भारतात आपण बघतो की अनेकांकडे शेती असून देखील शेती परवडत नाही म्हणून ते शेती करत नाहीत. शेती म्हणजे कशाचाच भरोसा नसतो. असे असताना मात्र काही शेतकरी योग्य प्रकारे नियोजन करून चांगले उत्पन्न काढतात. यामुळे त्यांना चांगले पैसे मिळतात. असेच काहीसे हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा इथले शेतकरी पंकज आडकिने यांनी केले आहे. जरबेराच्या दहा गुंठे फूल शेतीमधून ते वर्षाकाठी सात लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत. यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अडकिने यांनी बँकेकडून 14 लाख रुपये कर्ज घेऊन दहा गुंठे जमिनीवर पॉलिहाऊस तयार केले. या पॉलिहाऊसमध्ये तीन तीन फुटाचे असे बेड तयार करण्यात आले. या बेडमध्ये लाल मातीचा वापर करण्यात आला आहे. या मातीवर अडकिने यांनी जरबेरा या फुलांच्या रोपट्यांची लागवड केली. तसेच वाढीसाठी योग्य नियोजन करून त्यांनी खतांचे देखील व्यवस्थापन केले आहे. शेती परवडत नाही असे बहुतांश शेतकरी म्हणतात. परंतु इच्छाशक्ती असेल तर शेती नक्की परवडते आणि लाखोंचं उत्पादन सुद्धा घेता येते.
शेतकरी पंकज अडकिने हे पुणे इथे प्रशिक्षणासाठी गेले असता तिथे फूल शेती त्यांच्या बघण्यात आली. तेव्हाच त्यांनी आपल्या शेतात फुलांचे उत्पादन घेण्याचे ठरवले. फुलांचे उत्पादन कसे घ्यायचे, पाणी आणि फवारणीचा समतोल कसा राखायचा, यातून आर्थिक उत्पन्न किती होते, काय मेहनत घ्यावी लागणार याचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांनी येथेच घेतले. त्यानंतर त्यांनी पैसे नसताना बँकांकडून कर्ज घेऊन याबाबत मोठे धाडस केले. यामुळे ते आज लाखोंमध्ये कमवत आहेत. या जरबेराच्या प्रत्येकी एका फुलाला दहा रुपये ते वीस रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतो.
अडकिने दररोज ही फुले नांदेड आणि हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. त्यांना दररोज तीन ते चार हजार रुपये मिळतात. या फुलांसाठी खूप कमी प्रमाणात पाणी, अत्यल्प मेहनत आणि अचूक वेळी फवारणी करावी लागते. तसेच हवामानात बदल होत असताना काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढले तर तापमान स्थिर ठेवण्यासाठी कूलर त्याचबरोबर पाण्याचा फवाराच्या माध्यमातून पॉलिहाऊसमधील तापमान प्रमाणावर ठेवावे लागले. यामुळे फुल व्यवस्थित आणि टवटवीत राहते. यामुळे चांगले मार्केट मिळते.
Share your comments