कांदा म्हटले म्हणजे देईल तर भरभरून नाहीतर जे आहे ते ही हिरावून नेईल असे पीक आहे. कांद्याच्या भावात कधीही स्थिर नसतात. उत्पादनाचे प्रमाण, सरकारी धोरणे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा देखील कांदा भाव आवर परिणाम होत असतो.
परंतु बाजारपेठेचा अभ्यास लागवडीचा अचूक वेळ या गोष्टी कांदा लागवडीत यश देऊन जातात. या लेखामध्ये आपण अशाच एका शेतकऱ्यांची माहिती घेणार आहोत की त्यांनी अगदी 30 गुंठ्यामध्ये विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
शेतकऱ्याची यशोगाथा
सचिन महाडिक हे हवेली तालुक्यातील शिंदवणे या गावातील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या केवळ तीस गुंठे क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली होती. या तीस गुंठे क्षेत्रातून त्यांनी तब्बल दोन लाख 32 हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. जर आपण या परिसराचा विचार केला तर उरळीकांचन तसेच कुंजीरवाडी परिसरामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बाजारामध्ये कांद्याच्या दरात कायम चढ उतार होत असते परंतु देखील या परिसरात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. याच परिसरातील शेतकरी महाडिक यांनी विक्रमी कांद्याचे उत्पादन घेतले आहे.
याबाबतीत महाडिक यांनी सांगितलेला अनुभव
याबाबत सांगताना म्हटले की, मी पंधरा वर्षापासून कांद्याचे उत्पादन घेतो. बऱ्याचदा शंभर ते दोनशे रुपये क्विंटलने देखील कांदा विक्री ची वेळ आल्याने भांडवल देखील निघाले नव्हते. परंतु तरीही कांदा लागवड न थांबता हवामानातील बदल,रासायनिक खते व मजुरीचा खर्च यांची पर्वा न करता या वर्षी 30 गुंठे क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले. परंतु आता तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याचा दर मिळाल्याने हातात चांगले पैसे पडले. हवामान बदलाचा विचार करून त्यानुसार औषधे व खतांचे व्यवस्थापन केल्याने व पाणी व्यवस्थापन ठिबकचा वापर केल्याने हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी या पिकासाठी शेणखताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला असून रासायनिक खते हे अगदी अल्प प्रमाणात वापरले आहेत.
याच परिसरातील इतर शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली होती परंतु हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे एका एकरात पन्नास गोण्या देखील कांदा निघू शकला नाही. परंतु शेती आधुनिक नियोजन पद्धतीने केली तर निश्चित फायदा होतो असे महाडिक यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले. या तीस गुंठे क्षेत्रात त्यांना 50 हजार रुपये खर्च आला आणि उत्पादन दोन लाख 32 हजार रुपयांची मिळाले. यामधून खर्च वजा जाता एक लाख 82 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.(स्रोत-मराठीपेपर)
Share your comments