शेती क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी वयाचे बंधन नसते, वयाच्या 71 व्या वर्षी देखील शेती क्षेत्रात यशस्वी होता येते. याचेच एक उत्तम उदाहरण आहेत जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याच्या अकोलादेव गावातील भाऊराव म्हातारबा दरेकर. भाऊराव शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून आपल्या नावाचा डंका संपूर्ण राज्यात गाजवत आहेत. भाऊराव हे जरी 71 वर्षाचे शेतकरी असले तरी त्यांचा शेतीसाठीचा उत्साह हा एका नवयुवकाप्रमाणे आहे. भाऊराव दरवर्षी आपल्या शेतजमिनीत नाविन्यपूर्ण उपक्रम व प्रयोग करून मोठे दर्जेदार उत्पादन प्राप्त करीत असतात.
शेतीक्षेत्रात यशाचे शिखर सर करणाऱ्या या अवलिया 71 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच महाराष्ट्राचे गिरीशिखर हा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. भाऊराव यांचा जीवन प्रवास हा खुपच संघर्षपूर्ण आहे, आणि त्यांचा जीवन प्रवास राज्यातील नव्हे नव्हे तर देशातील नवयुवक शेतकऱ्यांसाठी एक नवसंजीवनी देण्याचे कार्य करणारा आहे. भाऊराव यांचे बालपण खूपच हलाखीचे असल्याने भाऊराव यांना फक्त सातवीपर्यंतच शिक्षण प्राप्त करता आले, घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सातवीनंतर भाऊराव यांना इच्छा असून देखील शिकता आले नाही. भाऊराव यांना वडिलोपार्जित 1 बिघा शेतजमीन देखील प्राप्त झाली नव्हती, भाऊराव यांचे वडील भूमिहीन शेतमजूर होते, त्यामुळे भावराव यांना सातवीनंतर लोकांच्या शेतात जाऊन सालगडी म्हणून काम करावे लागले. पण भाऊराव यांचा स्वभाव हा खूप हट्टी होता आणि त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता, भाऊराव यांनी आपल्या याच जिद्दी स्वभावामुळे आणि आपल्या कर्तुत्वाच्या व कष्टाच्या जोरावर एक सालगडी ते एक यशस्वी बागायतदार हा शेतीक्षेत्रातील गिरीशिखर सर केला. भाऊराव यांच्याजवळ 1980 पर्यंत स्वतःची शेतजमीन नव्हती, तोपर्यंत ते सालगडी म्हणूनच लोकांच्या शेतात राबत होते. मात्र 1980 मध्ये त्यांनी आपल्या मजुरीच्या बचत केलेल्या पैशांनी स्वतःची 4 एकर शेतजमीन विकत घेतली. 1980 पर्यंत लोकांच्या शेतात काबाडकष्ट करणारा हा अवलिया शेतकरी 1980 नंतर आपल्या स्वतःच्या वावरात आपल्या अर्धांगिनी सोबत भविष्याच्या सुवर्णमय यशासाठी अहोरात्र झटू लागला.
आपल्या स्वतःच्या शेतजमिनीत भाऊराव यांनी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली, पुढे चालून त्यांनी गट शेती मध्ये सहभाग नोंदविला. त्याच वेळी त्यांची ओळख गट शेतीचे प्रणेते म्हणून ख्याती प्राप्त असलेले डॉक्टर भगवानराव कापसे यांच्यासोबत झाली. कापसे यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे भाऊराव मामांनी आपल्या आयुष्यात कधीच भूतकाळात डोकावून बघितले नाही, भूतकाळात डोकावण्याऐवजी भाऊराव यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून यशाची मोठी गगनभरारी घेतली. भाऊराव व त्यांच्या अर्धांगिनी यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर आजतागायत 26 एकर शेत जमीन विकत घेतली आहे. भाऊराव आपल्या 26 एकर क्षेत्रात कापूस तूर सोयाबीन या हंगामी पिकांची लागवड करतात, यासोबतच या 71 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात द्राक्ष व मोसंबी या फळबाग पिकांची देखील लागवड केली आहे, तसेच भाऊराव हे हळद व केवडा या नगदी पिकांचे देखील उत्पादन घेत असतात. एवढेच नाही शेतीला पूरक व्यवसायाशिवाय पर्याय नाही हे ओळखुन भाऊराव दुग्ध व्यवसाय देखील करत असतात. आपल्या शेती क्षेत्रात व दुग्ध व्यवसायात भाऊराव यांनी मोठे दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
तसेच शेती क्षेत्रात अजून नवनवीन प्रयोग करण्यासाठी उत्सुक असलेला हा 71 वर्षाचा अवलिया आज रोजी देखील वेगवेगळ्या शेतीसंबंधी चर्चासत्रात हजेरी लावत असतो, तसेच प्रगत शेतकऱ्यांच्या शेतात देखील शिवार फेरी करत भटकत असतो. शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आत्मसात करून या अवलिया शेतकऱ्याने एकरी 22 क्विंटल कापसाचे उत्पादन घेत राज्यातील नव्हे तर देशातील इतर तरुण नवयुवक शेतकऱ्यांना लाजऊन सोडले आहे. भाऊराव यांचा एक सालगडी ते 26 एकर बागायती क्षेत्राचा मालक हा जीवनप्रवास देशातील तमाम नवयुवक शेतकऱ्यांना यशासाठी अहोरात्र कष्ट करण्याची प्रेरणा देणारा आहे.
Share your comments