शेतकरी बांधवांना वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी अवकाळी गारपीट ढगाळ वातावरण या निसर्गाच्या लहरी स्वभावामुळे शेतकरी बांधवांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. या नैसर्गिक संकट व्यतिरिक्त काही सुलतानी संकटे देखील बळीराजाला घातक ठरत आहेत.
कधी वीज तोडणी केली जाते तर कधी शेतमालाला अतिशय कवडीमोल दर मिळत असतो या सर्व बाबींचा विचार करून शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असे म्हणू लागला आहे. मात्र असे असले तरी असे अनेक शेतकरी आहेत जे आपली नवीन वाट चोखाळत शेती क्षेत्रात एक नवीन कीर्तिमान स्थापित करत असतात. बीड जिल्ह्यातील मौजे माकेगाव येथील एका शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये एक नवीन मार्ग शोधला आणि आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे.
या शेतकऱ्याने योग्य नियोजन करून एक एकर क्षेत्रात ज्वारीची लागवड केली होती. या एक एकर क्षेत्रात असलेल्या ज्वारीच्या पिकातून त्यांना तब्बल 28 क्विंटल ज्वारीचे उत्पादन प्राप्त झाले आहे. ही वाखाण्याजोगी किमया सदर शेतकऱ्याने साधली असल्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुचित्रा या ज्वारीच्या वानाची प्रात्यक्षिक घेण्याच्या हेतूने आंबेजोगाई तालुक्याच्या एकूण 47 शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रासाठी आवश्यक बियाणे पुरविण्यात आले होते.
या अनुषंगाने सदर शेतकऱ्यांनी आपापल्या एक-एक एकर क्षेत्रात ज्वारीच्या या वाणाची पेरणी केली होती. या 47 शेतकऱ्यांपैकी माकेगाव येथील दिलीप देशमुख यांनी या ज्वारीच्या वानातून सर्वाधिक उत्पादन मिळवले आहे. दिलीप देशमुख यांनी केवळ एक एकर क्षेत्रात 28 क्विंटल ज्वारीचे उत्पादन घेवून तालुक्यात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
ज्वारी पेरणी केल्यानंतर दिलीप यांनी ज्वारी पिकाला तीनदा पाणी दिले होते. याव्यतिरिक्त ज्वारी पिकासाठी दोनदा खताच्या मात्रा दिल्या होत्या. पेरणी केल्यानंतर लागलीच खतांची पहिली मात्रा दिली त्यानंतर एक महिन्यांनी खताची दुसरी मात्रा दिली गेली.
एक एकर ज्वारीच्या पिकासाठी त्यांना सुमारे 15 हजार रुपये खर्च आला. एक एकर क्षेत्रातून त्यांना 70 हजारांचे उत्पन्न मिळाले म्हणजेच त्यांना निव्वळ नफा 55 हजार रुपये मिळाला. ज्वारी व्यतिरिक्त त्यांना चोरीच्या कडब्यातून देखील जवळपास 40 हजारांचे उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच एक एकर क्षेत्रातून त्यांना निव्वळ नफा एक लाख रुपये शेष राहणार आहे.
Share your comments