1. यशकथा

काश्मीर अन् केरळपर्यंत पोचली सांगलीच्या बचत गटाची बिस्किटे

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
सदगुरू महिला बचत गट

सदगुरू महिला बचत गट


छोट्या-मोठ्या गावात बचत गट हे शब्द ऐकू येत असतात. बचत गटाच्या माध्यमातून महिला आपली आर्थिक नड पुर्ण करत असतात. हे महिला बचत गट पैशाचा व्यवहार करत असतात. पण असे थोडेच गट असतात जे आपल्या काही करण्याच्या जिद्दीने आपलं नाव पंचक्रुशीत प्रसिद्ध करत असतात. महाराष्ट्रातील सांगली, सातारा जिल्ह्यात अनेक बचत गट आहेत. याच भागातील एका अशाच गटाविषयी आपण जाणून घेणार आहोत. जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यातील नवेखेड येथील सदगुरु स्वयंसाहाय्यता महिला बचत गटाने पंचक्रुशीत आपल नाव पोहोचवलं. सदगुरु महिला बचत गट हा सौ.अंजली विश्वजीत दळवी ह्या चालवतात. अंजली दळवी यांनी आणि त्यांच्या बचत गटाने तयार केलेल्या विविध प्रकारच्या बिस्किटांनी गुणवत्ता व चवीच्या जोरावर आपलं नाव केरळ आणि काश्मीरपर्यंत पोहचवलं आहे.

नवेखेड गाव हे इस्लामपूरहून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. येथील उपक्रमशील महिला सौ. अंजली दळवी ह्या १७ वर्षांपासून बचत गट चालवतात.दळवी कुटुंबियांची चार एकर शेती आहे. आपल्या शेतीत त्या सोयाबीन, भुईमूग, अशी पिके असतात. शेतीसह पशुपालनाचा व्यवसायही करतात. सुरुवातीला अंजली दळवी यांना अनेकांनी विरोध केला होता. पण आपल्या विश्वसावर कायम राहत अंजलीताई यांनी बचत गटातून योग्य प्रगती साधली असून त्या आज २३ गटाच्या अध्यक्षा आहेत.

अंजलीताई गटाच्या माध्यमातून फक्त मासिक बचत गोळा करणे, जमा करणे, गोळा झालेली रक्कम बँकेत जमा करणे, गटातील महिलांना गरजेप्रमाणे जमा रक्कम कर्ज म्हणून देणे अशी कामे करत. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या आग्रहाने त्यांनी आपल्या गटाची नोंदणी २०१७ मध्ये केली. नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या गटाने घोडदौड चालू केली. कामाचा व्याप वाढेल म्हणून त्यांना घरातून विरोध झाला, परंतु शेतीच्या व्यवसायातून आपला निर्वाह होणार नसल्याची कल्पना अंजलीताई यांना होती. त्यामुळे अंजलीताई यांनी आरसीटीचे प्रशिक्षण घेतलं.

 


ब्लू स्टार बँक ऑफ इंडियामार्फत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. यात पापड बनवणे, मसाला तयार करणे, शिवणकाम, अशा ५० प्रकारच्या उद्योगधंद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यातून अंजलीताई यांनी पापड बनवणे, मसाला बनवणे, बिस्कीट बनवणे याचे प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘’अनेकजण आम्हाला विरोध करत होते. पापड बनवण्याचं अन् शिकण्याचं वय आहे का?. बनवल्यानंतर कोण विकत घेईल, व्यवहार कसा कराल? असे सल्ले देणारे अनेकजण मिळाले’’. पण अंजलीताई यांनी त्याकडे लक्ष न देता आपले प्रशिक्षण पुर्ण केले. सुरुवातीला त्यांनी मसाला बनवण्यास सुरुवात केली. गरम मसाला आणि चहा मसाला त्या बनवू लागल्या.

