निर्यातक्षम आंबा उत्पादनातून झाली भरभराट

Saturday, 22 September 2018 09:06 AM
आपल्या आंबा बागेत शेतकरी श्री. परमानंद मल्लाप्पा गव्हाणे

आपल्या आंबा बागेत शेतकरी श्री. परमानंद मल्लाप्पा गव्हाणे

बेळंकी (जि.सांगली) येथील श्री. परमानंद मल्लाप्पा गव्हाणे यांनी दोन एकर क्षेत्रावर केशर जातीच्या आंब्याची सघन पध्दतीने लागवड करून निर्यातक्षम आंब्याचे उत्पादन घेण्यात त्यांनी सातत्य राखले आहे. या आंब्यासाठी त्यांना यंदा प्रतिकिलो सुमारे 111 रूपये दर मिळाला आहे. आंब्याच्या उत्पादनातून त्यांना दर वर्षी सुमारे 15 लाख रूपयाचे शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे. इतर फळ पिकांच्या तुलणेत वेळ, कष्ट व खर्च कमी झाल्यामुळे त्यांच्याकडे सुख, शांती व समाधानाबरेबरच मान-सन्मान व प्रतिष्ठा चालून आली आहे. त्यामुळे त्यांना या केशर आमराईतून खऱ्या अर्थाने आनंद मिळाला आहे.

मिरज पूर्व भागात द्राक्षाच गाव म्हणून बेळंकी गावाचे नाव आहे. पूर्वी या गावीची ओळख पानमळे व हळद लागवडीचे गाव म्हणून होती. त्यानंतर या गावात मोठा पीक बदल झाल्यामुळे आता जिकडे पवावे तिकडे द्राक्षाच्या बागाच-बागा पहावयाला मिळतात. या गावातील शेतकरी द्राक्षाची आगावू छाटणी करून मार्केटींग करण्यावरच जास्त भर देतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाला डोंगराचे वरदान लाभले आहे. सुमारे चार वर्षापूर्वी कृष्णा नदीचे पाणी म्हैशाळ प्रकल्पातून या गावाला मिळाल्यामुळे हे गाव आता सुजलाम-सुफलाम बनले आहे.

या पाण्यामुळे या गावात केवळ 50 हेक्टर वरून सुमारे 250 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांची लागवड झाली आहे. या गावात द्राक्ष बागा वाढू लागल्या तशा द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीतही वाढ झाली. त्यामुळे इथल्या काही शेतकऱ्यांनी आता या समस्यांचा निपटारा करण्यासाठी पिक बदलाचा प्रयोग म्हणून द्राक्षाच्या जोडीला आंबा लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गावात आता सुमारे 40 ते 50 एकर क्षेत्रावर आंब्याची लागवड झाली आहे. बेळंकीत पहिली आंब्याची बाग कोणी लावली हा तसा संशोधनाचा विषय होईल. मात्र अतिशय चांगल्या पध्दतीने व्यवस्थापन आंब्याच्या बागेचे जर कोणी करत असेल तर ते परमानंद गव्हाणे यांचेच नाव अग्रक्रमाणे घ्यावे लागेल.


परमानंद हे तसे निसर्ग कवी. माझा गाव व पाऊस या दोन कविता त्यांच्या आवडीच्या आहेत. निसर्गावर कविता करता करता त्यांना शेतीचाही चांगलाच लळा लागला. जेमतेम इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या परमानंदांना एकूण नऊ एकर शेती आहे. यामध्ये दोन एकर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड केली आहे. पाच एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग आहे. एक एकर सिताफळ व एक एकर क्षेत्रावर पेरूची लागवड केली आहे. या सर्वच फळ पिकाच्या तुलणेत त्यांना आजवर केवळ आमराईनेच समाधान, प्रतिष्ठा व मान-सन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे श्री. गव्हाणे त्यांच्या आमराईचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पध्दतीने करताना दिसत आहेत.  

द्राक्ष बागेतील वाढत्या समस्या व खासकरून अलिकडच्या काळात द्राक्ष बागेच्या कामाला मजुरच मिळत नसल्यामुळे द्राक्ष बागेचा खर्च अफाट वाढू लागला आहे. यातून काही तरी मार्ग काढावा म्हणून श्री. गव्हाणे यांनी द्राक्ष बागेचे क्षेत्र थोडे कमी करून सन 2012 साली सुमारे दोन एकर क्षेत्रावर केशर जातीच्या आंब्याची बाग लावण्याचा निर्णय घेतला. कमी अंतरात जास्त उत्पादन मिळावे म्हणून त्यांनी आंब्याची लागवड बारा बाय चार फुट अंतरावर केली. या नियोजनामुळे एकरी साधारण नऊशे आंब्याची रोपे बसली. एकरी रोपांची संख्या जास्त झाल्यावर काही लोकांनी सुरवातीला त्यांना वेढ्यातही काढले होते. परंतु, यातून प्रत्यक्ष उत्पादन व उत्पन्न हातात येताच तेच लोक त्यांचे कौतूक करू लागले आहेत.

