चेन्नई- काळ्या मातीशी अस्सल ओढ आणि तंत्रज्ञानाला नावीण्याची साथ देत तमिळनाडूतील शेतकऱ्यांच्या गटाने यू-ट्यूबच्या माध्यमातून कोट्याधीश होण्याची किमया साधली आहे. शेती कामातून मिळणाऱ्या उर्वरित वेळेत यू-ट्यूबर बनलेल्या शेतकऱ्यांच्या यू-ट्यूब चॅनेलने एक कोटींचा सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण केला आहे.
शेती कामातून उसंत मिळाल्यानंतर उर्वरित वेळेत 'व्हिलेज कुकिंग' नावाने यू-ट्यूब चॅनेल सुरू करण्याची कल्पना शेतकऱ्यांना सुचली. ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा परिचय या चॅनेलच्या माध्यमातून करून दिला जातो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या पदार्थांचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर हा यू-ट्यूब चॅनेल प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
एप्रिल २०१८ मध्ये या चॅनेलची सुरुवात करण्यात आली होती. अवघ्या तीन वर्षात सर्वाधिक सबस्क्रायबरचा टप्पा गाठणारा तमिळनाडूतील पहिल्या क्रमांकाचा यू-ट्यूब चॅनेल ठरला आहे. यू-ट्यूबने खास बाब म्हणून 'डायमंड प्ले' बटन पुरस्कार देऊन शेतकऱ्यांचा गौरव केला आहे. व्ही. सुब्रम्हण्यम, व्ही. मुरुगेसन, व्ही. अय्यनार, जी. तमिळसेल्वन आणि टी. मुथूमनिकम हे 'व्हिलेज कुकिंग' चॅनेलच्या माध्यमातून सोशल स्टार ठरले आहेत.
शिवार ते यू-ट्यूब!
आम्हाला शेतीची कामे वर्षातून केवळ सहा महिने असतात. उर्वरित कालावधीसाठी आमच्या हाताला काम नसते. त्यामुळे आम्ही चॅनेल काढण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकऱ्यांनी 'डायमंड प्ले' बटन मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना आपली भावना व्यक्त केली.
उदार बळीराजा!
शेतकऱ्यांना यू-ट्यूबच्या माध्यमातून मिळणाऱ्या जाहिरातीद्वारे महिन्याला ७ लाखांची कमाई होते. सामाजिक संवेदनशीलतेचं भान जपतं शेतकऱ्यांनी या कमाईतून १० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच यू-ट्यूब चॅनेल वर बनविण्यात येणारे अन्नपदार्थाचे वितरण अनाथगृह, वृद्धाश्रम यांमध्ये केले जाते.
Share your comments