प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशात पिकणाऱ्या आणि बारमाही मागणी असलेल्या खजुराची शेती चक्क बारामतीच्या मातीत करण्याचा यशस्वी प्रयोग माळेगाव खुर्द येथील शेतकऱ्याने केला आहे. या शेतीतून लाखोंच्या उत्पन्नाचा नवा मार्ग शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे.
बारामती शहरापासून दहा किलोमीटरच्या अंतरावर माळेगाव खुर्द गाव आहे. येथील बहुतांशी शेतकरी ऊस, विविध फळे आणि बागायती पिके घेतात. मात्र, प्रशांत प्रतापराव काटे यांनी वेगळी वाट निवडली. गुजरातच्या वलसाड येथून त्यांना खजूर लागवडीची माहिती मिळाली. या पिकासाठी आवश्यक वातावरण आणि होणाऱ्या खर्चाचा त्यांनी अभ्यास केला. लागवडीनंतर खजूर शेतीस खर्च कमी असल्याने पावणेदोन एकरात खजुराच्या रोपांची लागवड केली.
लागवडीसाठी त्यांना ६ लाख रुपये खर्च आला. एक रोप साडेतीन हजार रुपयांनुसार त्यांनी गुजरातमधून २०१७ मध्ये ११३ रोपे मागवली. सध्या त्यांच्याकडे ११३ झाडे असून ती आता ५ वर्षांची झाली आहेत.यंदा जुलै-ऑगस्ट मध्ये पिकाची पहिली तोडणी झाली. त्यामधून त्यांना दीड टन उत्पादन मिळाले आणि सर्व खर्च वजा जाता दीड लाख रुपये नफा झाला. नफा चांगला असल्याने ते आणखी लागवड करण्याच्या तयारीत आहेत.
खजूर शेतीबरोबरच काटे डाळिंब, पेरू आणि चिकू या फळांची लागवडही करतात. जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, आत्माचे संचालक किसनराव मुळे, मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ आदींनी खजूर शेतीला भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे रवींद्र कलाने यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीत न राहता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायद्याची ठरू शकते हेच काटे यांच्या खजूर शेतीच्या यशस्वी प्रयोगाने दाखवून दिले आहे.
हेही वाचा : लाजवाब! रिटायर्ड जवान बनले किसान! पेन्शनच्या पैशांनी फुलवली फळबाग; स्थानिक लोकांना मिळतोय फायदा
शेतीत वेगळा प्रयोग म्हणून आपण खजुराच्या शेतीकडे वळलो. खजुराचे प्रत्येक झाड चार वर्षांत फळाला येतेच. सुरुवातीला एक झाड वर्षांला दोन ते दहा हजारांचे उत्पन्न देते. त्यात पुढे त्यात वाढ होते. व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर उत्पन्न दुप्पटीने मिळेल. केवळ गायीच्या शेणाने रोपटय़ाचे पोषण केले जाऊ शकते. सुपीक जमिनीची या पिकाला गरज नसते. – प्रशांत काटे, प्रयोगशील शेतकरी
१०० वर्षांपर्यंत फलदायी..
खजुराला रोपे लागवाडीपासून चार वर्षांत फळे येणे सुरू होते. एका झाडाला पहिल्या वर्षांला वीस किलोपर्यंत फळे येतात. पुढे त्यात वाढ होऊन १०० ते १५० किलोपर्यंत फळे येतात. खजुराचे झाड साधारणत: ८० ते १०० वर्षे फळे देऊ शकते. खजूर १०० ते २०० किलो दराने विकले जातात. या फळास पुणे, मुंबई, हैदराबाद व बंगळूरुच्या बाजारात मागणी आहे.
Share your comments