आंब्याच्या बागेतून आपल्याला जास्तीचे उत्पन्न मिळावे त्यासाठी श्री. गव्हाणे यांनी सुरवातीपासूनच बागेचे वेगळ्या पध्दतीने व्यवस्थापन करण्याचे नियोजन करतात. आपला माल एस्पोर्ट झाला तरच आपल्याला चार पैसे जास्त मिळतील असे त्यांना नेहमीच वाटते. म्हणून त्यांनी आंब्याची प्रत चांगल्या दर्जाची येण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी 70 टक्के बाजेचे व्यवस्थापन सेंद्रीय पध्दतीनेच केले आहे. आंब्याच्या बागेला पाट पाणी न देता ठिबकनेच पाणी देण्याची व्यवस्था केली. खरतर त्यांच्या संपूर्ण क्षेत्राला ठिबकनेच पाणी दिले जाते. त्यासाठी त्यांच्या शेतात दोन बोअर व एक विहीर आहे. याचे पाणी घराजवळील हौदात एकत्र करून तिथून ते पाणी ठिबकने पिकाला देण्याची सोय त्यांनी केली आहे. याबरेबरच आंब्याच्या बागेला त्यांनी खत व्यवस्थापन करताना मोठ्या प्रमाणात कुजलेल्या शेणखताचा वापर केला आहे. फलधारणा चांगली व्हावी म्हणून त्यांनी केशर आंब्याच्या बागेत रत्ना, गोवा माणकूर व हापूस आंब्याची काही रोपांची लागवड केली आहे.


गुजरातचा आंबा बाजारात आला तर आंब्याचे भाव पडतात हे त्यांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी आपला आंबा गुजरातचा आंबा बाजारपेठेत येण्यापूर्वीच कसा विकला जाईल याचे नियोजन केले. त्यासाठी त्यांनी कल्टार या संजिवकाचा प्रभावीपणे वापर केला. त्यामुळे त्यांचा आंबा केशर असूनही सगळ्यात आगोदर तयार झाला. म्हणजे इतर बागांच्या तुलणेत सुमारे 15 ते 20 दिवस आगोदर तयार झाला आहे. कल्टार वापराच्या काळात पावसाळा असतो. त्यामुळे या काळात ते पाण्याचे व्यवस्थापन अगदी काटेकोर पणे करतात. आंब्याला सनस्ट्रोक (उनाचा चट्टा) पडू नये म्हणून त्यांनी उन्हात येणाऱ्या आंब्यांना ग्रो-कव्हर घातले. यामुळे त्यांच्या बागेतील एकाही आंब्याला उनाचा चट्टा पडून नुकसान झाले नाही. झारखंडच्या व्यापाऱ्याला त्यांनी प्रतिकिलो 111 रूपये दराने आंब्याची जागेवर विक्री केली. एस्पोर्ट कॅलेटीचा आंबा म्हणून त्यांच्या आंब्याला हा दर मिळाला आहे. हा झारखंडचा व्यापारी त्यांचा आंबा लंडनला पाठवत असल्याचे सांगितले. आंबा लागवडीनंतर त्यांना पहिले उत्पादन सुमारे तीन वर्षाने म्हणजे सन 2015 साली आले. त्यावेळी आंब्याचे पहिले पिकाचे सुमारे 5 टन उत्पादन मिळाले. 2016 साली 8 टन, गतवर्षी 2017 साली 14 टन आंब्याचे उत्पादन मिळाले आहे. पैकी 12 टन आंबा त्यांचा व्यापाऱ्यांनी एस्पोर्ट केला होता.