मसाला निर्मिती  -

मिरची मसाला, गरम मसाला, चिवडा मसाला, यासोबत त्या चहा मसाला तयार करत. मसाला तयार झाल्यानंतर तो विकायचा कसा याची जाण नव्हती. लोकांना आपल्या वस्तूविषयी माहिती कशी होईल,असा प्रश्न अंजलीताई यांना पडला होता. यावर त्यांनी एक मार्ग काढला.अंजलीताई यांचे घर हे गावापासून अंतरावर आहे. शेतात जाण्यासाठी त्यांच्या घराकडून रस्ता आहे. मग अंजलीताई शेतातून घरी जाणाऱ्या महिलांना थांबवून त्यांना मसाल्याच्या छोट्या- छोट्य़ा पुड्या देत.यासह त्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना मसाल्याच्या पुड्यात देत असतं. महिलांना मसाला आवडला तर त्या परत अंजलीताईकडे येत आणि मसाला विकत घेत. अशाप्रकारे त्यांनी मसाला विक्री सुरू केली. पण ग्रामीण भागात प्रत्येक महिला ह्या घरीच मसाला बनवत असतात. यामुळे जास्त महिला मसाला घेत नसतं.


कसा सुरू झाला बिस्कीट निर्मितीचा व्यवसाय –

जिल्ह्यात महिला बचत गटाने बनवलेल्या वस्तूंची प्रदर्शन भरवले जाते.यात इस्लामपूर येथे भरलेल्या दख्खन यात्रेत अंजलीताई यांनी पहिल्यांदा मसाल्याचा स्टॉल लावला. या यात्रेत त्यांनी ५ हजार रुपयांचा मसाला विकला. पण त्यांच्या शेजारी असलेल्या एका स्टॉल मध्ये बिस्किटांची विक्री केली जात होती. बिस्कीट घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. बिस्कीट नेहमी लागणारे आहे. यामुळे आपणही बिस्किटे तयार करावीत, असा विचार अंजलीताईंनी केला. सुरुवातीला अंजलीताई यांनी बिस्कीट विक्री करणाऱ्या महिलांकडून होलसेल दरात बिस्किटे घेतली आणि घरोघरी जाऊन त्याची विक्री केली. बिस्किटांची चव चांगली असल्याने ग्राहक त्याची चौकशी करत. ही बिस्किटे कोण बनवतं ? तुम्ही बनवता का ? अशी चौकशी ग्राहक करत.

मग त्यांनी आपण स्वत: बिस्किटे बनवावीत असं अंजलीताईंनी ठरवलं. मग २०१८ मध्ये त्यांनी बिस्कीट बनवण्याची यंत्रे घेण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी बँकेतून सव्वा लाख रुपयांचे कर्ज घेतले. यातून त्यांनी छोटे पीठ मळणी यंत्र आणि ओव्हन खरेदी केला. मग या यंत्राच्या साहय्याने बिस्किटे बनवण्याचे काम सुरू केले. बिस्किटे बनवल्यानंतर त्यांनी त्या बिस्किटांची विक्री घरोघरी जाऊन केली. बिस्किटांची चव चांगली होती शिवाय गव्हाच्या पिठापासून बनवली जात असल्याने बिस्किटे पौष्टीक आहेत, यामुळे या बिस्किटांना अधिक मागणी आहे. यात कोणत्याच प्रकारचे रासायनिक घटक टाकले जात नाहीत. ही बिस्कीटे चवीला चांगली असल्याने ग्राहकांची पसंती वाढली आहे. बिस्किटांची विक्री आता घरीच होते. विशेष म्हणजे अंजलीताई १८ प्रकारची बिस्किटे तयार करतात. यात गहू, नाचणी, बाजरी, यात शुगरफ्री, काजू, नाईस, कस्टर्ड, औस, ओट बनाना, मिल्क इलायची, डार्क चॉकलेट अशा प्रकारची बिस्किटे तयार केली जातात.

