स्थानिक वाणांचे आणि जंगली अन्न वनस्पतीचे संवर्धन यात बाएफचे कार्य

04 May 2020 07:09 AM
कडधान्य पिकातील विविधता

कडधान्य पिकातील विविधता


ग्रामीण दुर्बल कुटुंबांचा स्थायी स्वरूपाचा विकास व्हावा, त्यांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्यात या बरोबरच पर्यावरणाची समृद्धी होऊन सामाजिक मुल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी बाएफ डेव्हलमेन्ट रिसर्च फौंडेशन  ही संस्था कार्यरत आहे. विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर व संशोधन, नैसर्गिक संसाधनांचा परिणामकारक वापर, महिलांना विकास प्रक्रीयेत महत्वाचे स्थान देणे या गोष्टी अनुसरून संस्था आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करते. संस्था 1967 मध्ये स्थापन झालेली आहे. गो-पैदास, शेती-वृक्ष-फळझाडे, पाणलोट क्षेत्रविकास, वनीकरण, महिला विकास, सामुहिक आरोग्य व आश्रम शाळांमध्ये जागृती अशा कार्यक्रमांच्या माध्यमांतून संस्था आज 13 राज्यामध्ये कार्यरत आहे.

बियाणे हा शेतीचा आत्मा आणि सर्वात महत्वाची निविष्ठा असून गेल्या हजारो पिढ्यापासून शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या अनेक जाती निवडल्या, सुधारणा केल्या आणि त्याचा अन्न आणि पोषण सूरक्षा, आर्थिक उन्नती साठी वापर केला. परंतु सध्या सुरु असलेल्या एकांगी पद्धतीच्या पिक वाण सुधारणा कार्यक्रमामुळे अनेक पिक जातीमधील विविधता अत्यंत दुर्मिळ झाली आहे. आता काही निवडक पिक जातींनी हजारो एकर जमीन व्यापून टाकली आहे; त्यामुळे ही जैवविविधता धोक्यात आली आहे. पिकामधील जनुकीय विविधता ही पिक वाण विविधता टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

वातावरण बदलाच्या परिस्थितीत अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा हे संकट आपल्या समोर ठाकले आहे. आजही विविध पिकांचे स्थानिक वाण त्यांच्या वैशिष्टपूर्ण गुणधर्मामुळे टिकून आहेत. आता गरज आहे ती  अश्या वातावरण बदलात तग धरणाऱ्या, पोषण समृद्ध आणि रोग किडीस प्रतिकारक स्थानिक वाणांचा शोध घेऊन लोकसहभागातून संवर्धन आणि पुनरुजीवन करण्याची. महाराष्ट्र हे कृषी जैव विविधतेने समृद्ध राज्य आहे ज्यामध्ये वनस्पती, प्राणी, पिके इ. समावेश होतो आणि आता ह्या अमुल्य जैव विविधतेचे संवर्धन आणि जतन करणे अत्यंत महत्वाचे आहे

बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन, पुणे मार्फत पिकांच्या स्थानिक वाणांचे आणि जंगली अन्न वनस्पतीचे संवर्धन आणि व्यवस्थापन कार्यक्रम पालघर जिल्ह्यातील जव्हार मध्ये २००९ मध्ये सुरु झाला ज्यामध्ये पिकांच्या स्थानिक वाणाबद्दल चे ज्ञानाचे संकलन, शास्त्रीय अभ्यास, बिजोत्पादन, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्था हे मुख्य हेतू समोर ठेवले त्यांनंतर एप्रिल २०१४ पासून राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रम, अंतर्गत जव्हार (पालघर), अकोले (अहमदनगर), जुन्नर (पुणे), धडगाव (नंदुरबार), एटापल्ली (गडचिरोली), कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे सुरु झाला.

सदर कार्यक्रमामध्ये भात, नाचणी, वरई, राळा, मोर-बंटी, वाल-घेवडा, मका, ज्वारी, चवळी, भाजीपाला पिके, कंद पिके, तेलबिया पिके तसेच जंगली भाज्या, जंगली फळे इत्यादीचे सर्वेक्षण, संवर्धन आणि उत्पादन असा कार्यक्रम हाती घेतला आहे.

