
Governor Ramesh Bais
भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य म्हणजेच श्री अन्नावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. राज्यातील विविध विद्यापीठातून दरवर्षी हजारो युवक पदवी घेऊन बाहेर पडतात. या युवकांनी भरडधान्याच्या शेतीकडे वळावे. तसेच त्यावर आधारित स्टार्टअप सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त गावदेवी मैदानावर आयोजित इट राईट मिलेट मेळ्याचे उद्घाटन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते झाले. यानिमित्त वॉकेथॉन व क्लिन स्ट्रिट हबचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एफएसएसआयच्या विभागीय संचालक प्रिती चौधरी, उपसंचालक डॉ. के.यू. मेथेकर आदी उपस्थित होते. यावेळी उभारण्यात आलेल्या तृणधान्यावर आधारित खाद्य पदार्थांच्या स्टॉलला राज्यपाल महोदयांनी भेट देऊन पाहणी केली. अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे महानगरपालिका, असोचाम आणि न्यूट्रीलाईट यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपला शेतकरी जगात भारी! पिकवली चक्क पांढऱ्या रंगाची जांभळं, असं केलं नियोजन
राज्यपाल बैस म्हणाले की, केंद्र सरकार व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र महासभेने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तृणधान्य हे एक महत्त्वपूर्ण खाद्य स्त्रोत आहे. पूर्वी तृणधान्य हे फक्त गरिबांचे अन्न मानले जात होते. मात्र, आता भविष्यात आहारातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून तृणधान्याचा समावेश करण्याची वेळ आली आहे.
तृणधान्य हे संतुलित व पोषण आहाराचे समृद्ध स्त्रोत आहे. भारतातील विविध प्रदेशातील ज्वारी, बाजरी, रागी, साम, कंगनी, चीना, कुटकी, कुट्टू हे श्री अन्नाचे अविभाज्य हिस्सा आहेत. भरड धान्याच्या माध्यमातून शेतकरी, महिला, तरुणांना आत्मनिर्भर करण्यास सहाय्य होणार आहे.
काळजी घ्या! IMD कडून राज्यात पाच दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा, या ठिकाणी गारपिटीची शक्यता...
भारतासारख्या कृषि प्रधान देशात कमी पाण्यावर येणाऱ्या या भरडधान्याचे उत्पादन हे रसायनमुक्त शेतीमालाच्या उत्पादनासाठी मोठा आधार आहे. पर्यावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भरडधान्याचा उपयोग होईल. लहान शेतकऱ्यांना भरडधान्याच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनुदान देण्याची आवश्यकता आहे.
तसेच उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया, पॅकेजिंग व त्याच्या विक्रीची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे पाणीपुरी महोत्सव, खिचडी महोत्सव, आंबा महोत्सव होतो त्याचप्रमाणे तृणधान्य/भरडधान्य महोत्सवाचे आयोजन व्हावे, असेही राज्यपाल महोदयांनी यावेळी सांगितले.
Share your comments