शेळीपालन ते एम.डी. पंचगव्य थेरपी

Wednesday, 11 March 2020 05:54 PM


दोन वेळच अन्न मिळावं एवढे रुपये देणारा रोजगार खेड्यात मिळन कठीण आहे, शिवाय उद्योग करण्यासाठी कर्ज मिळणे देखील कठीण. म्हणून सुवर्णा ताईंनी बचत गट सुरू केला. बचत गटामुळे गावातील महिला एकत्र आल्या, त्यातून त्यांनी कर्ज उभारून किराणा व्यवसाय सुरू केला. पण तो ही फार काळ चालला नाही, म्हणून महिलांनी शेळीपालन करण्याचे ठरवले. २००० साली काही शेळ्या विकत घेतल्या, परंतु तांत्रिक माहिती तितकी नसल्याने पावसाळ्यात रोगाने अनेक शेळ्या मरण पावल्या. कर्ज अजूनही डोक्यावर होतेच, कर्जामुळे अनेक बायकांनी गट सोडला. परंतु शासकीय अधिकारी खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. एक शेळी जगली तरी व्यवसाय करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणून व्यवसाय अगदी २०१६ पर्यंत तगला. पुढे २०१० ला कोर्टात क्लार्क म्हणून नोकरी केली. ते २०१२ पर्यंत. नैसर्गिक शेती करायची आणि इकडे शेळी विकून जीव घ्यायचा हे त्यांना पटत नव्हत, म्हणून त्यांनी एकही शेळी विकली नाही.

२०१३ च्या अगोदर सुवर्णा ताई यादव ह्यांनी महिलांचा बचत गट, शिलाई काम, शेळीपालन त्यानंतर  कोर्टात क्लार्क अशी कामे केली. सातारा जिल्ह्यातील सासपडे हे त्यांच गाव. पंचगव्य औषध निर्मिती व चिकित्सा, आयुर्वेद, नैसर्गिक शेती ह्यात ताईचा हातखंडा. ताईच्या दिरांनी त्यांना आयुर्वेद, पंचगव्य औषध काही माहिती देऊन, ह्या क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन दिले. कोर्टात काम चालू असताना, त्या आजारी पडल्या. पंचगव्य औषध म्हणजे असतात तरी काय, हे पाहण्यासाठी ताई औंदुबरला गेल्या. औदुंबरला सुहास पाटील ह्यांच्या गौशाळेत 'निरंजन वर्मा' ह्यांच्याकडून प्रशिक्षण दिले जाते.

आजाराच्या निमित्ताने गेलेल्या ताई त्या औषधांच्या आणि अभ्यासाच्या प्रेमात पडल्या आणि इथून प्रवास सुरु झाला. एकूण एकवीस दिवसाचं प्रशिक्षण वर्षभर वेगवेगळ्या वेळी होत, वर्षाअखेर परीक्षा होते. ताईंनी परीक्षेत पास होऊन प्रशिक्षणाच प्रमाणपत्र देखील मिळवल आहे. सुरुवातीला घरी औषध बनवली, आजारावर गुण आला. मग आजूबाजूला, पै-पाहुणे मंडळींनी मागणी करायला सुरुवात केली, अन सगळीकडे त्यांच्या औषधाची महती पसरू लागली. देशी गाईच्या गोमुत्रापासून अर्क बनवला जातो, त्यात नरसंजीवनी, नारी संजीवनी, अर्जुन, पारिजात, नंदी अर्क अशा अर्कांचा समावेश आहे. त्याशिवाय नेत्रज्योती, केश तेल,दंतमंजन अशी उत्पादने बनवतात.

औषध बनवण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतीमध्ये गुळवेल तापासाठी, अर्जुन, पारिजात संधिवातावर, कडुलिंब पित्तासाठी अशा आजारावर अनेक वनस्पतीचा वापर होतो. गावाकडील डोंगरातून अशा वनस्पती मिळतात. देशी गोमुत्र अन शेणासाठी त्यांनी घरी देशी गाई पाळल्या आहेत. निगडी येथील वृद्ध शेतकऱ्यांला मोतीबिंदुमुळे डावा डोळा काढावा लागेल असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता, पण ताईंच्या नेत्रचूर औषधामुळे ते आता पाहू शकतात, डोळा  काढण्याची गरज लागली नाही.

 


प्रशिक्षणाची असणारी फी सगळ्याना परवडेल का, अशा विचारामुळे त्यांनी युट्यूबवर 'सुवर्णा यादव ताई' नावाचा चॅनेल सुरु केला, त्यात औषध कशी बनवायची ह्या संदर्भात माहिती दिली आहे. माहिती पाहून झारखंड, उत्तरप्रदेश तसेच महराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून त्यांना धन्यवादासाठी फोन आले. ही कल्पना अनेक जणांचे आजार बरे करून गेली. भारत सेवक समाज, गो-विज्ञान अनुसंधान केंद्र-देवळापार, शून्य खर्च शेती तंत्रज्ञान, पशुसंवर्धन विभाग सातारा असे अनेक प्रमाणपत्र त्यांना मिळालेले आहेत. त्यांची पूर्वीपासूनच परंपरागत शेती तीदेखील विषमुक्त. ग्राम गौरव प्रतिष्ठान संस्थेचे शितोळे काका व इतर अनेक शेतकरी दर चार महिन्यांनी खळद येथे शेतीबद्दल विचारसत्र घेत, तिथे ताई जाऊन आल्या. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, गो-शेती अशा अनेक बाबींशी त्यांचा संबंध येऊ लागला.

त्यांची साडे पाच एकर शेती आहे. सगळी कोरडवाहू. जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क त्या घरी बनवतात. मग त्यांनी शेतीत विविध प्रयोग सुरु केले. परसबागेत घनजीवामृतात बटाटे लावले, शेततळे तयार केले. लोकांना धान्य देता आला नाही तरी त्यांना देशी, स्थानिक बियाणे देता आल पाहिजे ह्यासाठी त्या बियान राखेत, मडक्यात ठेवून जतन करतात. लोकांना देतात त्यांना ते बियाणे वाढवायला सांगतात. चवळी, मुग, वाघ्या-वरूण-काळा घेवडा, दोडका, भोपळा, कारलं, सुर्यफुल, करडई, भुईमुग अशा बियाणाच त्या जतन करतात. ताटात येणाऱ्या सगळ्या गोष्टी शेतातूनच यायला हव्यात. तुम्ही हंगामात भेट दिल्यास शेवग्याच्या फुलांची, शेंगसोला, मेथी, चाकवत भाज्या, सेंदोडे लोणचे, राळा भात, नाचणी पापड, चवळी उसळ, ज्वारीची भाकरी अशी अष्ट पकवाने खायला मिळतील.

“प्रत्येक स्त्रीने सक्षम बनल पाहिजे, एक देशी गाई जरी घेतली तरी तिच्या दुधाशिवाय, शेण गोमत्रापासून असंख्य गोष्टी बनवून स्वयंपूर्ण होता येत. त्यामुळे न हरता कामाला लागलं पाहिजे” - सुवर्णा यादव 

आजूबाजूचे शेतकरी, महिला ताईना पाहून स्वताच्या शेतीत, आहारात प्रयोग करायला लागले आहेत. सासपडे गावात त्या प्रशिक्षण देखील घेतात. घरातील जमीन शेणाने सारवली जाते, मातीच्या भांड्यात सगळा स्वयंपाक केला जातो. हळूहळू ओळखी वाढत जाऊन अनेक जन त्यांना ओळखायला लागले. औषधांचा गुण आणि त्यांची नैसर्गिक शेती पाहायला आता अनेक ठिकाणचे लोक येतात. त्यामुळे त्यांना औषधासाठी वेगळी मार्केटिंग करण्याची गरज नाही. त्यांच्या कामानिमित्त त्यांना अनेक ठिकाणाहून बोलावण येत, पुरस्कार देखील मिळाले आहेत. दवा-ना-खाना हेच त्याचं ध्येय आहे. मास्टर डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी ची पदवी मिळालेल्या ताई आज अनेक स्त्री-पुरुषांसाठी देखील आदर्श आहेत. जिद्द, आवड अन कुणासाठी काहीतरी करण्याची धडपड असेल तर सुवर्णा ताई सारख एक आगळवेगळ व्यकीमत्त्व उभ राहत.

लेखक:
संतोष बोबडे
(गुढे, पाटण, सातारा)

suvarna yadav Panchagavya पंचगव्य Goat goat farming शेळीपालन शेळी सुवर्णा यादव जीवामृत jeevamrut
English Summary: From Goat Farming to MD Panchagavya Therapy

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.