केरळ- काश्मीरपर्यंत पोचली बिस्किटे  -

अंजलीताई यांनी तयार केलेली बिस्किटे फक्त स्थानिक बाजारातच नाही तर परराज्यातही विकली जातात. केरळ, काश्मीरमधील लोकही या बिस्किटांच्या प्रेमात आहेत.सांगलीमध्ये राहणाऱ्या काही लोकांचे नातेवाईक काही नाशिक, मुंबई, पुण्यात तर काहीजण परराज्यात आहेत. त्या नातेवाईकांच्या माउथ पब्लिसिटीमुळे नाशिक, मुंबई पुण्यातील लोक या बिस्किटांच्या प्रेमात पडली. दिवाळीच्या हंगामात ग्रामीण भागातील महिला एकमेकांना दिवाळीचा फराळ देत असतात. दुसऱ्या गावात राहणारे लोक त्यांच्या नातेवाईकांकडे फराळऐवजी बिस्किटांची मागणी करतात.

दरम्यान अंजलीताई मजुरी घेऊनही बिस्किटे तयार करुन देतात.  सामन तुमचे, मजुरी आमची ही संकल्पना राबवून अंजलीताई मजुरीवर बिस्किटे तयार करतात. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीची बिस्किटे मिळू लागली. यासाठी त्या ७० किलो रुपयेप्रमाणे मजुरी एका ग्राहकाकडून घेतात. जर आपण कोणतेही सामान न देता बिस्किटे घेतली तर ती १६० रुपये किलोप्रमाणे विकली जातात. कृषी जागरण मराठीशी बोलताना अंजलीताई म्हणाल्या की, ‘सामान देऊन बिस्किटे बनवून घेणाऱ्यांची गर्दी अधिक असते. दिवसाला ६० ते ७० किलो बिस्किटे तयार केली जातात’.  

जाहिरातीसाठी शुन्य खर्च - 

अंजलीताई ह्या आपल्या पदार्थांची कोणतीच जाहिरात करत नाहीत. त्या म्हणतात, ‘एकदा की, ब्रँड झाला तर गुणवत्ता कमी होत असते. आपल्या नावाने आपल्याला हुडकत येणाऱ्यांना गुणवत्ता पुर्ण बिस्किटे देण्यात समाधान मिळते. चवदार बिस्किटे मिळाल्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांनी केलेलं आपलं कौतुक हिच आपली जाहीरात’ असल्याचं त्या म्हणतात. माउथ पब्लिसिटीवर त्यांचा अधिक विश्वास आहे.बिस्किटांची घरीच विक्री होत असते. महिला बचत गटातील तीन ते चार महिला त्यांना मदत करतात. या बिस्किट विक्रीतून त्या वर्षाला दोन लाखांची उलाढाल करतात. त्यांच्याकडे जुनेखेड, मसुचीवाडी, पुणदी, ताकरी येथील ग्राहक नेहमी बिस्कीट घेण्यासाठी येतात.    


धनीने सुचवली टॅगलाईन –

अंजलीताई यांना बचत चालविण्यास त्यांच्या पतीचा त्यांना पाठिंबा होता. पण नंतरच्या व्यवसायासाठी त्यांचा विरोध होता. पण व्यवसायाची होत असलेली प्रगती आणि पंचक्रुशीत मिळत असलेली ओळख यामुळे त्यांचा विरोध मावळला. इतकंच नाही तर अंजलीताई यांना त्यांच्या कामातही मदत करु लागले. याविषयी बोलताना अंजलीताई टॅगलाईनचा किस्सा आवडीने सांगतात. अंजलीताई यांच्या पतीचा व्यवसाय हा डिश लावण्याचा आहे. घरोघरी जावून ते डिश लावतात, मग तेथे बिस्किटांचं कौतुक ऐकत. तेव्हा ते म्हणत की, दर कमी पण क्वालिटीची हमी. हे वाक्य प्रत्येकांना आवडलं, हेच वाक्य आपल्या बिस्किटांसाठी टॅगलाईन म्हणून वापरावे असं त्यांनी सुचवलं.

पुरस्कार  -

सद्गुरु महिला बचत गटाला  आणि सौ. दळवी यांना डीआरडीए मार्फत जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर हिरकणी, नवउद्योजक महाराष्ट्राचे असे पुरस्कारही मिळाले आहेत.    

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters