सफरचंदाची बाग म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं जम्मू काश्मिर असेल किंवा हिमाचल प्रदेश. मात्र महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या माळरानावर सफरचंदाची बाग फुलवली आहे. मेहनत घेणाऱ्याला देव फळ देत असतो. परंतु नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मेहनत पाहून देवाने त्यांच्या बागाला चक्क सफरचंदाची फळे दिली.
सटाणा, नाशकात कांदा, आणि डाळिंबच्या बागा अधिक असतात. याला फाटा देत आखातवाडा येथील शेतकऱ्यांने सफरचंदाची बाग फुलवली आहे. नाशिकमध्ये असलेल्या या सफरचंदाची बाग पाहण्यासाठी परिसरातील इतर शेतकरी या बागेला भेट देत आहेत.नाशिकच्या सटाणा तालुक्यातील उष्ण तापमान असलेल्या आखातवाडेमध्ये 26 वर्षीय चंद्रकांत ह्याळीज यांनी सफारचंदाची बाग फुलवली आहे. अखातवाडेच्या प्रगतशील युवा शेतकरी चंद्रकांत ह्याळीज यांचा सुरूवातीपासून शेतीत नव-नवे प्रयोग करण्याचा हातखंडा आहे. त्यांची वाडिलोपार्जीत 5 एकर शेतजमीन आहे.
सुरूवातीला त्यांनी या ठिकाणी डाळिंबाची लागवड केली. डाळिंबाने त्यांना भरभराटही दिली मात्र तेल्या रोगाने त्याचे नुकसान झाले. मात्र खचून न जाता डाळिंबाला पर्याय म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास केला आणि फळबागांकडे वळण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी द्राक्षांसह विविध फळबागांचा प्रयोग यशस्वी केला. डाळिंबाची रोपे हिमाचल परदेशातही पाठवली. दरम्यान उष्ण तापमानात येणारी सफरचंद जातीचीही रोपे असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी चंद्रकांत यांनी अभ्यास केला आणि मार्गदर्शन घेतले.
साधारणतः 40 ते 45 डिग्री तापमानात येणाऱ्या हरमन-99 जातीच्या रोपांची त्यांनी निवड केली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 50 रोपांची लागवड केली असता तिसऱ्या वर्षी बहर धरला. या बागेत आता सफरचंदाची फळधारणा झाली आहे. विशेष म्हणजे या फळांना चांगला रंग, आकार आणि चवही आहे. पुढच्या काळात आता मोठ्या प्रमाणावर सफरचंदाचे उत्पन्न येण्याची त्यांना आशा आहे.
Share your comments