शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आणि विविध पिकांच्या जाती व संशोधन करण्याचे काम व त्या जाती विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे संशोधनाअंती कृषी विद्यापीठाकडून केले जाते, हे आपल्याला माहीत आहेच
. परंतु असे बरेच शेतकरी आहेत जे आपल्या शेतातच पिकांवर विविध प्रकारचे संशोधन करण्यात व्यग्र असतात. कायमच नवनवीन प्रयोग ते शेतामध्ये करत असतात व असे प्रयोग करीत असताना बऱ्याचदा कौतुक करण्याजोगे संशोधन शेतकऱ्यांच्या हातून घडते. असे महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी आहेत की त्यांनी पिकांवर संशोधन करून संबंधित पिकांच्या विविध जाती संशोधित केलेल्या आहेत. या लेखामध्ये आपण अशाच एका शेतकऱ्याच्या भन्नाट कामगिरीची माहिती घेणार आहोत.
शेतकऱ्याने शोधल्या कापसाच्या जाती
महाराष्ट्रातील कायमच दुष्काळी जिल्हा समजला जाणारा बीड येथील शेतकरी किसान देव नागरगोजे यांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी हे भन्नाट किमया केली आहे. कापूस पिकावर त्यांनी केलेल्या विविध संशोधनांमध्ये त्यांनी अशी एक वरायटी शोधली आहे की ती पाहून थक्क व्हायला होते.
याबाबत माहिती अशी की, नागरगोजे यांनी बीड शहरालगत दहा एकर शेती त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. या जमिनीवर ते गेल्या 40 वर्षांपासून विविध प्रकारचे संशोधन करीत आहेत. या शेतकरी संशोधकाने आजपर्यंत विविध प्रकारच्या पिकांच्या जाती आणि वाण शोधून काढण्यात यश मिळवले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कापूस या पिकावर संशोधन करीत होते आणि या संशोधनांती त्यांनी 100 हून अधिक कापसाच्या जाती शोधून काढल्या आहेत.या जातींपैकी एक जात अशी शोधून काढली आहे की तिची उंची ही आठ ते दहा फूट पेक्षा जास्त आहे. या जाती बद्दल बोलताना नागरगोजे यांनी सांगितले की या जातीपासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळेल. या कापसाच्या झाडाची उंची आठ ते दहा फूट वाढत असल्याने यातून शेतकऱ्यांना विक्रमीउत्पादन मिळत आहे. वयाच्या पासष्टाव्या वर्षी देखील सकाळ पासून तर झोपे पर्यंत ते सातत्याने विविध प्रकारचे संशोधन करण्यात गुंतलेले असतात.
विद्यापीठाने या ठिकाणी येऊन आपण जे प्रयोग केला आहे त्याची तपासणी करावी. विविध पिकांच्या जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी सरकार आणि कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरगोजे यांनी आपल्या शेताला कृषी विद्यापीठ बनवले व तिथेच नवनवीन जाती शोधून काढण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.
Share your comments