गेल्या काही दिवसांपासून उसाच्या शेतीमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. यामध्ये मोठ्या प्राणावर लागवड वाढल्याने अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही तोडले गेले नाहीत. यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना शेतकऱ्यांनी आता पर्यायी पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. तसेच उसाला मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असल्याने अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे याला एक पर्याय म्हणून सध्या अनेक शेतकरी आद्रकाची शेती करत आहेत. सोलापूर या उसाच्या क्षेत्रात सध्या करमाळा आणि माढा परिसरात याची लागवड सध्या मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. परिसरात ऊस, केळी बरोबरच मका, द्राक्षे व आद्रक यांची शेती पाहायला मिळते.
यामुळे जिल्ह्यात शेती क्षेत्रात पिकांचे वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. आद्रक या पिकाला जास्त पाणी चालत नाही. उष्ण कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात हे पीक चांगल्या प्रकारे येते. आद्रकची शेती म्हणजे ऊस आणि केळी पिकाला पर्यायी पीक आहे. आद्रक शेतकऱ्याला चांगले पैसे मिळवून देणारे पीक आहे. यामुळे यामधून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात. हे पीक वर्षाच्या आत म्हणजे नऊ महिन्यात मार्केटला जाते. यामुळे उसाला दीड वर्ष वाट बघण्यासाठी आणि उसाचे पैसे देखील लवकर मिळत नसल्याने आता याकडे वळणे फायद्याचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
आद्रकचे उत्पादन एका एकरात 10 टनापासून 20 टनापर्यंत निघू शकते. तसेच याला 20 रुपये किलो ते 150 रुपये किलो असे मार्केट मिळू शकते. यामध्ये सरासरी उतारा 15 टन 70 रुपये किलो पकडला तर 10 लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याला आद्रक मिळवून देवू शकते. याचे भाव अनेकदा कमी जास्त होत असतात. लातूरमध्ये याचे मोठे मार्केट आहे. यामुळे ऊस आणि केळी पिकाला आद्रक पीक पर्यायी पीक असून ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे असे शेतकरी संतोष वागज यांनी सांगितले.
ते म्हणाले, या पिकासाठी कोरडे हवामान आवश्यक आहे. तसेच जमीन दलदल नसावी. ती निचऱ्याची असावी. मी सातारा, औरंगाबाद, सांगली या भागामध्ये फिरून या शेतीविषयी माहिती घेतली व आपल्या शेतात आद्रकची लागवड करण्याचे ठरवले. त्यानुसार जमीन तयार केली. गेली 10 वर्षे आद्रकचे पीक घेत आहे. यामधून चांगले पैसे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी याकडे वळायचा काही हरकत नाही. अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हा एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे.
Share your comments