पर्यावरण सुरक्षित असेल तरच आपण सुरक्षित राहू. मानवाकडून अनेक कारणाने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण आता काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी जनजागृती देखील केली जात आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक संस्था, संघटना आता सज्ज झाल्या असून त्यादृष्टीने अनेक कामे देखील करत आहेत.
अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक सर्वांना अभिमान वाटावी अशी बातमी समोर आली आहे. पुण्यातील रमेश खरमाळे पठ्ठ्याने चक्क पावसाचे पाणी साचवण्यासाठी अवघ्या 60 दिवसांत तब्ब्ल 70 हून अधिक चर खोदले आहे. त्यामुळे रमेश खरमाळे यांचे सगळीकडून कौतुक होत आहे. एवढंच नव्हे तर त्याच्या अभिनव उपक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्येदेखील नोंद झाली आहे.
60 दिवसात 70 चर खोदण्याचा अभिनव उपक्रम -
रमेश खरमाळे यांचे जुन्नर तालुक्यातील खोडद हे गाव असून ते वनखात्यात नोकरी करणारे वनरक्षक आहेत. जुन्नर तालुक्यातील धामनखेल येथील डोंगर माथ्यावर त्यांनी हे चर खोदले आहेत. दररोज पहाटे ५:३० ते ९:३० पर्यंत चर खोदण्याचे काम करण्याचे त्यांचा नित्यक्रम बनला होता. त्यानंतरच ते आपल्या कामावर जायचे. त्यांच्या या शुभकार्यात त्यांच्या पत्नीचादेखील सहभाग होता. १५ सप्टेंबर २०२१ रोजी या पर्यावरणप्रेमी दांपत्याने या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली होती. आणि 60 व्या दिवशीच हे काम पूर्ण झाले.व स्वतःच्या वाढदिवसानिमत्ताने त्यांनी 70 हून अधिक चर खोदण्याचे आपले ध्येय पूर्ण केले.
शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकार आक्रमक; तब्ब्ल 2 कोटींचे बियाणे जप्त
उपक्रम वनविभागाला समर्पित -
15 वर्ष भारतीय सैन्यात काम करतानाच रमेश खरमाळे यांना देशसेवेचे वेड होत. त्याच्याच अनुभवावरून जुन्नर तालुक्यातील वनविभागात त्यांनी काम केले. हा उपक्रम करताना यात कोणत्याही शासकीय कामाचा फायदा घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. जर हे काम मी एकटा करू शकतो तर हे काम प्रत्येकाने करायचे ठरवले तर राज्यात ज्या भागात पाण्याची टंचाई आहे तेथील पाण्याची टंचाई कमी होईल. आणि हा जो उपक्रम मी केला आहे तो मी आनंदाने वनविभागाला समर्पित करतो, असे खरमाळे यांनी सांगितले.
३०० तास काम करून ७० चरांची निर्मिती -
पर्यावरण प्रेमी असणाऱ्या या दांपत्याने ६० दिवसांत ३०० तास काम करून ७० चरे खोदण्याचा विक्रम केला आहे. हे चर जवळपास ४१२ मीटर लांबीचे आहे.
यात साधारण 8 लाख लीटर पावसाचे पाणी साचेल आणि पावसाळ्यात हे खड्डे भरले की जमिनीत पाणी जिरले जाईल. आणि यावर्षी पाऊस चांगला झाला तर वर्षाला १ कोटी ६० लाख लिटर पाणी जमिनीत जिरवण्याचा उद्देश सफल होईल असे खरमाळे यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने पर्यावरणासाठी काही तरी करावे असे आवाहन देखील केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आता वाघ, बिबट्यांची दहशद होणार कमी; वन परिक्षेत्राच्या वतीने बांधकामाला सुरुवात
ठाकरे सरकारची पशुपालन योजना; शेतकऱ्यांना मिळतायेत गायी आणि म्हशी
Published on: 12 June 2022, 02:28 IST