उद्दिष्ट्ये

 • स्थानिक पिके जाती आणि त्या संदर्भात स्थानिक ज्ञानाचे माहिती संकलन.
 • बियाणे संकलन, गुण वैशिष्ठयांचा प्रक्षेत्रिय अभ्यास, पोषण तत्वे आणि जनुकीय पातळीवर संशोधन.
 • पिक निहाय संवर्धन केंद्रे तयार करून प्रत्यक्ष शेतावरच लोकसहभागातून संवर्धन, बियाणे निवड आणि उत्पादन.
 • बियाणे बँका तयार करून देवाण घेवाण, धान्य विक्री आणि बियाणे संवर्धकांचे नेटवर्क तयार करणे, मेळावे, बियाणे प्रदर्शन अशा कार्यक्रमातून प्रचार प्रसार.


कार्यक्षेत्र

 • पालघर: जव्हार
 • नंदुरबार: धडगाव, अक्कलकुवा
 • पुणे: जुन्नर
 • अहमदनगर: अकोले
 • गडचिरोली: एटापल्ली, भामरागड
 • सिंधुदुर्ग: कुडाळ


उल्लेखनीय कामगिरी

 • महाराष्ट्रातील सहा आदिवासी आणि ग्रामीण भागातील पिकांच्या ६४५ स्थानिक वाणाचे संकलन आणि त्यासंबधीच्या पारंपारिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण.
 • ३१ ठिकाणी स्वस्थळी संवर्धन केंद्राचे माध्यमातून विविध पिकांच्या २४१ स्थानिक वाणांचे गुण वैशिष्ट्याचा प्रक्षेत्रिय अभ्यास, त्याच बरोबर भात, नाचणी, वरई, मका, ज्वारी ११२ स्थानिक पिक वाणांचे पोषण तत्वे आणि जनुकीय रचना अभ्यास केला आहे.
 • बायफ केंद्रीय संशोधन केंद्र, उरुळीकांचन येथे २ मे. टन क्षमतेचे शीत बियाणे बँक उभारणी केली असून ज्यामध्ये ४७३ स्थानिक वाणाचे ५से. ला तापमानात आणि ३३% सापेक्ष आर्द्रता ह्या वातावरणात दीर्घ काळ साठवणूक केली आहे.
 • १७३ जंगली अन्न वनस्पतीचा आढळ, प्रकार, खाण्यायोग्य भाग, बनविण्याची पद्धती, औषधी उपयोग, वापर, सद्यस्थिती, संवर्धन पद्धती इत्यादीचे माहिती संकलन केले आहे आणि त्यातील निवडक वनस्पतीच्या लागवडीसाठी काम सुरु केले आहे.
 • भात, मका, ज्वारी पिकांच्या ५३ स्थानिक वाणाचे पौधा किस्म आणि कृषक अधिकार संरक्षण प्राधिकरण (PPV & FRA), नवी दिल्ली ह्याचेकडे स्थानिक वाण संवर्धक शेतकरी गट ह्यांचे नावे रजिस्ट्रेशन साठी पाठवल्या आहेत.
 • राष्ट्रीय पादप अनुवशिक संसाधन ब्युरो (NBPGR), नवी दिल्ली ह्यांचेकडे १०५ पिक वाण नोंदणी साठी पाठवले आहेत. त्यापैकी ९४ वाणांना रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे.
 • भाजीपाला पिकांच्या उत्तम वाणाचे संवर्धन केले असून ८,५३८ कुटुंबांपर्यंत परसबाग, गच्ची वरील बाग ह्याचे माध्यमातून हा कार्यक्रम पोहोचला आहे
 • ६ पिकांच्या ४९ स्थानिक वाणांचे ५६.५ मे. टन बियाणे तयार करून ६ ठिकाणी बियाणे बँकाची सुरुवात उभ्या केल्या आहेत त्यामार्फत देवाण घेवाण आणि विक्री केली आहे.
 • आंबेमोहोर, काळभात, राय भोग, खडक्या, वालय अशा अधिक पोषण मूल्य युक्त निवडक जातींच्या तांदळाची फार्मिंग मोन्क (Farming Monk) ह्या ब्रांड नावाने विक्री.
 • SRI भात लागवड, SRT भात लागवड, सरी वरंबा पद्धतीने नाचणी लागवड, सरी पद्धतीने पेरणी अशा विविध सुधारित लागवड पद्धतीचा उत्पादन वाढीसाठी पथदर्शी कार्यक्रम.
 • सेंद्रिय निविष्ठा उत्पादन व वापर (कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची खते, गोमुत्र, दशपर्णी अर्क इ.) पद्धतीचा अवलंब.
 • बियाणे मेळावे, बियाणे प्रदर्शन, स्थानिक आणि संस्था पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करून शेतकरी, महिला गट, विद्यार्थी पर्यंत सदर कार्यक्रम पोचवला जात आहे.
 • जव्हार, पालघर मधील तीन महिला गटांच्या उत्पादनास FSSAI रजिस्ट्रेशन मिळाले असून त्याचे मार्फत आयुर्वेदिक कॉफी, हर्बल चहा, महुवा लाडू, नाचणी लाडू, जंगली भाज्या ह्यांचे उत्पादन आणि विक्री सुरु झाली आहे. आतापर्यंत 3 लाख रु. चे वर उलाढाल झाली आहे.

