अवेळी ऱ्हास होण्याची कारणे
लागवडीसाठी अयोग्य जमिनीची व कलमांची निवड.
ओलितासाठी पाण्याची कमतरता.
योग्य कीड-रोग व पाणी व्यवस्थापनाचा अभाव.
मृग बहरासाठी गरजेपेक्षा जास्त ताण देणे.
झाडावरील रोगट वाळलेल्या फांद्या न काढणे, पाणी व खते देण्याची चुकीची पद्धत.
बागेत सुरवातीच्या काळात खोल मुळे असलेली (कपाशी, तूर) आंतरपीक पद्धती घेणे.
योग्य मशागतीचा अभाव.
प्रतिबंधात्मक उपाय
भारी, खोल, पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड करू नये.
जमिनीच्या पोतानुसार व झाडाच्या क्षमतेनुसार ताण देण्याचा कालावधी ठरवावा अतिरिक्त ताण देऊ नये
रंगपूर किंवा जबेरी खुंटावरील कलमे निवडावीत.
ओलिताच्या पाण्याचा खोडासोबत संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
आळ्यामध्ये पाणी साचू देऊ नये. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून काढावे.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
कीड, रोगांचे वेळेवर नियंत्रण करावे.
झाडांचे वय व ताकदीनुसार फळांची संख्या (८०० ते १०००) राखावी झाडाच्या ताकदीपेक्षा जास्त फळधारणा झाल्यास झाडे सलाटण्याचा वेग वाढतो.
छाटणीचे फायदे
झाडावर जोमदार फांद्यांची वाढ होते पानांचा आकार मोठा होतो पानांचा रंग गर्द होऊन चकाकी येते.
फळे मोठ्या आकाराची, उत्तम प्रतीची मिळतात फळे पातळ सालीची, घट्ट, चमकदार, एकसारख्या आकाराची लागतात.
प्रत्येक झाडावर साधारणतः ७०० ते १००० पर्यंत फळे येतात.
फळधारणा झाडाच्या आतील भागात होते. त्यामुळे फांद्या व झाडाला बांबूचा आधार देण्याची गरज नसते. तसेच फळधारणा योग्य प्रमाणात होत असल्यामुळे फांद्या तुटण्याची भीती नसते.
छाटणी केलेल्या झाडाला दरवर्षी नियमित बहार येतो.
झाडाचे आयुष्यमान ५ ते ७ वर्षांनी वाढते. उत्पादनात भर पडते.
झाड सशक्त, जोमदार, निरोगी व दीर्घायुषी बनते.
छाटणीकरिता आवश्यक बाबी
झाडाची छाटणी एकदाच जून महिन्यात करावी दरवर्षी छाटणी करू नये.
छाटणी केल्यानंतर पहिल्या वर्षी येणारा मृग व आंबिया बहर येत नाही. पुढील वर्षीपासून मात्र नियमित बहर येतो.
छाटणी केलेल्या बागेची निगा राखून खत ओलित व्यवस्थापन, कीड व रोगाचे नियंत्रण वेळेवर करावे.
१८ ते २० वर्षे वयाच्या पुढील झाडांची छाटणी करावी. यापेक्षा कमी वयाच्या झाडांची छाटणी करू नये.
जुन्या बागांचे पुनरुज्जीवन
झाडाची छाटणी
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (पाऊस सुरू होण्यापूर्वी) झाडावरील सर्व वाळलेल्या, रोगट फांद्या ओल्या (हिरव्या) भागापासून एक इंच अंतरापासून छाटाव्यात.
मध्यम ते मोठ्या फांद्या आरीने छाटाव्यात हिरव्या फांद्यासुद्धा शेंड्यापासून (एक ते दीड फूट लांबीच्या सर्व फांद्या) छाटाव्यात.
बोर्डो पेस्ट लावणे :छाटलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. झाडाच्या मुख्य खोडासही बोर्डो पेस्ट लावावी.
बुरशीनाशकाची फवारणी : छाटणी केलेल्या झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खत व्यवस्थापन
छाटणीनंतर प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत, ७.५ किलो निंबोळी ढेप, ४०० ग्रॅम नत्र, २०० ग्रॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश झाडांच्या घेराखाली मातीत मिसळून द्यावे ऑक्टोबर महिन्यात ४०० ग्रॅम नत्र, २०० ग्रॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाशची मात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापन
झाडाच्या गरजेनुसार ओलित करावे ओलिताकरिता दुहेरी आळे पद्धतीचा अवलंब करावा ठिबक सिंचन पद्धतीने ओलित केल्यास ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होऊन चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते.
सालटलेल्या बागांचे पुनरुज्जीवन
अयोग्य व्यवस्थापन आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक संत्रा झाडे वरून खाली वाळू लागतात.
उपाययोजना
वाळत असलेल्या झाडाच्या हिरव्या फांद्या ३० ते ४५ सेंमी शेंड्यापासून सिकेटरच्या साह्याने छाटाव्यात
वाळलेल्या फांद्यांचा हिरवा भाग २ ते ३ सेंमी ठेवून छाटावा. छाटणी करताना प्रत्येक वेळी सिकेटरचे निर्जंतुकीकरण करावे. यासाठी सिकेटर कार्बेन्डाझीम (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणात बुडवावे.
छाटणीनंतर लगेच कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोठ्या फांद्या छाटल्या असतील तर त्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी. झाडाचा संपूर्ण वाफा खोदून मुळ्या उघड्या कराव्यात सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात. वाफा ५ ते ७ दिवस उघडा ठेवावा.
प्रति झाडास शेणखत ५० किलो, निंबोळी ढेप ७.५ किलो, अमोनियम सल्फेट १ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो, म्युरेट ऑफ पोटॅश अर्धा किलो यांचे मिश्रण करून द्यावे.
खत दिल्यानंतर खोदलेले वाफे मातीने चांगले झाकावेत.
झाडाच्या बुंध्याला एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.
लेखक - प्रवीण सरवदे , कराड
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments