनीत कामाला जातायेत. लग्न झाले की काही वर्षांनी नोकरी गेल्यावर किंवा शहरात राहणे जमत नसल्यामुळे गावी घरी येतात मग आपण भामटे होतो. तर काही लोकं मग मुलीची फारकत घेतात आणि समाजत इज्जत घालून घेतात. त्यापेक्षा आजच शेतकरी मुलगा निवडा 3 गुंठे किंवा एक एकर शेती असेल मुलगा निर्व्यसनी असेल शेती हंगामी बागायती असेल तरी तो लाखोंच उत्पन्न काढू शकतो. जास्त शेती ही कोणाकडे राहिली नाही म्हणून 3 एकर 10 एकर हा विषय सोडून द्या, असेही गावडे म्हणाले.
हेही वाचा : काय सांगता ! वाळवंटी खजुराची बारामतीत रुजवण; प्रयोगशील शेतकऱ्याने यशस्वी केला प्रयोग
गावातून एक किंवा दोन मुलांना गुंठे प्रमाणे शेती वाट्याला येतात. जेवढी जास्त शेती तेवढचं कष्ट जास्त, खर्च जास्त, नुकसान झाले तर ते जास्त प्रमाणात होते. शेती ह्या व्यवसायात कोणाचा रुबाब ऐकायची गरज नाही, टार्गेट नाही, कोणी आपले मालक नाही, कॉम्पिटिशन नाही, व्यवसाय कायम स्वरूपी टिकाऊ आणि हो शेती ही सेंद्रिय केली तरच फायद्याची ठरेल. कारण आपण जरी शेतीचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढवू लागलो त्याचप्रमाणे आपल्याला उत्पादन खर्च ही कमीच करावा लागेल त्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे इत्यादी झाडे आणि डोंगर उतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे. आणि स्वर्ग टिकवण्यासाठी तरुणाईने शेती व्यवसाय केला पाहिजे.
शेतात थोडेफार काम केल्यामुळे शरीर मजुबूत राहते, प्रदूषण मुक्त हवा, लॉकडाउन असले तरी पाच किलोमीटरपर्यंत शेतात फिरा, सर्व भाजीपाला, दुध आपल्याच शेतातील उपलब्ध, घरभाडे नाही, पाणीपट्टी नाही, ग्रामीण भागतील मज्जा जरा वेगळीच आहे आणि त्यामधे वेगळं सांगण्याची गरज नाही. शेतकरी आज जरी मनाचा राजा असला तरी येत्या काहीच वर्षात तो इतरांचा राजा बनेल. त्यामुळे शेती हाच उत्तम व्यवसाय आहे, असेही शेवटी गावडे यांनी सांगितले.
Share your comments