चंडीगड- शेतकऱ्यांच्या कमाईच्या यशस्वी कथा सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. ‘एका एकरात लाखोंचे उत्पादन’ अशा बातम्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, तरुण शेतकऱ्यानं कल्पनेला तंत्रज्ञानाची जोड देत यू-ट्यूबद्वारे (You tube) महिन्याला लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.
दर्शन सिंग (Darshan singh) यांच्या कल्पनेतील ‘फार्मर लीडर’ (Farmer Leader) हा शेतीसाठी समर्पित असलेला यू-ट्यूब चॅनेल हा देशातील आघाडीचा चॅनेल ठरला आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या चॅनेलने 4 मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण केले आहे आणि लाखो दर्शकांचा टप्पा गाठला आहे. शेतकरी दर्शन सिंग यांना यू-ट्यूबच्या माध्यमातून महिन्याला किमान एक ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
लोकल ते ग्लोबल सोशल मीडियाचा प्रभाव सर्वांना जाणवत आहे. जगभरातील नावीण्यपूर्ण गोष्टी एका क्लिकवर सर्वांना उपलब्ध होतात. सर्व प्रकारच्या माहितीसाठी यू-ट्यूब अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. पारंपरिक शेतीतील जुगाड, सेंद्रीय शेती, डेअरी फार्म अशा विविध विषयांवरील अनेक व्हिडिओ ‘फार्मर लीडर’ यू-ट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतात.
शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या दर्शन याने व्यवसाय म्हणून शेती करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षणासोबत घरी शेतीला हातभार लावण्याचा प्रयत्न सुरू केला. रासायनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला असताना दर्शन सिंग याने सेंद्रीय शेतीकडे (Organic farming) वळण्याचा निर्णय घेतला.
गरज ही शोधाची जननी असते या हेतूने दर्शन सिंग यांचा यू-ट्यूब चॅनेल सुरू करण्याचा प्रवास आहे. आपले उत्पन्न वाढविण्यासाठी दर्शन सिंग यांना डेअरी फार्मिंग सुरू करण्याची कल्पना सुचली. यावेळी पशुखाद्यापासून सर्व काही शोधण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यावेळी ऑनलाईन उपलब्ध माहितीने समाधान केले नाही. त्यावेळी प्रत्यक्ष यशस्वी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा निर्णय दर्शन सिंग यांनी घेतला. आपल्याला समजलेली माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने दर्शन सिंग यांनी यू-ट्यूब चॅनेल काढला.
यशस्वी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि यू-ट्यूब वर पोस्ट करण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 2017 मध्ये ‘फार्मिंग लीडर’ या यू-ट्यूब चॅनेलची सुरुवात झाली. पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित असलेला यू-ट्यूब चॅनेल आहे. सर्व प्रकारची माहिती या चॅनेलवर उपलब्ध आहे.
एका क्लिकवर माहितीचा खजिना:
सेंद्रीय शेती, डेअरी फार्मिंग, गोट फार्मिंग(Goat farming), पोल्ट्री फार्मिंग, फिश फार्मिंग(Fish farming), मशरुम फार्मिंग, पिग फार्मिग यासारख्या असंख्य विषयावर या चॅनेलवर व्हिडिओ पाहायला मिळतात.
Share your comments