Success Story :- समाजातील ट्रेंड पाहिला तर उच्च शिक्षण घेतलेले तरुण चांगल्या पॅकेजेची नोकरी शोधतात व नोकरी मिळाल्यानंतर यामध्ये सेटल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. परंतु बरेच तरुण असे असतात की ते उच्च शिक्षण घेतात मात्र त्या शिक्षणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसलेले क्षेत्र निवडतात व मोठ्या प्रमाणावर यश देखील संपादन करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना महामारीच्या कालावधीमुळे नोकरीपेक्षा व्यवसायांचे महत्त्व आणखीनच अधोरेखित झाले आहे.
त्या कालावधीमध्ये कित्येक लोक बेरोजगार झाले होते व उदरनिर्वाह करण्याची समस्या देखील त्यांच्या पुढे उद्भवली होती व अनेकांनी त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायांच्या माध्यमातून जीवनाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला होता. हीच परिस्थिती खूप वेळ कालावधीमध्ये मंदार पेडणेकर या तरुणासोबत घडली. फायनान्स मध्ये एमबीए पूर्ण केलेल्या मंदार पेडणेकर या तरुणाची नोकरीची शाश्वती राहिली नाही व त्यामुळे त्याने त्याच्या राहत्या गावात पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला व उत्तुंग भरारी घेतली.
लेअर पोल्ट्री फार्मिंगमध्ये रोवले पाय
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंदार पेडणेकर या तरुणाने संपूर्ण शिक्षण मुंबईत घेतले व लहानचा मोठा देखील मुंबईमध्ये झाला. फायनान्स मध्ये एमबीए पूर्ण केले. परंतु इतके उच्च शिक्षण घेऊन देखील या तरुणाने व्यवसाय करण्याचे ठरवले व त्याकरिता तो त्याच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या चिंचोली या गावी आला व त्याने लेअर पोल्ट्री फार्म सुरू करण्याचे निश्चित केले. दीड एकर क्षेत्रामध्ये हा पोल्ट्री फार्म उभारायचे निश्चित करून यामध्ये आठ गुंठा क्षेत्रामध्ये पोल्ट्री शेड उभारण्यात आले.
सध्या या पोल्ट्री शेडमध्ये दहा हजार कोंबड्या असून दररोज 9000 पेक्षा जास्त अंडी उत्पादन या माध्यमातून मिळत आहे. जर आपण या व्यवसायातील मंदारचे आर्थिक गणित पाहिले तर अंडी उत्पादनाच्या माध्यमातून प्रति महिना एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास नफा तो मिळवत आहे.
अशा पद्धतीने केले गुंतवणुकीसाठी पैशांचे नियोजन
साधारणपणे हा लेयर पोल्ट्री प्रकल्प उभारण्याकरिता साधारणपणे 60 ते 65 लाख रुपये खर्च आला आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांचे वडील सेवेत होते.
ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना जे काही सेवानिवृत्तीची रक्कम मिळाली त्या रकमेतून त्यांनी हा प्रकल्प उभा केला. त्यामुळे वडिलांच्या पुण्याईमुळे मी हा व्यवसाय सुरू करू शकलो असे देखील आवर्जून मंदार सांगतात.
खाद्य विकत घेण्यापेक्षा स्वतः तयार करण्यावर भर
जर पोल्ट्री उद्योगाचा विचार केला तर सगळ्यात जास्त पैसा हा खाद्यावर खर्च होत असतो. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून मंदार पेडणेकर त्यांच्या पोल्ट्री फार्मधील कोंबड्या करता लागणारे खाद्य स्वतःच तयार करतात. हे खाद्य तयार करताना त्याकरिता ते स्टोन ग्रीड, सोयाबीनचे पेंड तसेच काही औषधी घटक त्यामध्ये मिक्स करतात व काही आवश्यक कच्चे खाद्य बाहेरून मागवले जाते.
त्यामुळे खाद्यावरील बराच खर्च त्यांचा कमी होण्यास मदत होते व पर्यायाने नफ्यात वाढ होते. अशा पद्धतीने जर व्यवसायामध्ये व्यवस्थित अभ्यास करून आणि जिद्द ठेवून जर सुरुवात केली तर नक्कीच यश मिळते हे मंदार पेडणेकर यांच्या उदाहरणावरून दिसून येते.
Share your comments