मधुमक्षिका पालन हा शेतकऱ्यांसाठी आधिक उत्पन्न मिळवण्याचा मार्ग आहे. विशेष म्हणजे मधुमक्षिका पालनासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. या व्यवसायात आपण जर चांगली देखभाल केली मोठी मेहनत घेतली तर नक्कीच आपल्याला मोठा आर्थिक फायदा झाल्याशिवाय राहत नाही. अशीच एक हरियाणातील शेतकऱ्यांची यशोगाथा आहे. जगपाल सिंह फोगाट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चला तर पाहुया जगपाल यांची यशोगाथा..
मेहनतीने बनवलं नेचर फ्रेश हनी
जगपाल सिंह हे १९ वर्षांपासून या व्यवसायात मोठी मेहनत घेत आहेत. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर जगपाल यांनी मधुमक्षिका पालनाच्या व्यवसाय सुरू केला. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ३० मधुमक्षिका पेट्या होत्या. परंतु आज त्यांच्याकडे तब्बल ६ हजार पेक्षा अधिक मधुमक्षिका पेट्या आहेत. यासह त्यांनी मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गट जोडला आहे. मधमाशी पालन करुन मध तयार करण्याचे काम या गटाकडून केले जाते. बाजारात नेचर फ्रेश हनी नावाने हे मध प्रसिद्ध आहे. हे मध अनेक फुलाच्या सुगंधापासून बनविण्यात आले आहे. यात केसर, टीक, लीची, तिल, तुलसी, नीम, अजवायनची फुले आहेत.
अडचणींचा सामना करत पोहचले यशाच्या शिखरावर
मधुमक्षिका पालनात जगपाल सिंह फोगाट यांना अनेक अडचणी आल्या. या व्यवसायात त्यांच्या कुटुंबाने त्यांना साथ दिली नाही. कुटुंबाची मदत न घेता त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि यशाच्या शिखरावर पोहचले. त्यांच्या या मेहनतीची दखल शासनानेही घेतली. जगपाल सिंह फोगाट यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगपाल सिंह मधुमक्षिका पालनाला समाजकार्य समजतात. त्यामुळे ते या व्यवसायात समाधानी आहेत. एका मित्राप्रमाणे ते मधमाशांबरोबर काम करतात. जगपाल यांचे बदललेले आयुष्य पाहुन आणि मिळालेले यश पाहून त्यांच्या कुटुंबालाही जगपाल यांचा अभिमान वाटू लागला आहे. मधुमक्षिका पालन व्यवसाय हा जीव ओतून केला तर याच्यात आपल्याला नफा मिळतोच, असे जगपाल सिंह फोगाट म्हणातात.
Share your comments