महाराष्ट्रातील मराठवाडा भाग हा कमी पावसामुळे नेहमीच चर्चेत असतो, हा प्रदेश दुष्काळाचा प्रदेश मानला जातो. ह्यामुळे आपण नेहमीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बातम्या ऐकत असतो, पण आज माहोल काहीसा वेगळा आहे आज आपण जाणुन घेणार आहोत एका यशोगाथा विषयी, एका विष्णू कदम नामक अवलिया विषयी. मराठवाडा ह्या दुष्काळी भागात विशेषतः लातूर जिल्हा जो या भागात येतो तो दुष्काळामुळे खूप प्रभावित आहे.
परंतु अशा परिस्थितीतही लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याचे खडक उमरगा गावचे रहिवासी शेतकरी विष्णू कदम यांनी दुष्काळाला आव्हान म्हणून घेतले आणि दीड एकर नापीक जमिनीवर 100 काजूची झाडांची लागवड केली. साधारणपणे, काजूच्या लागवडीसाठी समुद्राच्या किनारपट्टीचे वातावरण म्हणजेच दमट व आद्रतेचे हवामान आणि अधिक पाणी लागते, परंतु असे असूनही, कमी पाण्याचा सुयोग्य वापर करून आणि बदलत्या हवामानाची योग्य काळजी घेऊन त्यांनी काजुची बाग फुलवली. त्याची मेहनत फळाला आली आणि विष्णूने सिद्ध केले आहे की कोरड्या भागातही काजूची लागवड करता येते.
फक्त 100 झाडांची कमाई हजारो रुपये!
विष्णू कदम यांनी 2016 मध्ये कोकणातून काजूची रोपे आणून ही शेती सुरू केली आणि त्यांच्या काळजीने 4 वर्षांनंतर आता फळे येऊ लागली. या वर्षी आतापर्यंत कदम यांनी 80 हजार रुपये कमावले आणि त्यांनी 2 टन काजू काढला. कदम यांना आपल्या स्वबळावर खुप विश्वास आहे ते सांगतात की, यापुढे त्यांना ह्यापेक्षा जास्त उत्पादनची अपेक्षा आहे.
योग्य काळजी घेतली तर दुष्काळग्रस्त भागात देखील केली जाऊ शकते काजुची शेती
विष्णू कदम यांनी केलेली ही नवीन यशस्वी चाचणी पाहून या भागातील अनेक शेतकरी काजू लागवडीकडे आकर्षित होत आहेत. आणि यासाठी, विष्णू कदम स्वतः सर्व शेतकऱ्यांना काजू लागवडीची संपूर्ण माहिती देत आहेत आणि त्यांना या शेतीसाठी प्रेरित देखील करत आहेत.
तुम्हाला माहितीय का? काजुची शेती सर्वात जास्त होते तरी कुठे
कच्च्या काजू उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आयव्हरी कोस्ट पहिल्या क्रमांकावर आहे. काजूच्या प्रक्रियेत भारत प्रथम क्रमांकावर आहे. काजूचे उत्पादन देशातील पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी भागात सर्वाधिक आहे.
जमिनीच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि तेथे दरवर्षी 225000 टन काजूचे उत्पादन होते, महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य आहे, जिथे काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
Share your comments