शेती क्षेत्रात काळानुरुप बदल घडवून आणणे अत्यावश्यक ठरते. भारतातील तसेच राज्यात देखील शेतीचे क्षेत्र लक्षणीय घटतांना दिसत आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे वाढते औद्योगिकरण (Industrialization), शहरीकरण (Urbanization) तसेच वाढती जनसंख्या (Growing population) देखील आहे. त्यामुळे सामूहिक शेती (Collective farming) करणे ही काळाची गरज बनली आहे. सामूहिक शेती शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरू शकते याचेच एक उदाहरण समोर आले आहे ते म्हणजे झारखंड (Jharkhand) या आदिवासीबहुल (Tribal) राज्यातून. झारखंड एक मागासलेले राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याच्या गुमला जिल्ह्यातील (Gumla District) बिशनपूर तालुका राज्यातील सर्वात मागासलेला भाग आहे.
या तालुक्यात व आजूबाजूच्या परिसरात अद्यापही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. सिंचनासाठी या भागात पर्याप्त सुविधा नसल्याने अजूनही येथे परंपरागत सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. जेएसएलपीएस यांच्या सहयोगाने बिषणपुर तालुक्यातील करमटोली गावातील एका बचत गटातील महिलांनी सामूहिकरीत्या 50 एकर क्षेत्रावर वाटाणा पिकाची लागवड केली, यामुळे या बचत गटांच्या महिलांना मोठा आर्थिक फायदा झाला. म्हणून या गावातील महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजूबाजूच्या परिसरात देखील वाटाणा लागवड (Peas Cultivation) करण्यावर भर दिली जात आहे.
सर्वात आधी बचत गटच्या महिलांना त्यांच्या गावातच वाटाण्याची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले, त्यानंतर त्यांना वाटाणा शेतीसाठी प्रशिक्षण (Training) देखील देण्यात आले. त्यानंतर गावातीलच वेगवेगळ्या गटातील 18 महिलांनी सामूहिक शेती करण्याचा निर्धार केला. त्यानुसार या महिलांनी त्यांच्या गावातील नदी जवळ खाली पडलेल्या जमिनीत शेती करण्याचे मन बनवले, त्यासाठी त्यांनी ती जमीन भाडेतत्त्वावर घेतली. त्या जमिनीला लागून गटातील काही महिलांच्या देखील शेतजमिनी होत्या, भाडे तत्वाची जमिन आणि गटातील महिलांच्या जमिनी मिळवून सुमारे 50 एकर क्षेत्रात 18 महिलांनी वाटाणा शेती करण्यास सुरुवात केली.
या महिलांना एक एकर वाटाणा शेती साठी सुमारे 45 हजार रुपये खर्च आला. आणि त्यांना एक एकर क्षेत्रातून जवळपास एक लाख 47 हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले. म्हणजे या महिलांना एकरी एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. वाटाणे शेतीतून मिळालेला फायदा या महिला शेतकऱ्यांचे मनोबल (Morale) वाढविण्यास खूप कारगर सिद्ध झाले. आणि आता या गटातील महिला येत्या हंगामात जवळपास शंभर एकर क्षेत्रात वाटाणा लागवड करण्याचा विचार करीत आहेत.
या महिलांना मिळालेले दैदिप्यमान यश (Glorious success) सामूहिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पुरेसे आहे. या बचत गटातील महिलांनी सामूहिक शेतीचे महत्त्व इतर शेतकऱ्यांना पटवून देण्याचे कार्य केले आहे असेच म्हणावे लागेल. बदलत्या काळानुसार शेतकरी बांधवांना देखील बदलावे लागेल आणि सामूहिक शेतीचे महत्त्व समजून सामूहिक शेती करण्याचा विचार करावा लागेल.
Share your comments