बायफ उरुळीकांचन येथील जीन बँक

बायफ उरुळीकांचन येथील जीन बँक

 

 • कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन व सामाजिक संस्था, अकोले मार्फत आतापर्यंत १०,००० परसबाग बियाणे संच विक्री.
 • स्थानिक कृषी जैव विविधता संवर्धन मध्ये देश आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्था आणि शेतकरी ह्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि देवाण घेवाण.
 • विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाचे सादरीकरण केले जात असून आतापर्यंत १३ संशोधन पेपर आणि ३८ च्या वर लेख प्रकाशित केले गेले आहेत.
 • सदर कार्यक्रम मेळावे, चर्चासत्रे माध्यमातून ८,७५० शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे.
 • सदर कार्यक्रमास कृषी मंत्रालय भारत सरकार मार्फत राष्ट्रीय जीनोम पुरस्कार ने गौरविले आहे आणि श्री. मावंजी पवार (कमल, साधना भात जाती), श्री. सुनील कामडी (अश्विनी भात) ह्यांनी निवड पद्धतीने भाताचे जाती विकसित केल्या असून त्यांना भारत सरकार ने जीनोम सन्मान २०११-१२ ने गौरविण्यात आले आहे. तसेच अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सदर कार्यक्रमाची दखल घेतली आहे.
 • जव्हार, पालघर मधील खुशी नाचणी पदार्थ उत्पादक गटास डॉ. रघुनाथ माशेलकर ह्यांचे हस्ते राष्ट्रीय सामाजिक संशोधन पूरस्कार २०१९ ने सन्मानित केले आहे.
 • बियाणे संवर्धक श्रीमती राहीबाई पोपेरे, अकोले, अहमदनगर ह्यांचा BBC २०१८ च्या जगातील १०० महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या यादीत समावेश; भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालय विभाग तर्फे महामहीम मा. राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते नारीशक्ती २०१८ पुरस्काराने सन्मानित त्याच बरोबर भारत सरकार तर्फे त्यांना २०२० चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुढील दिशा

 • कृषी जैव विविधता विभाग निहाय विविध संकलित वाणांचे स्वस्थळी संवर्धन आणि सुयोग्य व्यवस्थापनासाठी कृती आराखड्यासहित प्रयोगशील शेतकरी, स्वयंसेवी संस्था, कृषी विद्यालये इत्यादी बरोबर शुद्ध बियाणे शेअर करणे आणि तांत्रिक मार्गदर्शन करणे.
 • उत्तम उत्पादन, वातावरण बदलात तग धरणाऱ्या, पोषण समृद्ध पिक वाणांचे शेतकरी सहभागातून मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक करून प्रसारास चालना देणे.
 • स्थानिक पिक वाणामधील गुण वैशिष्ट्ये, पोषण तत्वे आणि जनुकीय पातळीवर अभ्यास आणि संशोधनास गती देणे.
 • गाव पातळीवर बियाणे संवर्धक शेतकरी गटाचे स्थानिक वाण संवर्धन, उत्पादन आणि बाजारपेठ साठी सक्षमीकरण करणे.
 • सदर कार्यक्रमाचे प्रचार आणि प्रसारासाठी बियाणे मेळावे, चर्चासत्रे, प्रक्षेत्र भेट, प्रशिक्षण यांचे आयोजन करणे.
 • राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध शासकीय आणि खाजगी संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, यंत्रणा, संशोधक इत्यादी बरोबर समन्वय साधून सदर कार्यक्रमाची व्याप्ती वाढवणे.

लेखक:
श्री. संजय पाटील
बायफ इंस्टीट्यूट फॉर सस्टेनेबल लाईव्हलीहूड अँड डेव्हलपमेंट (BISLD)
बायफ-मित्र भवन, निवास होम्सच्या समोर, बोधले नगरच्या पाठीमागे,
नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक ४२२०११ (०२५३-२४१६०५७/५८, ९६२३९३१८५५)

BAIF बायफ बाएफ डेव्हलमेन्ट रिसर्च फौंडेशन BAIF Development Research Foundation स्थानिक वाण जंगली अन्न local varieties wild food Millet मिलेट
English Summary: BAIF role in the conservation of local varieties and wild food plants

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.