सध्या त्यांच्या बागेत गत वर्षीच्या तुलणेत झाडांवर आंब्याची संख्या अधिक दिसत आहे. तरीही यंदा त्यांनी कमी-जास्त मिळून दोन एकर क्षेत्रातून 14 ते 15 आंब्याचे उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. सद्यस्थितीत त्यांचा सुमारे 5 टन आंबा एस्पोर्ट झाला आहे. यासाठी त्यांना प्रतिकिलो सुमारे 111 रूपये दर मिळाला असून सुमारे 5 लाख 50 हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. अजून नऊ ते दहा टन आंब्याचे उत्पादन मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. यातून त्यांना 9 ते 10 लाख रूपयाचे उत्पन्न येणे अपेक्षीत आहे. पाड लागलेला आंबा एस्पोर्ट करणारा व्यापारी घेत नाही. त्यामुळे त्यांनी आंब्याचे देठ बसले (खोलगट होणे) आणि आंब्याच्या सालीवर बारीक पिवळे ठिपके दिसले की हा आंबा तयार झाल्याचे समजतात. श्री. गव्हाणे यांच्या बागेत यंदा पावने दोनशे ग्रॅम ते 370 ग्रॅम वजनाचे आंबे तयार झाले आहेत. एस्पोर्ट साठी 200 ग्रॅम ते 400 ग्रॅम पर्यंतचा आंबा लागतो. त्यामुळे श्री. गव्हाणे यांच्या बागेतील बहुतांश आंबा हा एस्पोर्ट कॅलेटीचाच निघाला आहे. 200 ग्रॅमच्या कमी वजनाचे आंबे ते स्थानिक बाजारपेठेत विकतात. काही ग्राहक घरी येऊनही आंबा खरेदी करतात. आंबा नैसर्गीक पध्दतीने पिकवला जात असल्यामुळे त्यांना 200 पेक्षा कमी वजनाच्या आंब्याला चांगला दर मिळतो.

व्यापाऱ्यालाच बनवले शेतकरी :

गेली चार वर्षापासून त्यांच्याकडे एकच व्यापारी आंबा विश्वासाने खरेदी करतो. शेतकऱ्याचा माल चांगल्या भावाने विकला पाहिजे आणि व्यापारीही टिकला पाहिजे अशी भूमिका घेत त्यांनी व्यापाऱ्याचा विश्वास मिळवला आहे. हा व्यापारी बाहेर कुठे जाऊ नये म्हणून त्यांनी त्या व्यापाऱ्याला माळशिरस तालुक्यातील पिलीव या गावी एका शेतकऱ्याची आंब्याची बाग करायला दिली आहे. त्यामुळे आंबा व्यापारीच शेतकरी बनल्यामुळे दोघांची चांगलीच जोडी जमली आहे. व्यापाऱ्याला त्याची आंब्याची बाग चांगली आणण्यासाठी श्री. गव्हाणे यांची गरज आहे. तर श्री. गव्हाणे यांना त्यांचा आंबा विकण्यासाठी चांगल्या व्यापाऱ्याची गरज आहे. याचा फायदा त्यांना आंब्याच्या बागेतून जास्तीचे उत्पन्न मिळवण्यात झाला आहे. जागेवरच माल विक्री होत असल्यामुळे आंबा काढणीची त्यांना मजुरांची गरज पडत नाही. व्यापारी स्वतः आंबे उतरून जागेवर वजन करून घेऊन जातात. त्यामुळे श्री. गव्हाणे यांना मजुरांची जुळवाजुळव करण्याची गरज पडली नाही.  

आंब्याची काढणी झाल्यावर छाटणीचे काम अतिशय महत्वाचे असते. कारण छाटणीवरच पुढील बहाराचे नियोजन होत असते. साधारण मे महिण्यात ते बागेची छाटणी करताना झाडातून सूर्यप्रकाश दिसेल अशा पध्दतीने अतिरिक्त झालेल्या काड्या काढून टाकतात. अशा काड्या राहिल्या तर त्या झाडाला अपेक्षीत फलधारणा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

"माझ्याकडे सिताफळ, पेरू व द्राक्ष बाग सुध्दा आहे. परंतु, आंब्याच्या बागेतून उत्पन्नाबरोबरच जे सुख व समाधान मिळाले ते दुसऱ्या कोणत्याच फळ पिकातून मला आजवर मिळाले नाही. या बागेने मला खूप काही मिळवून दिले. माझ्या कुटुंबाला स्वास्थ मिळाले. त्याचा मला फार आनंद झाला आहे"

श्री. परमानंद मल्लाप्पा गव्हाणे 
(आंबा उत्पादक शेतकरी, बेळंकी, सांगली) 
9764551951

mango sangli keshar mango pruning आंबा सांगली केशर निर्यात लाख हापूस रत्ना सेंद्रिय hapus ratna export

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.