देशातील शेतकरी सध्या आधुनिकतेची कास धरून अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड करत आहेत. यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फायदा होत असून आर्थिक सुबत्ता नांदताना दिसत आहे. राज्यातील अनेक शेतकरी सध्या भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत. अल्प कालावधीत उत्पादनासाठी तयार होत असल्याने शेतकरी बांधव अलिकडे भाजीपाला लागवडीस विशेष प्राधान्य देत आहेत. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील बारूळ येथील एका शेतकऱ्याने 20 गुंठे पडीत क्षत्रावर मिरची लागवडीतून जवळपास दोन लाख रुपयांचे उत्पन्न अर्जित केले आहे. बारूळ येथील प्रगत शेतकरी शिवकांत इंगळे यांनी ही किमया साधली आहे.
शिवकांत इंगळे नांदेड येथे एका कंपनीत काम करत होते, मात्र कंपनीत त्यांना खूपच तुटपुंजी पगार मिळत असल्याने त्यांना उदरनिर्वाह भागवले देखील मुश्किलीचे होऊन बसले होते. शेवटी कंटाळून शिवकांत यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि शेती करण्याच्या हेतूने गावाकडे परतले. गावाकडे आल्यानंतर शिवकांत यांनी आपल्या 20 गुंठे पडीत जमिनीत स्पायसी हिरव्या मिरचीची लागवड केली, या समवेतच शिवकांत आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात. मात्र शिवकांत यांना मिरचीच्या लागवडीतून चांगला नफा प्राप्त झाला. पहिल्याच तोडणीत वीस गुंठे क्षेत्रातून त्यांना पंचवीस हजार रुपयांचा नफा मिळाल्याचे शिवकांत यांनी सांगितले. बारूळ शिवारात फक्त शिवकांत भाजीपाला लागवड करतात असे नाही शिवारातील इतर शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात अल्प कालावधीत उत्पादन देण्यासाठी सज्ज होणाऱ्या भाजीपाला पिकाची लागवड करतात.
गतवर्षी शिवकांत यांनी टोमॅटो लागवड केली होती मात्र टोमॅटोच्या पिकातून त्यांना उत्पादन खर्च काढणे देखील शक्य झाले नाही. त्यामुळे शिवकांत यांनी मिरची लागवडीचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांनी 2500 मिरचीच्या रोपांची लागवड केली. शिवकांत यांनी नोव्हेंबर महिन्यात मिरची लागवड केली. शिवकांत यांनी लागवडीसाठी आवश्यक पूर्वमशागत स्वतः केली तसेच मिरचीच्या दर्जेदार उत्पादनासाठी त्यांनी शेणखताचा वापर केला. त्यांनी मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा उपयोग केला आहे. त्यांना मल्चिंग पेपरसाठी सहा हजार रुपये आणि मिरचीच्या रोपासाठी तीन हजार रुपये खर्च आला. कीटकनाशक तसेच इतर औषध फवारणीसाठी त्यांना आठ हजार रुपये खर्च आला. त्यांनी मिरचीची लागवड मंडप पद्धतीने केली असल्याने मंडप उभारण्यासाठी आवश्यक बांबू व तारसाठी 3500 रुपयाचा खर्च आला. एकंदरीत शिवकांत यांनासुमारे 25 हजार रुपये मिरची लागवडीसाठी खर्च आल्याचे सांगितले जात आहे.
मिरची पिकाला पाणी देण्यासाठी शिवकांत यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर केला आहे, त्यामुळे पाण्याची बचत झाली शिवाय यामुळे श्रम बचत व वेळेची देखील बचत झाली आहे. शिवकांत यांनी आता चालूच लागवड केलेल्या मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी नेला त्यांना यातून सुमारे 25 हजार रुपये प्राप्त झाले. शिवकांत स्वतः आठवडी बाजारात जाऊन मिरचीची विक्री करत असतात. त्यांना पहिल्या तोड्यात 65 रुपये किलोप्रमाणे मिरचीला बाजार भाव प्राप्त झाला. मिरचीची अजून सहा वेळा तोडणी होणार असल्याचा शिवकांत यांना अंदाज आहे आणि यातून जवळपास त्यांना अजून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
Share your comments