भारत ही चमत्काराची भूमी, भारत ही मानसन्मानाची भूमी, भारत ही स्वाभिमानाची भूमी असं का म्हटले जाते याविषयी वारंवार आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणे येत असतात. आज आपण शेती क्षेत्रात घडलेल्या एका चमत्काराचे उदाहरण जाणुन घेऊया. शेती क्षेत्रात हा चमत्कार घडला आहे उत्तर प्रदेश राज्यात.
उत्तर प्रदेश मधील एका अवलिया शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये चमत्कार करीत स्वाभिमानाने मान सन्मान मिळवला आहे. राज्याच्या बाराबंकी येथील रामशरण वर्मा या शेतकऱ्याने शेती क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. वर्मा यांचे आजचे कार्य या वस्तुस्थितीचा जिवंत पुरावा आहे की शेती केल्याने केवळ शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकत नाही, तर मजुरांना त्यांच्या गावात रोजगारही उपलब्ध होऊ शकतो.
बाराबंकीच्या दौलतपूर गावातील रामशरण वर्मा यांनी मॅट्रिकनंतर 1980 मध्ये त्यांच्या वडिलोपार्जित 6 एकर जमिनीवर नांगर-बैलांच्या सहाय्याने भात आणि गव्हाची पारंपरिक शेती सुरू केली. शेती करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांच्या कालावधीतचं त्यांना भात आणि गव्हाच्या शेतीचा फारसा फायदा होत नसल्याचे प्रकर्षाने जाणवायला लागले.
या अनुषंगाने त्यांनी शेतीमध्ये मोठा बदल करण्याचे ठरवले आणि मग सुरु झाला तो खरा प्रवास. त्यांनी पीकपद्धतीत बदल करीत फळे आणि भाजीपाला लागवडीकडे आपला मोर्चा वळवला. इथंपर्यंत फळबाग व भाजीपाला लागवड करून शेतकर्यांना जास्त उत्पन्न मिळते एवढेच त्यांनी ऐकले होते. मग त्यांनी याबाबत चांगले संशोधन केले आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून सर्व बारकावे जाणून घेतले. केळी उत्पादकांबद्दल जाणून घेण्याची त्यांना खूप उत्सुकता देखील होती.
महत्वाची बातमी
Onion Rate : गुजरात सरकारचा कांद्याच्या दराबाबत मोठा निर्णय!! महाराष्ट्रात का नाही? मोठा प्रश्न
असा कसा हा खोडसाळपणा! अज्ञात माणसाने हत्याराने केले कलिंगडाचे पीक उद्ध्वस्त
रामशरण वर्मा यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी आपला महाराष्ट्र दौरा केला आणि या ठिकाणी येऊन त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांची शेती पाहिली. महाराष्ट्रात आल्यानंतर रामशरण वर्मा यांना एक गोष्ट समजली की केळी पिकवणारे शेतकरी अधिक समृद्ध आहेत. यामुळे त्यांनी केळीची बाग लावण्याचा निर्णय घेतला मग आपल्या गावी परत आल्यावर रामशरण वर्मा यांनी केळीची लागवड करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला रामशरण वर्मा यांनी 1 एकर क्षेत्रात केळीची लागवड केली. एक एकरात लावलेल्या केळीच्या बागेतून त्यांनी चांगला नफा कमविला. यानंतर हळूहळू रामशरण यांनी केळी लागवडीचे क्षेत्र वाढवले. 1990 च्या दशकात टिश्यू कल्चरचा उपयोग करून केळी लागवडीचे नवीन तंत्र बाजारात आले होते. त्यावेळी नवीन असलेला या तंत्राचा अवलंब करत रामशरण वर्मा यांनी चांगला नफा कमावला. या पद्धतीने रामशरण वर्मा यांनी 6 एकर शेती पासून सुरवात केली आणि आज 300 एकर शेत जमिनीचे मालक बनले आहेत.
रामशरण यांनी शेतीमध्ये मिळवलेल्या नेत्रदीपक यशामुळे त्यांना एकूण सहा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही रामशरण वर्मा यांना 2019 मध्ये कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री हा भारतातील एक प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाला आहे. निश्चितच भारताला चमत्काराची भूमी म्हणून का संबोधले जाते याचे जिवंत उदाहरण म्हणजेचं पद्मश्री रामशरण वर्मा.
Share your comments